बेपत्ता नातेवाईकांच्या शोधात त्या खणून काढतात गुपचूप पुरलेले मृतदेह

मेक्सिकोत 2006 पासून 37,000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत, असं सरकारची आकडेवारी सांगते. यातल्या अनेक जणांपर्यंत सुरक्षा यंत्रणांना पोहोचण्यात यश आलेलं नाही. बेपत्ता व्यक्तींचं पुढे काय झालं, या विवंचनेत त्यांचे नातेवाईक आहेत.

मेक्सिकोच्या उत्तरेकडील सिनालोआ राज्यातील एका आईनं मात्र अनोखं पाऊल उचललं आहे. आपल्या मुलाच्या शोधात असणारी ही आई जिथं मृतदेह पुरल्याचा संशय येतो, तिथं जाऊन फावड्याने ते उरकून काढत आहे.

फोटो जर्नालिस्ट अलेझांड्रो सेगारा यांनी या महिलेचा प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता ही एकूण 30 महिलांची टीम आहे.

निवृत्त शिक्षिका मिरना मेडिना यांनी The Searchers नावाच्या एका गटाची स्थापना केली आहे. 2014च्या जुलै महिन्यात मेडिना यांचा मुलगा रॉबर्टो हा एका गावातून बेपत्ता झाला होता.

रॉबर्टो या गावाच्या वेशीवरील पेट्रोल पंपाजवळ सीडी विकण्याचं काम करायचा. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या मते, 14 जुलै 2014ला एका काळ्या रंगाचा ट्रक पेट्रोल पंपाजवळ येऊन थांबला आणि ट्रकमधील माणसांनी रॉबर्टोला आत बसण्यास सांगितलं. त्यानंतर रॉबर्टो कधीच दिसला नाही.

मिरना यांची केस पूर्णपणे वेगळी अशी नाही. एकट्या सिनालोआत 2,700 जण बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाईकानं पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्याची ही प्रकरणं आहेत. यातील बहुतेक जण मृत्युमुखी पडल्याचं म्हटलं जातं.

The Searchers हा गट तयार करणाऱ्या महिलांना ही आकडेवारी चांगलीच माहिती आहे.

आग ओकत्या सूर्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मिरियम रेयेस यांनी टोपी परिधान केली आहे. 2015पासून बेपत्ता असलेल्या पतीचा त्या शोध घेत आहेत.

"माझ्या मुलाला वडिलांची गरज आहे. कमीतकमी त्यांचा मृतदेह तरी मिळावा म्हणजे आम्हाला त्यांचे अंत्यसंस्कार करता येईल," त्या सांगतात.

या महिलांजवळील साधनं खूप साधी आहेत. त्यांच्याजवळ फक्त फावडी आहेत. कधकधी एका ट्रकच्या साहाय्यानं त्या संशयित स्मशानभूमीवर पोहोचतात.

या महिलांना स्थानिकांकडून टीप मिळते. जसं की एखाद्या शेतकऱ्याच्या नांगराला नांगरणी करताना कवटी लागली किंवा एखाद्या मेंढपाळाची मेंढी चरताना तिला हाडं लागली तर या महिला लगेच तिथं धाव घेतात.

अशी टीप मिळाल्यानंतर हा गट प्रवासासाठी सज्ज होतो... भलेही मग तेव्हा तापमान 41 डिग्री का असेना?

या महिलांपैकी एक आहेत हुआना इस्केलाँट. त्या त्यांच्या 28 वर्षीय मुलाच्या अड्रियानच्या शोधात आहेत. अड्रियानचं अपहरण झालं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

"पाच मिनिटांत त्यांनी माझं आयुष्य संपवलं. एका आईचं त्यांनी किती मोठं नुकसान केलं आहे, हे त्यांना माहिती नाही," त्या सांगतात.

कुप्रसिद्ध अशा औषधींच्या कारखान्याला ज्या राज्यानं नाव दिलं त्या सिनालोआमध्ये अपहरण सामान्य बाब नाही.

खंडणीसाठी अपहरण केलं जातं, असं अनेकांना वाटतं. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांवर बळजबरी केली जाते किंवा प्रतिस्पर्धी गँगचा असल्यामुळे त्यांना ठार केलं जातं.

तर तरुण महिलांचं अपहरण करून त्यांची विक्री केली जाते.

बेपत्ता झाल्लेया व्यक्तीचं पुढे काय झालं, याबाबत बहुतेक कुटुंबीयांना काहीच थांगपत्ता लागत नाही.

The Searchers या गटाला हे बदलायचंय. 2014पासून त्यांना जवळपास 200 मृतदेह सापडले आहेत.

मृतदेह सापडल्यानंतर ते त्याला DNA चाचणीकरता पाठवतात. यांतील DNAचे नमुने बेपत्ता असलेल्या 700 जणांपैकी एखाद्याच्या DNAशी जुळले तर ते संबंधितांच्या कुटुंबीयांना कळवलं जातं.

आतापर्यंत त्यांनी शोधलेल्या अवशेषांपैकी निम्म्या लोकांची ओळख पटली आहे.

मिरना येथे त्या महिलेला मिठी मारत आहेत जिचा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर 4 महिन्यांनी त्याचे अवशेष सापडले.

31 जानेवारीला लुईस शावेझ बेपत्ता झाला आणि 30 मार्चला त्याचे अवशेष सापडले. लॉस मोचिस येथे कुटुंबीयांनी त्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला.

अवशेष शोधण्यासाठी महिला जी पद्धत वापरत आहेत ती एकदम मूलभूत आहे. फावड्यांच्या साहाय्यानं त्या खोदकाम करतात. त्यानंतर तिथून मृतदेहाच्या कुजण्याचा वास येतोय का, याचा त्या शोध घेतात.

मिरना यांना मुलाचा रॉबर्टोच्या जागेचा शोध घेण्यासाठी तीन वर्षं लागले. पेट्रोल पंपावरून मुलाचं अपहरण झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांना टीप मिळाली की, रॉबर्टोला एका दुर्गम भागात दफन करण्यात आलं आहे.

त्यांनी तिथं काळजीपूर्वक खोदकाम केलं. तिथल्या हाडांच्या तुकड्यांना एकमेकांशी जोडून घेतलं. नंतर ते अवशेष रॉबर्टोच्या DNAशी जुळले.

मिरना यांनी रॉबर्टोचे अवशेषांचा शोध लावल्यानंतर त्यांनी इतरांना यासाठी मदत करायला सुरुवात केली.

खाली बेपत्ता मुलाचा रिपोर्ट नोंदवायला आलेली महिला या चिंतेत आहे की, तिच्या मुलासोबत काय घडलं असेल?

"मी तक्रार दाखल केली नव्हती, कारण मला माझ्या मुलाला जिवंत बघायचं होतं," मुलगा बेपत्ता झाल्याच्या 6 वर्षांनंतर तक्रार का दाखल करत आहात, या अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर ही महिला उत्तर देत होती.

या 30 जणांच्या गटात सर्वात जास्त बेपत्ता लोकांच्या आया आहेत, पण यात काही पुरुषही आहे.

डॉन पांछो गेल्या 4 वर्षांपासून बेपत्ता मुलाच्या शोधात आहेत.

पण फक्त पालकांनाच याचा त्रास होतो असं नाही. बेपत्ता झालेल्या लोकांमागे त्यांची मुलंही असतात. आपल्या पालकांसोबत काय झालं, हे या मुलांना माहिती होत नाही.

लुसा गुआडालुपी यांचा मुलगा 2016मध्ये दोन गावांमधल्या रस्त्यावरून बेपत्ता झाला. त्यांच्या मुलीला आज वडिलांची कमतरता जाणवते.

.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)