होंडुरासहून जीव वाचवून निघालेल्या शेकडोंना आहे या पुलाचा आधार
- Author, अॅना गॅब्रियला रोखास
- Role, बीबीसी मुंडो
"तो बुडतोय, तो बुडतोय", एक महिला व्याकूळ होऊन ओरडत होती. दोन मुलं सूचीआते नदीत गटांगळ्या खात होते. त्यांना वाचवण्यासाठी 4 जणांनी उडी मारली.
ही मुलं होंडुरासहून ग्वाटेमाला मार्गाने मेक्सिकोमध्ये दाखल झाली होती. नदी ओलांडत असताना ती बुडू लागली. त्यांच्या बचावासाठी नदीत काही जणांनी उड्या घेतल्या. काही वेळानंतर सुरक्षा बोटी तिथं आल्या आणि त्यांनी देखील सर्वांना बाहेर काढून किनाऱ्यावर आणलं.
होंडुरासमध्ये गरिबी, गुन्हेगारी आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून शेकडो जण आपलं नशीब आजमावण्यासाठी अमेरिकेकडे निघाले आहेत. हे लोक आधी ग्वाटेमाला, नंतर मेक्सिको असा प्रवास करत अमेरिकेकडे निघाले आहेत.
ग्वाटेमालातून मेक्सिकोत पोहोचलेल्या लोकांना वाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या शनिवारी अनेक प्रवाशांनी सीमेवर असलेला लांब पूल ओलांडला आणि पुढील प्रवासासाठी मेक्सिकोतून जाण्याची परवानगी मेक्सिकन अधिकाऱ्यांना मागितली.

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिको आणि ग्वाटेमाला या दोन देशांमधली सीमारेषा म्हणजे सूचीआते नदी. ही नदी खोल नाही पण या नदीचं पात्र मात्र विस्तीर्ण आहे. पावसामुळे नदीच्या प्रवाहाला वेग आहे आणि ही नदी पार करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रवाशांनी पुलाखाली एक जाड दोरी बांधली आहे. तिला पकडून ते नदी पार करत आहेत. सीमेचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची एक चौकी या पुलावर आहे.
काही लोकांनी पोहून नदी पार केली तर काही जणांनी तराफ्यानं. प्रवाशांना तराफ्यावर बसवून नदी ओलांडण्यास मदत करू नका, अशी सूचना पोलिसांनी या तराफ्याच्या चालकांना दिली होती, पण काही जणांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिकोच्या पोलिसांनी अद्याप या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पण मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनुसार या लोकांना नियमानुसार वागवलं जाणार आहे. सीमा पार केलेल्या लोकांची संख्या 900 च्या आसपास आहे. त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जाऊ शकतं.
पूल एक महत्त्वाचा टप्पा
होंडुरासहून ग्वाटेमाला मार्गाने आलेल्या लोकांसाठी हा पूल एक महत्त्वाचा टप्पा आहे. नदी पार केल्यानंतर मेक्सिकोत दाखल होण्यासाठी त्यांना अर्ज भरावा लागत आहे. त्यानंतर ते पुढे अमेरिकेच्या प्रवासाला जाऊ शकतील.
अर्ज भरल्यानंतर अधिकाऱ्यांची परवानगी येईपर्यंत अनेक दिवस लागू शकतात. त्यामुळे होंडुरासचे नागरिक त्या पुलावरच अडकून पडले आहेत.
नदी पार करणारा एक प्रवासी ह्वान पाब्लो सांगतो, "आम्ही अडचणीत होतो. अमेरिकेत चांगलं भविष्य असेल, या आशेनं आम्ही प्रवासालो निघालो होतो. पण आता आम्हाला आमच्या देशात परत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. आम्हाला इथेच वाट पाहावी लागत आहे. आता तर आम्हाला ही शाश्वती नाही की आम्हाला पुढे जाऊ दिलं जाणार की नाही."

फोटो स्रोत, Reuters
पाब्लोप्रमाणेच शेकडो लोक पुलावरच अधिकाऱ्यांची वाट पाहत बसले आहेत. या पुलावर प्रचंड उकाडा आहे आणि लोकांची स्थिती बिघडत चालली आहे. ना तिथे शौचालय आहे ना पिण्याचं पाणी. लोक तिथेच लघुशंका करत आहेत, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे.
फक्त काही लोकांकडेच पैसे आहेत त्यामुळे ते अन्न विकत घेऊ शकत आहेत. बाकीचे लोक मिळेल ते खात आहेत.
इथं जागोजागी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. मुलांना उकाडा असह्य झाल्यामुळे मोठे लोक त्यांना कपड्याने हवा घालत आहेत. या उकाड्यामुळे कुणाला चक्कर येऊ शकते किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे अधूनमधून त्यांच्यावर पाण्याचा शिडकाव केला जात आहे.
कुणी बेशुद्ध पडतं तेव्हा त्यांच्यावर पाणी शिंपडलं जातं. अनेक मुलं बेशुद्ध पडत आहेत तर काही महिला बेपत्ता आहे.

फोटो स्रोत, Reuters
काही करून सीमेपलीकडं जाण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत, या आशेवर की मेक्सिको त्यांना मदत करेल.
मेक्सिकोचे अधिकारी प्रवाशांना देशात दाखल करून घेत आहेत पण ही प्रक्रिया फार संथगतीनं होत आहे. "हे एक संकट आहे. सर्वांत जास्त हाल लहान मुलांचे होत आहेत. जर जास्त वेळ घालावावा लागला तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो," असं ग्वाटेमालातील 'यो एमो' या NGOशी संबंधित कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिकोचे राष्ट्रीय संरक्षण आयुक्त रेनाटो सेलेस हेरेडियो यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्ही लोकांचे अर्ज स्वीकारत आहोत. जे लोक हे सिद्ध करू शकतील की त्यांच्या जीवाला त्यांच्या गावात किंवा शहरात धोका आहे, त्यांना आश्रय दिला जाईल."
"प्रत्येक अर्जाची पडताळणी होणार आहे आणि याला किमान चाळीस दिवस लागू शकतात. त्यांचे मते दिवसाला किमान 300 शरणार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जात आहे."

फोटो स्रोत, AFP
काही शरणार्थी मेक्सिकोमध्ये दाखल झाल्यानंतर पुलावर थोडी जागा झाली. पण पाठीमागून आणखी शरणार्थी येत आहेतच. स्थानिक माध्यमांनुसार होंडुरासहून लोकांचा आणखी एक गट निघाला आहे, जो काही दिवसात मेक्सिकोत दाखल होईल.
"पुलावर असलेल्या घाणीमुळं इथं रोगराई पसरण्याचा धोका आहे," असं वर्ल्ड व्हिजन NGOचे टोनातियू मागोस यांनी म्हटलं आहे.
शौचालयांचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे इथं रोगराई पसरू शकते, त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे.
हिंसाचार आणि गरिबी
डानिया, त्यांचे पती आणि चार मुलांसह होंडुरासच्या सान पेडरो सुलाहून निघून मेक्सिकोत आल्या आहेत. त्या सांगतात, "आम्हाला माहीत आहे की हा रस्ता लहान मुलांसाठी सुरक्षित नाही, पण आम्ही काय करू शकतो? आमच्या देशात आम्हाला काही भविष्य नाही. तिथं खूप हिंसाचार आहे आणि आम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे, जिथं परिस्थिती थोडी बरी असेल. अमेरिकेत जाणं हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डानिया यांच्या कुटुंबानं पुलावरच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. इथून लवकर निघता येईल अशी आशा त्यांना नाही. त्यामुळे त्यांनी पुलावरच एक ताडपत्री बांधली आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलांना निदान सावलीत बसायला जागा मिळाली आहे.
या ताडपत्रीमुळे पावसापासून संरक्षण मिळण्याची शक्यता नाही, पण गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही.

फोटो स्रोत, AFP
या प्रवाशांनी हिंसाचार आणि गरिबीपासून स्वतःला वाचवण्यासाठी देश सोडला आहे.
पेड्रो नावाचे एक होंडुरासचे नागरिक सांगतात, "आमच्याकडे ना नोकरी आहे, ना काही काम. गॅंगचा हल्ला होण्याची शक्यतादेखील असते. मेकॅनिकचं छोटं दुकान चालवण्यासाठी मला हफ्ता द्यावा लागायचा. पण मला जास्त दिवस हफ्ता देता न आल्यामुळे दुकान बंद करावं लागलं."
या कंटाळवाण्या आणि धोकादायक प्रवासाला निघालेल्या बहुतेकांना वाटतं की अमेरिकेत त्यांना एक सुरक्षित आयुष्य मिळू शकेल.
15 वर्षांची जेसिका या प्रवासावर एकटीच निघाली आहे. ती सांगते की न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे तिला जायचं आहे. "काही गॅंगस्टरनं मला मारून टाकण्याची धमकी दिली होती."
आईला फोन करण्यासाठी ती अनोळखी लोकांकडून देखील फोन घेते. "माझ्या आईनं रडत रडत मला सांगितलं की स्वतःची काळजी घे," ती भावूक होऊन सांगते.
अमेरिकेत काय स्थिती आहे?
पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना खरंच एक सुरक्षित भविष्य मिळेल का? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं की होंडुरासच्या लोकांना देशात प्रवेश देऊ नका. मध्य अमेरिकेतून आलेल्या प्रवाशांनी त्यांनी नुकतच 'गुन्हेगार' म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
होंडुरासचे राष्ट्रपती ह्वान ओरलांडो अर्नांडेज, ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोरालेज आणि मेक्सिकोचे राष्ट्रपती एनरिक पेन्या निएतो यांनी फोनवर चर्चा केली. निएतो म्हणाले की जागतिक करारानुसार या प्रवाशांचा योग्य तो आदर या देशात केला जाईल.
होंडुरासच्या नागरिकांचा सुरक्षित आणि सुरळित प्रवास होईल, या दिशेनी पावलं उचलली जातील, असं निएतो यांच्या कार्यालयाने काढलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
ग्वाटेमाला आणि होंडुरासच्या राष्ट्रपतींनी म्हटलं की, "ज्या लोकांना परत होंडुरासला जायचं आहे, त्यांच्यासाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केली जाईल."
त्यांचं म्हणणं आहे की किमान 2,000 जण माघारी परतले आहेत. पण अनेक जणांना वाटतं माघारी फिरणं हा पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध नाहीच.
नदी ओलांडणारे डेव्हिड लोपेज सांगतात, "आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता आम्ही माघारी फिरणार नाहीत. मेक्सिकोला पोहोचणंसुद्धा मोठं यश आहे. आता आम्ही इथून पुढे उत्तरेकडे कूच करणार आहोत."
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









