ट्रंप मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी अमेरिकेत आणीबाणी लागू करू शकतात का?

गंभीर मानवी आणि सुरक्षितता संकटापासून वाचायचं असेल तर मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी पैसा गोळा करा, असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.
ही भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मुद्यावरूनच अमेरिकेत शटडाऊनची परिस्थिती उद्भभवली आहे.
दरम्यान, ट्रंप यांनी अमेरिकेच्या नागरिकांना ओलीस ठेवलं आहे, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. 18 दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनच्या मुद्यावरून अमेरिकेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
पण ट्रंप यांनी 'ओव्हल ऑफिस'मधून आज राष्ट्राला संबोधित करताना आणीबाणीची घोषणा केली नाही. देशात आणीबाणी घोषित केली तर ट्रंप अमेरिकन काँग्रेसला बाजूला सारून निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अशा निर्णयामुळे त्यांच्याकडे भिंतबांधणीसाठी पैसा आणि अन्य संसाधनं उपलब्ध असतील.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हातात असणारे हे आणीबाणीचे अधिकार नक्की आहेत तरी काय? या अधिकारांची अंमलबजावणी करणं एवढं सोपं आहे का?
आणीबाणीचा नेमका अर्थ काय?
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर केली जाते. ट्रंप यांच्या मते मेक्सिको सीमा ओलांडून स्थलांतरितांचा लोंढा अमेरिकेत येऊ पाहतोय. त्यामुळे ही संकटमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
"आणीबाणी घोषित केल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना विशेषाधिकार मिळतात, जे नाहीतर जवळपास शंभर-एक कायद्यांद्वारे विविध प्रकारे संरक्षित असतात," असं ब्रेनन Brennan Center's Liberty and National Security Program संस्थेचे सहसंचालक एलिझाबेथ गॉइटीन यांनी सांगितलं.
या अधिकाराअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना अमेरिकन काँग्रेसची प्रक्रिया बाजूला सारून निर्णय घेण्याची मुभा मिळते.
"साहजिक आहे की या कलमेची तरतूद अशा कळीच्या मुद्द्यांसाठी आणि अटीतटीच्या क्षणांसाठी करून ठेवलेली आहे, ज्यांवर चर्चा करून प्रश्न सोडवायचाही अमेरिकन काँग्रेसकडे वेळ नसतो," असं त्या पुढे सांगताता.
दक्षिण सीमेनजीक खरंच आणीबाणीसदृश परिस्थिती आहे?
स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर आहेच, हे सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधक डेमोक्रॅट्स मानतात. मात्र तो आणीबाणी घोषित करण्याएवढा गंभीर आहे का, हा वादाचा मुद्दा आहे.
एकट्या नोव्हेंबर महिन्यात सीमेवर दररोज 2,000 हून अधिक स्थलांतरितांना माघारी धाडण्यात आलं किंवा त्यांना अटक करण्यात आली. ही परिस्थिती आणीबाणीसदृश आहे, असं स्थलांतरितांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, AFP
मात्र हा आकडा गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत बराच कमी आहे, असं ट्रंप समर्थक आणि स्थलांतरितांना विरोध करणारे म्हणतात. त्यांच्यामते होंडुराससारख्या देशांमधून उत्तरेकडे चालत येणारे हजारो नागरिक अमेरिकेत आश्रय मागत आहेत. असे नागरिक कायदेशीर पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे ही परिस्थिती आणीबाणी घोषित करावी इतकी गंभीर नाही, असं राष्ट्राध्यक्षांच्या आणीबाणी अधिकारांच्या तज्ज्ञ असलेल्या गॉइटीन यांचं मत आहे.
"काहीतरी अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आणीबाणी ही तात्पुरती उपाययोजना असते. त्यामुळे जर भिंतीच्या प्रश्नावरून राजकीय औपचारिकतेला बगल देत ट्रंप असं काही करतात तर तो म्हणजे सत्तेचा गैरवापर असेल," असं त्यांनी सांगितलं.
पण आणीबाणीच्या निर्णय न घेता ट्रंप यांच्याकडे पर्याय म्हणून अमेरिकन राज्यघटनेनुसार दोन मार्ग उपलब्ध असल्याचं गॉइटीन सांगतात.
एक मार्ग असा की, लष्कराच्या प्रकल्पांसाठी अमेरिकेन काँग्रेसने याआधीच मंजूर केलेला निधी मेक्सिको सीमेवर ही भिंत उभारणीच्या कामासाठी वळवता येईल. आणि दुसरा म्हणजे, मेक्सिको सीमेवर भिंत उभारणं, हे काम लष्करी कामाचाच भाग असल्याचं दाखवलं जाऊ शकतं.
ट्रंप यांनी आणीबाणी घोषित करण्यासाठी यापैकी कोणत्या तरी एक कायद्याचा आधार घ्यावाच लागेल, असं गॉइटीन सांगतात.
ट्रंप आपात्कालीन भिंत उभारू शकतात का?
तांत्रिकदृष्ट्या ट्रंप असं करू शकतात. मात्र ट्रंप यांचे विरोधक आणि नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटना या निर्णयाला सहज संमत होऊ देतील, याची शक्यता कमीच आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन काँग्रेस या निर्णयाविरोधात मतदान करू शकतं. हे कसं होणार, हे अद्याप स्पष्ट नाही. पण भिंतीच्या उभारणीला स्पष्ट पाठिंबा देणाऱ्या 'फॉक्स न्यूज'चे राजकीय संपादक ख्रिस स्टायरवॉल्ट यांनी सोमवारी सांगितलं की अमेरिकन काँग्रेस मेक्सिको सीमेवर ट्रंप यांना भिंत उभारू देणार नाही.
ट्रंप यांनी राजकीय अडसर दूर केला तरी न्यायालयाच्या माध्यमातून ट्रंप यांच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकते. माजी अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी कोरियन युद्धाच्या काळात स्टील उद्योगाचं राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. तेव्हाच अशा हालचालींविरोधात कायदेशीर पायंडा रचण्यात आला होता.
ट्रूमन यांना तसं करता आलं नाही तर ट्रंप यांना मेक्सिको सीमेवर भिंत बांधता येणार नाही, असं हाऊस माहिती समितीचे अध्यक्ष अॅडम शिफ यांनी सांगितलं.
यापूर्वी आणीबाणी कधी लागू झाली आहे?
आश्चर्य वाटेल पण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणीबाणी लागू करण्याचा अधिकार सर्रास वापरताना दिसतात. ट्रंप यांच्या आधी राष्ट्राध्यक्षपदी असणारे बराक ओबामा यांनी 13 वेळा या अधिकाराचा वापर केला. त्याआधीचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी 12 वेळा या अधिकाराचा उपयोग केला होता.
ट्रंप यांनी देशात आणीबाणी घोषित केली तर त्यांच्या कार्यकाळात या अधिकाराचा वापर होण्याची ही चौथी वेळ असेल.

फोटो स्रोत, Getty Images
H1N1 आजाराची साथ पसरली होती तेव्हा ट्रंप यांनी या अधिकाराचा प्रयोग केला होता. फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी पर्ल हार्बर हल्ल्यानंतर 1,10,000 जपानी अमेरिकन नागरिकांना स्थानबद्धतेत ठेवण्याचा आदेश दिला होता.
जॉर्ज बुश यांनी फोनटॅपिंग आणि 9/11 हल्ल्यानंतर तपासासाठी अमलात आणलेल्या क्रूर छळाच्या पद्धतीसंदर्भात आणीबाणीच्या अधिकारांचा वापर केला होता.
भिंत उभारून काय साध्य होईल?
या भिंत उभारणीसाठी पहिले तर अमेरिकेला लाखो डॉलर्स नजीकच्या काळात तातडीने उभे करावे लागतील. मेक्सिको या कामासाठी काही प्रमाणात मदत पुरवेल, अशी हमी ट्रंप यांनी दिली होती. पण तसं काही होणार नसल्याचं चित्र आहे.
ट्रंप यांनी आणीबाणी जाहीर केल्यास, 1976 राष्ट्रीय आणीबाणी कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांबाबत नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गॉयटीन सांगतात की"यातून एकच कळतं की का एकंदरच अमेरिकन विधिमंडळ एकट्या राष्ट्राध्यक्षांच्या हातात देश चालवण्याचे सर्व अधिकार देऊ शकत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








