जेव्हा वडिलांना अखेरचा निरोप देताना जॉर्ज बुश यांना रडू कोसळतं...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W बुश (कनिष्ठ) यांना त्यांचे वडील आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज HW बुश (ज्येष्ठ) यांना शेवटचा निरोप देताना रडू आवरलं नाही.

वॉशिंग्टनमध्ये शासकीय इतमात ज्येष्ठ जॉर्ज बुश (94) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जॉर्ज HW बुश हे एक 'महान पुरुष' आणि 'उत्तम वडील' होते अशा शब्दात त्यांनी वडिलांना श्रद्धांजली दिली.

लोकसेवा ही किती महत्त्वाची आणि गरजेची आहे, हे वडिलांनी मला पटवून दिलं, असंही जॉर्ज बुश (कनिष्ठ) म्हणाले.

"संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अपयशाला पचवायला पाहिजे, पण त्यामुळे आयुष्य जगण्याचा धीर सोडता कामा नये. अडथळे हे तुम्हाला कसं खंबीर करतात हे त्यांनी मला शिकवलं."

अंत्यसंस्कारादरम्यान भाषण करताना बुश यांचा गळा दाटून आला. ते म्हणाले, "आमच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमधून कळेल की तुमचं आमच्या आयुष्यात असणं हे आमच्यासाठी कुठल्याही वरदानापेक्षा कमी नव्हतं. तुम्ही खरंच खूप मोठे होतात. कोणत्याही मुलाला किंवा मुलीला हवे असणारे तुम्ही एक महान आणि थोर वडील होतात."

हयात असलेले अमेरिकेचे सर्वं माजी राष्ट्राध्यक्ष या अत्यसंस्कारादरम्यान उपस्थित होते. वॉशिंग्टन DC मधल्या राष्ट्रीय कॅथेड्रलमध्ये जॉर्ज HW बुश यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठीची प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती.

जॉर्ज HW बुश हे अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी 1989 ते 1993 दरम्यान राष्ट्रध्यक्षपद भूषवलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)