प्लास्टिकच्या प्रेमात आपण कधी आणि कसे पडलो? ही घ्या 8 कारणं

प्लास्टिक वातावरणासाठी अत्यंत हानीकारक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण तरी ते वापरण्याचा ना आपल्याला मोह आवरतो, ना तो वापर थांबवण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करताना दिसतो. कारण या मानवनिर्मित वस्तूच्या प्रेमात पडण्याची काही चांगली कारणंही आहे.

मानवाचं प्लास्टिकशी असलेला विचित्र नातं आणि आधुनिक जीवनशैलीत त्याचं महत्त्व, याविषयी पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ आणि ब्रॉडकास्टर प्राध्यापक मार्क मिओडॉनिक यांनी अभ्यास केला. तर या प्लॅस्टिकने आपलं आयुष्य कसं व्यापलं आहे, बघूया.

1. हस्तिदंताला पर्याय म्हणून प्लॅस्टिकचा जन्म

आश्चर्य वाटेल मात्र सर्वांत आधी व्यावसायिक वापरासाठीचं प्लॅस्टिक कापसापासून तयार करण्यात आलं होतं.

1863मध्ये हस्तिदंताचा तुटवडा पडू लागला होता. त्याकाळी हस्तिदंतापासून बिलियार्ड्स खेळाचे चेंडू बनविणाऱ्या एका अमेरिकी कंपनीने हस्तिदंताच्या चेंडूला पर्याय ठरू शकणारा पदार्थ शोधणाऱ्या संशोधकाला दहा हजार अमेरिकी डॉलर्सचं बक्षिस जाहीर केलं.

तेव्हा जॉन वेस्ले हयात या एका नवशिक्या संशोधकाने हे आव्हान स्वीकारलं आणि कापूस तसंच नायट्रिक अॅसिडवर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यातून त्याने सेल्युलोझ नायट्रेट हा नवीन पदार्थ तयार केला, ज्याला त्याने नाव दिलं 'सेल्युलॉइड'. फिकट पांढरा आणि लवचिक असणारा हा पदार्थ योग्य वातावरणात आपला आकार टिकवू शकत होता.

मात्र दुर्दैवाने या सेल्युलॉईडपासून तयार केलेल बिलियर्ड चेंडू स्फोटक होते आणि एकमेकांवर आदळल्यावर त्यांचा जोरदार आवाज व्हायचा.

असं असलं तरी हयात यांनी शोधून काढलेल्या या मटेरियलचा पुढे सिनेमाची रीळ बनवण्यापासून हजारो कामांसाठी उपयोग झाला.

2. प्लॅस्टिकमुळे शक्य झाली सिनेमाची निर्मिती

अगदी सुरुवातीला सिनेमाच्या फिल्म कागदापासून तयार करण्यात आल्या होत्या. मात्र सेल्युलॉइडची क्षमता आणि लवचिकता लक्षात आल्यामुळे सिनेमाची फिल्म बनवण्यासाठी ते उत्तम मटेरियल ठरलं.

या ज्वलनशील प्लॅस्टिकपासून मोठमोठ्या पट्ट्या तयार करणं शक्य झालं. त्याला विशिष्ट रासायनिक द्रव्याने रंगवलं की प्रकाश पडल्यावर त्याचं प्रतिबिंब पडायचं. या सेल्युलॉइडने अतिशय योग्य वेळ साधली आणि हॉलीवुड सिनेमांचं मोठ्या प्रमाणावर वितरण होऊ लागलं.

3. बेकलाईट: हजारो उपयोग असणारा पदार्थ

1970 मध्ये बेकलाईटचा शोध लागला. कोल गॅसचं कृत्रिम बाय-प्रॉडक्ट असलेलं हे एक प्रकारचं प्लॅस्टिकच होतं.

बेकलाईट ठिसूळ आणि गडद तपकिरी रंगाचं होतं. मात्र त्यापासून दीर्घकाळ टिकणारे वेगवेगळे आकार बनवणं शक्य होतं. हा पदार्थ विद्युतरोधक असल्याने लाईट फिटिंग्ज, प्लग्स आणि सॉकेटसाठी तो अतिशय उपयुक्त ठरला.

पुढच्या अर्ध शतकात वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक प्लॅस्टिक तयार करण्याचा मार्ग या बेकलाईटमुळे उघड झाला.

4. दुसऱ्या महायुद्धावर प्लॅस्टिकचा प्रभाव

1930 आणि 40च्या दशकात पेट्रोकेमिकल शास्त्रज्ञांनी पॉलिथिलिनसह अनेक प्रकारचे प्लॅस्टिक तयार केले.

पॉलिथिलिनने दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. रडारच्या लांबच्या लांब इलेक्ट्रिकल तारांना आवरण घालण्यासाठी याचा वापर करण्यात आला. त्यामुळे अटलांटिक समुद्रात ब्रिटनच्या मालवाहू जहाजांचं संरक्षण झालं.

इंग्लंडमधल्या बोर्नमाऊथ कला विद्यापीठातील म्युझिअम ऑफ डिझाईन इन प्लॅस्टिकच्या क्युरेटर सुसॅन लॅमबर्ट सांगतात, "यामुळे आमच्या वैमानिकांना फायदा झाला आणि काहींच्या मते तर युद्धाचे जे परिणाम आले त्यातही याचा मोलाता वाटा होता."

प्लॅस्टिकचे अगणित उपयोग आहेत. रेशमाच्या पॅराशूटची जागा नायलॉनच्या पॅराशूटने घेतली. बॉम्ब सोडणाऱ्या मशीनजवळच्या खिडक्यांसाठी अॅक्रेलिकचा वापर होऊ लागला आणि धातूच्या हेल्मेटची जागा प्लॅस्टिकच्या हेल्मेटने घेतली.

प्लॅस्टिक उद्योग झपाट्याने वाढत असतानाच नवनवीन प्लॅस्टिकचे प्रकार बाजारात येऊ लागले.

5. संगीत रेकॉर्ड करणं झालं शक्य

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लोकांना प्रत्यक्ष संगीत मैफिलींमध्ये जाऊनच संगीताचा आस्वाद घेता यायचा. मग थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ सिलेंडरचा शोध लावला.

पहिलं फोनोग्राफ सिलेंडर मेणापासून तयार करण्यात आलं होतं. त्यात संगीत रेकॉर्ड करता यायचं आणि ते पुन्हा ऐकताही यायचं. मात्र मेणाची जागा प्लॅस्टिकने घेतली आणि या रेकॉर्डचं आयुष्य वाढलं. त्यामुळे त्या अधिक टिकावू बनल्या.

यानंतर तर विनिल रेकॉर्ड्स, कॅसेट टेप आणि त्यानंतर आलेल्या सीडींमुळे संगीत मोठ्या प्रमाणावर जनसामान्यांपर्यंत पोहोचलं. हे सर्व प्लॅस्टिकमुळे शक्य झालं.

6. हॉस्पिटलमधली स्वच्छता वाढली

प्लॅस्टिकमध्ये आणखी काही केमिकल टाकून ते अधिक लवचिक आणि मऊ करण्यात संशोधकांना यश आलं. हॉस्पिटल्समध्ये काही यंत्रांसाठी लागणाऱ्या मटेरियलमध्ये हे गुणधर्म असलेले प्लॅस्टिक आवश्यक होते. हॉस्पिटलमधल्या काचेच्या बाटल्या आणि रबर ट्यूबची जागा प्लॅस्टिक बॅग आणि पाईपने घेतली. काचेच्या बाटल्या आणि रबर ट्यूब निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने अवघड होत्या आणि त्यात तडे जाण्याचीही शक्यता असायची.

याशिवाय एकदा वापरून फेकून देता येतील, अशा सिरिंजही आल्या. या सर्वांमुळे हॉस्पिटल स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवण्यात मदत झाली. परिणामी अनेकांचे प्राण वाचले.

7. वापरा आणि फेका

दुसऱ्या महायुद्धानंतर पेट्रोकेमिकल उद्योगांचा विस्तार होऊ लागला. त्यांना आणखी नव्या प्रकारचे प्लॅस्टिक मटेरियल तयार करायचे होते आणि कंपन्यांना काम हवं होतं. यातून 'प्लॅस्टिक क्रांती' सुरू झाली.

प्लॅस्टिकचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं तर ते अत्यंत स्वस्तात उपलब्ध होऊ शकतं, हे लक्षात आलं. 1960च्या जवळपास एकदा वापर करता येतील, असे प्लॅस्टिकचे ताट, कप, चमचे बाजारात येऊ लागले. Use and Throw ही संकल्पना अस्तित्वात आली आणि ग्राहकांची भांडी घासण्यापासून सुटका झाली. यामुळे तर व्यापाऱ्यांचे अच्छे दिनच आले.

8. प्लॅस्टिकमुळे अन्नाची नासाडी कमी झाली

संपूर्ण युरोपीय महासंघात दरवर्षी 8 कोटी 8 लाख टन अन्न वाया जातं, जे मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जनासाठी कारणीभूत ठरतं. मात्र प्लॅस्टिकमध्ये अन्नपदार्थ बंद करून ठेवणं शक्य झाल्यामुळे अन्नाची नासाडी कमी झाली.

पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ प्राध्यापक फिल पर्नेल म्हणतात, "प्लॅस्टिक पॅकेजिंगचा सर्वांत मोठा फायदा असा झाला की त्यामुळे तुम्हाला शेतातून शेतमाल सुपरमार्केटच्या शेल्फमध्ये आणण्यासाठी जास्तीचा वेळ मिळाला. यामुळे तुम्ही जी अन्नाची नासाडी करायचा, ती कमी झाली आणि ते जपून ठेवता येणं शक्य झालं."

काय चुकलं?

मात्र आज प्लॅस्टिक एक समस्या आहे. स्वस्त आणि एकदा वापरून फेकून देता येणाऱ्या प्लॅस्टिक पॅकेजिंगवर अतिविसंबून राहिल्यामुळे प्लॅस्टिकचा वापर वाढतच गेला. प्लॅस्टिक फेकून दिल्यानंतर त्याचं लवकर विघटन होत नाही, म्हणजे प्लॅस्टिक अनेक दशकं वातावरणात तसंच पडून राहतं, विशेषतः समुद्रात.

समुद्रात दर मिनिटाला एक ट्रक प्लॅस्टिक कचरा टाकला जातोय. त्यामुळे पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्लॅस्टिकचं महत्त्व लक्षात घेऊन प्लॅस्टिक वापराची आपली पद्धत आपण बदलायला हवी.

Reduce, Reuse, Recycle हा त्यासाठीचा मंत्र आहे. म्हणजेच प्लॅस्टिक कमी वापरा, त्याचा पुनर्वापर करा आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)