नेपाळमध्ये नव्या भारतीय नोटांवर बंदी

फोटो स्रोत, Reuters
नेपाळमध्ये भारतीय चलनातल्या 2000, 500 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत. 2016मध्ये भारतात झालेल्या नोटबंदीनंतर या नोटा चलनात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनंतर नेपाळने नव्या भारतीय नोटांना बेकायदेशीर ठरवलं आहे.
याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी प्रतिनिधी भूमिका राय यांनी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये उपस्थित असलेले बीबीसी हिंदी रेडिओचे संपादक राजेश जोशी यांच्याशी बातचीत केली.
ते सांगतात की, कॅबिनेटने सोमवारीच याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, पत्रकारांना याबाबतची माहिती गुरूवारी देण्यात आली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,"नेपाळनं भारतातून येणाऱ्या 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांवर बंदी घातल्याचं सरकारचे प्रवक्ते गोकुळ बास्कोटा यांनी सांगितलं आहे."

फोटो स्रोत, Reuters
भारतात झालेल्या नोटबंदी नंतर हा मुद्दा कायमच चर्चेचा विषय बनला असल्यांचंही त्यांनी सांगितलं.
दोन वर्षांनंतर का काढला हा मुद्दा?
भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं. भारतात जेव्हा नोटाबंदी झाली, त्यावेळी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या जुन्या नोटा लोकांकडे होत्या. त्या अजूनही त्यांच्याकडेच आहेत. भारतानं त्या परत घेतलेल्या नाहीत.
नोटबंदीनंतर नेपाळच्या अनेक बँकांमध्ये जवळपास 8 कोटींच्या जुन्या भारती नोटा तशाच पडून आहेत. ज्या परत चलनात आल्याच नाहीत. त्या नोटांचा नेपाळ सरकारला काहीही उपयोग करता आलेला नाही.

फोटो स्रोत, AFP
याच मुद्द्यावरून नेपाळमध्ये भारताविरोधात थोडे नाराजीचे सूर उमटले.
नेपाळचे परकीय चलन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी संचालक भीष्मराज ढुंगाना यांनी सप्टेंबर २०१८मध्ये भारत आपल्या जुन्या नोटांना का बदलत नाही, असा सवाल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जनकपूरधामचं दर्शन घेण्यासाठी नेपाळला गेले होते तेव्हा देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, बीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी सांगतात.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी देखील हा मुद्द अनेकदा उपस्थित केला आहे.
वारंवार हा मुद्दा नजरेत आणून देखील त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्यामुळे इथं असंतोष वाढत गेला आणि म्हणूनच कदाचित नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतला, असं जोशी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
असं असलं तरी नेपाळ सरकारने २०००, ५०० आणि २०० च्या नव्या नोटांव्यतरिक्त इतर नोटांविषय काहीही सांगितलेलं नाही. १००ची नोट चालेल की नाही, हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही.
दरम्यान, या मुद्द्यावरून दोन्ही देशांमधल्या संबंधांवर काय परिणाम होतील हे सांगण थोडं कठीण असल्याचंही राजेश जोशी सांगतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा भारत सरकार किंवा नापळमधल्या भारतीय राजदुताला याची कल्पना असणार.
त्याबरोबरच नोटबंदीवरून दोन्ही देशात मतभेत असले तरी, दोघांमध्ये सुसंवाद सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








