लिबियाजवळ स्थलांतरितांची बोट उलटली, 90 जण बुडाल्याची भीती

लिबियाच्या किनाऱ्यावर वाहून आलेले कपडे

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, लिबियाच्या किनाऱ्यावर वाहून आलेले कपडे

लिबियाच्या किनाऱ्याजवळ स्थलांतरित नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटून 90 जण बुडाल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या विभागानं व्यक्त केली आहे.

बोटीत असलेल्यांपैकी तीन जण वाचले असून बुडणाऱ्यांपैकी बहुतांश जण पाकिस्तानी तर काही लिबियन नागरिकही आहेत.

"दहा मृतदेह लिबियाच्या किनाऱ्यावर वाहून आले आहेत," असं स्थलांतरितांसाठी काम करणाऱ्या International Organization for Migration (IOM) ने म्हटलं आहे.

आश्चर्य म्हणजे बुडलेल्यापैकी अनेक लिबियाचे नागरिकही आहेत, असं बीबीसीच्या उत्तर आफ्रिका प्रतिनिधी राणा जावेद म्हणाल्या.

गेल्या काही वर्षांपासून लिबियाजवळील समुद्रातून अनेक स्थलांतरित दक्षिण युरोप गाठत आहेत. स्थलांतरितांची संख्या कमी होण्यासाठी तसेच त्यांच्या आगमनाला कोणते देश जबाबदार आहेत, यावरून युरोपीय महासंघात वाद सुरू आहेत.

गेल्या वर्षी लिबियाच्या तटरक्षक दलासोबत युरोपीयन महासंघानं एक करार केला होता. या करारान्वये देश सोडणाऱ्या स्थलांतरितांना अडवून त्यांना तत्काळ देशात आणून सोडण्याची जबाबदारी लिबियाच्या तटरक्षक दलाची आहे.

मात्र काही संस्थांनी आणि संयुक्त राष्ट्रांनी यावरून युरोपीयन महासंघावर अमानवी भूमिका घेतल्याबद्दल टीका केली आहे.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)