सौदी अरेबियाचे युवराज वेडे आणि धोकादायक - अमेरिकी सिनेटर

CIAने दिलेल्या माहितीनंतर जमाल खाशोग्जी यांच्या मृत्यू प्रकरणात सौदी अरेबियाच्या युवराजांचा हात होता, याबाबत कुठही दुमत नाही, असं अमेरिकेचे सिनेटर लिन्डसे ग्रॅहम यांनी म्हटलं आहे.

"मोहम्मद बीन सलमान यांनीच जमाल खाशोग्जी यांची हत्या घडवून आणली याचा मला पूर्ण विश्वास आहे," असा सरळ आरोपच सिनेटर लिन्डसे ग्रॅहम यांनी केला आहे.

सौदीचे युवराज हे "वेडे आणि धोकादायक" आहेत, असं साऊथ कॅरोलिनामधल्या रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटरच म्हणणं आहे.

जमाल खाशोग्जी हत्येप्रकरणात सौदी सरकारनं 11 जणांना ताब्यात घेतलं आहे पण, युवराज सलमान यांचा यामध्ये सहभाग नसल्याचं जाहीर केलं आहे.

सिनेटर काय म्हणाले?

दरम्यान, मंगळवारी CIAचे संचालक गिना हॅस्पेल यांनी सिनेट कमिटीला जमाल खाशोग्जी यांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर सिनेटच्या सदस्यांनी कोणतीही चर्चा केली नाही.

इस्तांबूलमधल्या सौदी अरेबियाच्या दुतावासात खाशोग्जी यांची हत्या करून त्यांचे तुकडे केले होते, असं सांगितलं जातं.

जोपर्यंत सध्याचे युवराज सत्तेत आहेत तोपर्यंत अमेरिकेने सौदी अरेबियाला शस्त्र पुरवठा करू नये, असं या सिनेटरनं म्हटलं आहे.

न्यूजर्सीमधले डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बॉब मेनेंदेज यांनीही सिनेटर लिन्डसे ग्रॅहम यांच्या दाव्याशी सहमत असल्याचं म्हटलं आहे.

"जागतिक पातळीवर अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं अमेरिकेने खडसावून सागितलं पाहिजे," असं ते म्हणाले.

सौदी युवराजांना MBS असं उद्देशून, "युवराज MBS यांनी खाशोग्जी यांच्या हत्येचा आदेश दिला याबाबत मला तिळमात्र शंका नाही," असं बॉब कॉर्कर या आणखी एका सिनेटरने म्हटलं आहे.

माझ्याकडे या केसची सुनावणी आली असती तर 30 मिनीटात मी त्यांना सजा सुनावली असती, असं कॉर्कर म्हणाले.

"राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकाराच्या मृत्यूविषयी दु:ख व्यक्त केलं, पण सौदीच्या युवराजांचा निषेध करण्याचं टाळलं आहे," असं ते म्हणाले.

सौदीचे युवराज आणि हत्या घडवून आणणाऱ्या त्यांच्या देशांच्या समुहाला तुम्ही कसं काय वेगळं करू शकता? असा प्रश्न अलाबामाचे सिनेटर रिचर्ड शिलेबी यांनी मांडला.

येमेनमधला संघर्ष थांबवण्यासाठी सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या प्रयत्नांचा अमेरिकेने पाठिंबा काढून घ्यावा का, या प्रस्तावावर सिनेट मतदान घेण्याचा विचार करत आहे.

"हत्येमध्ये सौदी नेत्याचा हात होता हे आपल्या सरकारला माहीत आहे तर ते लोकांना का सागंत नाहीत?," सिनेटर ख्रिस मुर्फी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)