कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या 'या' फुलाचा शोध 2018 मध्ये लागला

२०१८ हे वर्ष सरायला काही दिवसच उरले असताना यावर्षी नवीन काय कमावलं याचा लेखाजोखा मांडायला सुरुवात झाली आहे. अर्थव्यवहार, क्रीडा, मनोरंजन, व्यापार, विज्ञान यांपैकी कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. वनस्पती विज्ञानाच्या क्षेत्रामध्येही शास्त्रज्ञांनी २०१८ या वर्षात वनस्पतींच्या अनेक प्रजाती शोधून काढल्या आहेत.

रॉयल बॉटनिक गार्डन्स येथील शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या शंभरहून अधिक प्रजाती शोधून त्याचं नामकरणही केलं आहे. या यादीमधे कीटकभक्षी वनस्पतींपासून औषधी गुण असलेली रोपं तसंच विलक्षण प्रकारच्या ऑर्किड्सचा समावेश आहे.

धबधब्यामध्ये सापडलेली औषधी वनस्पती

प्राध्यापक आयहा लेबी यांना सिएरा लिओन इथल्या एका धबधब्याजवळच्या खडकाला चिकटलेली वनस्पती आढळली. त्यांनी त्या वनस्पतीचा नमुना क्यू इथल्या रॉयल बॉटनिकल गार्डनला पाठवला. तिथं ही नवीन प्रजाती असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला. या वनस्पतीचं नाव तिचा शोध लावणाऱ्या प्राध्यापक लेबी यांच्या नावावरबनच लेबिया ग्रँडीफ्लोरा असं ठेवण्यात आलं.

"त्या विशिष्ट वर्गात आढळणाऱ्या प्रजातीपेक्षा लेबिया ग्रँडीफ्लोराचे गुणधर्म बरेच वेगळे दिसून आले. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की आपल्याला काहीतरी विलक्षण आढळलं आहे," प्राध्यापक आयहा लेबी यांनी सांगितलं.

"आता या औषधी वनस्पतीसोबत माझं नाव कायमस्वरुपी जोडलं गेलं आहे," असंही ते म्हणाले.

ही वनस्पती नामशेष होण्याचा धोका असलेल्या प्रजातींच्या गटात मोडते. कारण ही जिथं सापडली त्या भागात खाणकाम तसंच जलविद्युत प्रकल्पांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या कामांमुळे येत्या काही वर्षांतच ही औषधी वनस्पती नामशेष होईल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

निर्जन बेटावर सापडलेली कीटकभक्षी वनस्पती

नरभक्षी वनस्पतींच्या जगभरात १५० हून अधिक जाती आहेत. नव्याने आढळलेली 'नेपेन्थेस बियाक' ही वनस्पती केवळ इंडोनेशियन न्यू गिनीच्या उत्तर किनाऱ्यावरील बेटावरच आढळून येते.

या बेटांजवळ बऱ्याचदा पर्यटकांची जहाजं थांबतात. प्रवाशांच्या नेहमी होणाऱ्या वावरामुळे या वनस्पतीचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे.

तातडीने पावलं उचलली न गेल्यास ही दुर्मिळ कीटकभक्षी वनस्पती नामशेष होईल, अशी भीती क्यु येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मार्टिन चीक यांनी व्यक्त केली आहे. पुढच्या पिढीसाठी आपण या वनस्पतींचं जतन करून ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कॅन्सरवर गुणकारी ठरू शकणारं फूल

कॉफी वर्गातील या नवीन वनस्पतीचं नाव किंडिया गँगन असं ठेवण्यात आलं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनी इथल्या किंडियामध्ये रॉयल बॉटनिकल गार्डनच्या शास्त्रज्ञांना ही वनस्पती आढळून आली.

वाळूच्या खडकावर हे रोपं वाढतं. या वनस्पतीच्या फुलामध्ये कॅन्सरवर उपचारासाठी प्रभावी ठरणारे गुणधर्म असल्याचा शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज आहे.

ऑर्किडचं सुंदर फूल

नजरेला सुखावणारं सौंदर्य असलेल्या या ऑर्किडची व्हिएतनामची राजधानी लाओस इथं बिनदिक्कतपणे तस्करी केली जाते. त्यामुळेच ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

जुन्या फोटावरून ओळखली गेलेली वनस्पती

क्यूमध्ये सापडलेल्या एका फोटोवरुन या वनस्पतीची ओळख पटवली गेली. 'क्लायम्बिंग याम' असं या वनस्पतीचं नाव आहे.

जगातील अनेक भागांमध्ये खाद्यान्न म्हणूनही याम वापरलं जातं. जवळपास सोळा वर्षांपूर्वी क्यूमध्ये या वनस्पतीचा नमुना पाठवण्यात आला होता.

तो वाळवून जतन करण्यात आला होता. त्यावरूनच 'क्लायम्बिंग याम'ची ओळख पटवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नाताळमधील सहा ठिकाणी याम आढळून आली आहे.

व्हिएतनाममधील फुलझाड

गडद पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेलं हे झाड उत्तर व्हिएतनाममध्ये आढळून आलं आहे. 'ओरिओचारिस ट्रायब्रॅक्टेटा' असं या प्रजातीचं नाव आहे. ही वनस्पती युकेमध्येही आढळून यायची.

आफ्रिकेच्या वर्षावनातील प्रचंड वृक्ष

पश्चिम आफ्रिकेतील गिनीमधल्या वर्षावनात हा प्रचंड वृक्ष आढळून आला आहे. वसंत ऋतूमध्ये हे झाड गुलाबी रंगाच्या फुलांनी बहरून जातं. तालबोटेलिया चिकेयी या शास्त्रीय नावाने ओळखले जाणारं झाड शास्त्रज्ञांना 2015 पर्यंत माहितीच नव्हतं.

मसाल्याचं झाड

पिमेन्टा बर्सेली या रोपापासून अलस्पाइस नावाचा घटक मिळतो. हा घटक अन्नपदार्थ आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्यावसायिक तत्त्वावर हे रोप अतिशय महत्त्वाचं आहे.

गुलाबी फुलांचं रोप

बोलिव्हियामध्ये सापडलेल्या या रोपावर सुंदर गुलाबी फुलं येतात. या रोपाच्या उपयुक्ततेवर अजूनही संशोधन सुरू आहे.

कॅमेरूनमधली नमषेश होणारी वनस्पती

कॅमेरूनमधल्या बामेन्डा हायलंड्सच्या भागात आढळणारी वेप्रिस बाली ही वनस्पती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे ही वनस्पती नष्ट झाली असं वाटत असताना या जातीची काही रोपं आढळल्यानं शास्त्रज्ञांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)