दृष्टिकोन : 'कट्टर राष्ट्रवादाच्या नादात मीडिया करतोय मोदीपूजा'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शिव विश्वनाथन
- Role, समाजशास्त्रज्ञ
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मीडियाचं कुठलंही मूल्यमापन हे मोदी यांना मीडियानेच बनवलं आहे, याच आधारावर सुरू होतं. नरेंद्र मोदी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रयत्नांची परिणती नाही.
मीडियाच होता ज्याने स्वप्नं दाखवली, कहाण्या रचल्या. अमेरिकन कॉमिक्समधल्या रोशैख या नायकाप्रमाणे (जो अन्यायाविरोधात लढतो आणि गुन्हेगारांना कुठल्याही परिस्थितीत शिक्षा करतो) चित्र रंगवलं. यामुळे लोकांची भावना झाली की आता काँग्रेसमध्ये काहीच उरलं नाही आणि त्यांना पर्याय फक्त मोदी आहेत.
मीडियानं एक अशी व्यक्तीरेखा बनवली, जी सक्रिय, धाडसी, निर्णायक, सक्षम आणि कणखर होती. ते एका 'इंप्रेशनिस्ट पेंटरप्रमाणे' हळूहळू त्यांचं एक जिवंत चित्र रंगवत गेले.
दोन दशकांपूर्वी मोदींचं नाव एखाद्या अफवेसारखं होतं. ते हळूहळू चर्चेचा विषय बनले आणि मग मीडियानं त्यांची एक प्रतिमा बनवली. नंतर त्यांना एक आयकॉन म्हणजेच आदर्श बनवून टाकलं. नरेंद्र मोदी हे मीडियाचाच आविष्कार आहेत. मोदी हे मीडियाचीच निर्मिती आहे.

फोटो स्रोत, Getty Images/ INDRANIL MUKHERJEE
मीडियाचा मोदींशी संबंध काय, हा प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारण्याची गरज आहे. प्रश्न हा आहे की मीडिया त्यानेच तयार केलेल्या या व्यक्तीरेखेकडे कसा बघतो, जी आता पंतप्रधानपदी आहे. याचं उत्तर काळजीत टाकणारं आहे. मीडियाने समीक्षक असावं, वास्तव मांडणारं आणि संतुलित असावं, अशी जनतेची अपेक्षा असते.
पण मीडिया मोदींचा फॅन ही दु:खाची गोष्ट आहे. मीडियानं आत्मपरीक्षण करणं सोडून दिलं आहे. मीडियानं जिथं लोकांपर्यंत सत्य पोहोचवायला हवं होतं आणि समीक्षकाची भूमिका बजावायला हवी होती तिथं कट्टर राष्ट्रवादाच्या नादात ते मोदींची व्यक्तीपूजा करू लागलेत.
बातमी आणि जाहिरातीतील अंतर
वर्तमानपत्रांमधे मोदींवर छापून आलेले लेख आणि जाहिराती सारख्याच वाटतात. यावरून वाटतं मोदी भारताचे किम इल संग बनलेत, जे उत्तर कोरियाचे पहिले सर्वोच्च नेते होते. असे नेते ज्यांना कुणीही प्रश्न विचारत नसे.

फोटो स्रोत, EPA
नरेंद्र मोदींबद्दल सुरुवातीला कुणालाही सहानुभूती वाटू शकते. कारण मीडियानं त्यांना एक अशी व्यक्ती म्हणून दाखवली जी बाहेरची आहे आणि एक साधारण चहावाला असूनही दिल्लीच्या ल्युटेन्स किल्ल्यात दाखल झाली आहे.
आता या काल्पनिक गोष्टीचं आकर्षण कायम रहावं यासाठी काही बाबींवर वारंवार जोर दिला जातो.
मीडिया परस्परविरोधी अशा दोन्ही बाजूनं बोलतो. एकीकडे म्हणतात मोदी नवखे आहेत, म्हणून त्यांचे स्वागत करा, तर दुसरीकडे त्यांना काळाची गरज सांगितलं जातं.
असं वाटतं जणू 2019च्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ही परिस्थिती अमित शहांना सुखावू शकते. पण मीडियाच्या संशय आणि समीक्षा करण्याच्या आणि त्याचा माग काढण्याच्या भूमिकेला पूर्ण करत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मीडिया असा काही वागतो जणू देशात मोदींव्यतिरिक्त काही नाहीच. रंगवून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे मीडियावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि त्यांच्या विश्लेषणावर संशय निर्माण होतो.
या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी तीन-चार बाबींवर बोलूया. पहिली अर्थातच नोटबंदी. मीडियानं नोटबंदीला देशात साजरा होत असलेल्या एखाद्या उत्सवाप्रमाणे दाखवलं.
देशांतील मध्यम वर्गानं सुरुवातीला याला भ्रष्टाचारविरोधी लढा समजलं असेलही. पण नोटबंदी ही अनौपचारिक अर्थव्यवस्था आणि नगदीची गरज पडणाऱ्या धंद्यांविरोधातली लढाई असल्याचं लवकरच स्पष्ट झालं.
मीडिया जनतेच्या अडचणींकडे कानाडोळा करत आलाय. नोटबंदीनामक या उत्सवात मीडियानं व्यापक समस्यांपुढे डोळे मिटून घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरं म्हणजे मीडियाला सुरुवातीला कदाचित नोटबंदीमुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज आला नसेल. पण काही काळानंतर तरी याचं विश्लेषण करता आलं असतं. मात्र विश्लेषणात केलेली बेईमानी रिपोर्टिंगमधल्या अवास्तवतेला दाखवतो.
एक नैतिक रितेपण
आता परराष्ट्र धोरणाबद्दल बघू. शिंजो आबे, व्लादिमीर पुतिन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उभं राहून मोदी आकर्षक असं चित्र तयार करतात आणि त्यामुळे सगळेच मोहित होतात. मीडियाही यात भर घालतो.
मात्र त्याचवेळी मीडिया या चारही देशांतलं नैतिक रितेपणाला विसरतो.
नरेंद्र मोदी येमेन, सीरिया आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर गप्प आहेत. आशियाबद्दल त्यांचे विचार ठाम आहेत. तरीही मीडिया इस्रायलविषयी प्रश्न न विचारता इस्रायल बाबतीत मोदींच्या सहकाऱ्याची भूमिका निभावतो. संरक्षण करारामध्ये इस्रायलच्या भागिदारीचं स्वागत करतो.

फोटो स्रोत, Getty Images
अशाप्रकारे स्वसंरक्षणावर भर देणाऱ्या भारताला मीडिया आणि मध्यमवर्गाकडून स्तुती मिळते.
लक्षपूर्वक बघितलं तर मोदींनी चीनच्या प्रश्नावर तिबेटला धमकावणे आणि अपमानित करण्यापलीकडे फारसं काही केलेलं नाही. फक्त पाकिस्तानसंबंधी थोडंफार केलं आहे.
मात्र मीडिया परराष्ट्र धोरणावर गंभीर दिसत नाही. याविषयावर मोदींचं प्रत्यक्ष आकलन फार कमी आहे. मीडियाकडे फार कमी संशय आणि प्रश्न आहेत.
आम्ही पाकिस्तान आणि चीनवर आभासी विजयाचा आनंद साजरा करतो. जिथे मीडिया वास्तव दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता, तो हाजी हाजी करण्यात दंग आहे आणि जनतेप्रती आपल्या जबाबदारीशी दगा करतोय.
'मॉब लीन्चिंग'बाबात मोदींच्या भूमिकेवर मीडियाचा दृष्टीकोन अधिकच लाजिरवाणा आहे. मीडिया मोदींच्या प्रतिक्रियेला उजळवण्याचा प्रयत्न करतोय.
मीडियाजवळ वेगळा दृष्टीकोन नसणं खरंच चिंतेची बाब आहे. मोदींनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले होते. मात्र आताच्या घटनांवर ते काहीही बोलण्यास तयार नाहीत.

फोटो स्रोत, EPA
नरेंद्र मोदींचं यश आणि दोष यावर मीडियाच्या चालढकल वृत्तीमुळे जाहिरात कुठे संपते आणि मोदींचं संतुलित मूल्यमापन कुठे सुरू होते, हे सांगणं कठीण होऊन जातं.
इतकेच काय मीडिया आसामवरही मूग गिळून गप्प बसलाय. केवळ काही थातूरमातूर विश्लेषण सुरू आहे. नागरिकांच्या रजिस्ट्रीला भारताच्या महान परंपरेप्रमाणे दाखवलं जात आहे.
अशा सर्व परिस्थितीत देशात विरोध आणि मतभेदांसाठी जागा उरत नाही.
आशा करुया मीडिया लोकप्रियतेच्या (किंवा बहुसंख्याकवादाच्या ) इशाऱ्यावर नाचण्याऐवजी आपल्या खऱ्या भूमिकेत परत येईल.
मीडियाने आणीबाणीच्या काळात वेगळीच भूमिका निभावली होती. मीडिया 2019च्या निवडणुकीआधी टीका आणि धाडसी पत्रकारिता पुन्हा सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.
हे विरोध आणि लोकशाहीचं मीडियावर कर्ज आहे.
(हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








