हवामान बदलाबद्दल ऑस्ट्रेलियाची 'लाजिरवाणी कामगिरी': हजारो विद्यार्थी रस्त्यांवर

    • Author, फ्रान्सिस माओ
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, सिडनीहून

हवामान बदलावर काहीतरी काहीतरी ठोस पावलं उचलली जावी, या मागणीसह ऑस्ट्रेलियात हजारो विद्यार्थी शाळा, कॉलेज सोडून रस्त्यांवर उतरले आहेत.

हवामान बदलबाबत ऑस्ट्रेलियन सरकारचं एक ठाम धोरण नाहीये, असं आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांचं म्हणणं आहे.

शाळा सोडून मुलांनी आंदोलन करणं चुकीचं आहे. सरकार योग्य ती पावलं उचलत आहे, असं ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर आंदोलन आणखी बळकट करण्यासाठी आणखी उर्मी आल्याचं अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे.

"त्यांनी (राजकारण्यांनी) आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम उद्या आम्हालाच भोगावे लागणार आहेत," असं जगवीर सिंग (17) या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितलं.

स्वीडनमधल्या ग्रेटा थनबर्ग या 15 वर्षांच्या मुलीच्या आंदोलनातून आम्हाला प्रेरणा मिळाली, असं आंदोलनाचे आयोजक म्हणाले. ग्रेटाने स्वीडनमध्ये हवामान बदलाविरोधात असंच आंदोलन उभं केलं होतं.

पॅरिस कराराअंतर्गत ऑस्ट्रेलियाने आश्वासन दिलं आहे की ते आपलं कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत 2005च्या पातळीपेक्षा 26 ते 28 टक्क्यांनी कमी करतील.

अपारंपरिक ऊर्जेचं लक्ष्य, स्वच्छ ऊर्जा निधी आणि जलविद्युत प्रकल्पांचा हवाला देत ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य पूर्ण करेल, असं मॉरिसन नुकतेच म्हणाले होते.

"मुलांनी शाळेत जाऊन आंदोलनं करण्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं," असं वक्तव्य त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत केलं आहे.

संयुक्त राष्ट्राने गेल्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियासह अनेक देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचं म्हटलं होतं.

ऑस्टेलियाने त्यांच्या हवामान विषयक धोरणात गेल्या वर्षीपासून कोणताही बदल केला नसल्याची माहिती UNच्या Emissions Gap Report या अहवालात दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सर्व राज्यांच्या राजधानी आणि 20 उपगनगरांमध्ये हवामान बदलाविरोधात School Strike 4 Climate Action ही चळवळ सुरू आहे.

'मतदानाचा अधिकार मिळेपर्यंत अशी गप्प बसू शकत नाही'

बीबीसीने या आंदोलनात सहभागी झालेल्या शाळकरी मुलांना त्यांच्या कारणांविषयी विचारलं.

व्हिक्टोरिया राज्यातल्या 14 वर्षांच्या मिलू अल्ब्रेक्ट आणि हॅरिएट ओशिआ कॅरी यांच्या कल्पनेतून या आंदोलनाला सुरुवात झाली.

"हवामान बदलाच्या या आपत्कालीन परिस्थितीविषयी आम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतो," असं हॅरिएट सांगते. "आम्ही अनेक पत्रं लिहिली. पण त्याचा काहीही फरक पडला नाही. शिक्षण आमची ताकद आहे. त्याच्या बळावरच आम्ही मोठं काम करू शकतो," असं तिनं पुढं सांगितलं.

"आमच्या सरकारने हवामान बदल ही एक आणिबाणी आहे हे सार्वजनिकरित्या मान्य करावं. त्यांनी कोळशाच्या खाणी खाणणं थांबवावं, नवीन खाणींना परवानगी देऊ नये आणि अपारंपारिक उर्जेकडे वळावं" असं मिलौ अल्ब्रेक्ट सांगते.

जॉन हिंचक्लिफ या 14 वर्षांच्या मुलीला व्हिक्टोरियात आंदोलनाची ठिणगी उडल्याची दिसल्यावर तिने तिच्या सिडनी शहरात असं आंदोलन उभं करायचं ठरवलं.

"मला मतदानाचा अधिकार मिळेपर्यंत मी अशी गप्प बसू शकत नाही. हवामान बदल हे वास्तव आहे, हे सर्व तरुण लोकांना माहिती आहे आणि राजकारण्यांच्या धोरणलकव्याला आम्ही कंटाळलोय," असं जुलियन सांगते.

समद्राची पातळी वाढत आहे. आमच्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होईल, हा विचारच भयावह आहे, असं ती पुढं सांगते.

फेसबुकवर इतर शहरातली आंदोलनं पाहून रुबी वॉकर (16) हिने तिचं शहर इन्व्हरेल या ठिकाणी आंदोलन केलं.

अमेरिकेत पर्यावरण आणि बंदुकींविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेही प्रेरणा मिळाली, असंही रुबीने सांगितलं.

"माझ्या मते सोशल मीडियाची यामध्ये मोठी भूमिका आहे. जगभरातील अनेक घडामोडी तुम्हाला समजतात आणि विद्यार्थी अशा मोहिमांसाठी उभे राहत आहेत, हेसुद्धा कळतं," असं ती म्हणाली.

"मला वाटतं हवामान बदलाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाची कामगिरी लाजिरवाणी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)