महिंदा राजपक्षे श्रीलंकेच्या तामिळभाषिक आणि मुस्लिमांमध्ये लोकप्रिय का नाहीत?

    • Author, टीम बीबीसी हिंदी
    • Role, नवी दिल्ली

श्रीलंकेत अचानक राजकीय नाट्य सुरू झालंय. राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना आणि गेल्या आठवड्यापर्यंत पंतप्रधान असलेले रनिल विक्रमसिंगे यांच्यात आर्थिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून मतभेद शिगेला पोहोचले. सिरिसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रिडम आघाडीने विक्रसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पक्षापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे रनिल विक्रमसिंगे यांचं पंतप्रधानपद गेलं आणि सिरिसेना यांनी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदी विराजमान केलं.

225 सदस्यांच्या संसदेत आपल्याकडे बहुमत आहे आणि आपल्याला पदावरून काढून टाकणं घटनाबाह्य आहे, असं विक्रमसिंगे यांचं म्हणणं आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांनी रविवारी संसदेचं विशेष सत्र बोलवण्याची विनंती संसदेच्या सभापतींकडे केली होती. पण याच विनंतीनंतर राष्ट्रपतींनी संसदेचं कामकाज स्थगित केलं. आता 16 नोव्हेंबरपासून नवीन सत्र सुरू होईल, अशी माहिती सभापतींनी दिली.

2005 ते 2015 पर्यंत श्रीलंकेचे पंतप्रधान असलेले महिंदा राजपक्षे गेली निवडणूक हरले, तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर अनेकांनी पूर्णविराम लावला होता. याचं कारण होतं एक घटनादुरुस्ती, जी राजपक्षे यांना हरवून राष्ट्रपती झालेले सिरिसेना यांनी केलेली होती. सिरिसेना यांनी घटनेत संशोधन करून एका व्यक्तीला केवळ दोन वेळा राष्ट्रपती होता येईल, अशी तरतूद केली होती.

राजपक्षेंचा राज पुन्हा सुरू

शुक्रवारी राष्ट्रपती सिरिसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली, तेव्हा लोकांना कळलं की आपण राजपक्षे यांच्या राजकारणाला श्रद्धांजली देण्याची घाई करत होतो.

1945 साली राजपक्षे यांचा जन्म झाला. त्यांच्याबद्दल बोललं जातं की त्यांच्याएवढा प्रबळ आणि महत्त्वाकांक्षी राष्ट्रपती श्रीलंकेत दुसरा झाला नाही. दक्षिण श्रीलंकेत विद्यार्थी दशेतच महिंदा राजपक्षे यांच्यातले नेतृत्वगुण दिसू लागले होते.

याच भागात दुतुगमुनु नावाचा एक सिंहली राजा होता. त्यानं चोल वंशाच्या एका तामिळ राजकुमाराला पराभूत केलं होतं.

दक्षिण श्रीलंकेत प्रत्येक बाप आपल्या मुलाला याच शौर्याची गाथा सांगताना दिसतो. सिंहली आणि बौद्ध धर्माच्या रक्षणासाठी आपली संततीही आपल्या राजाप्रमाणे असावी, अशी मनोकामना इथले लोक करतात.

स्वातंत्र सैनिक दियासेन हेदेखील इथे बरेच लोकप्रिय आहेत, आणि महिंदा राजपक्षे यांची प्रतिमाही अशाच स्वरूपात मांडली जाते.

श्रीलंकेच्या राजकारणात राजपक्षे यांचं स्थान पक्कं करण्यात तामिळ बंडखोरांविरोधात 26 वर्षं चाललेलं गृहयुद्धाचा मोठा वाटा आहे. 2009 साली हे गृहयुद्ध संपवण्याचं श्रेय राजपक्षेंना दिलं जातं.

बंडखोर LTTEचा खात्मा करून राजपक्षे यांनी श्रीलंकेतल्या बहुसंख्याकांच्या मनातली भीती दूर केली, अशी भावना लोकांच्या मनात आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या प्रसार माध्यमांमध्ये राजपक्षे यांना सिंहली बौद्धांच्या मुक्तिदात्याच्या रूपात बघितलं जातं.

दुसरीकडे LTTEचा बीमोड करताना राजपक्षे यांनी मानवाधिकारांचं उल्लंघन केलं, असे आरोपही होतात. पाश्चिमात्य राष्ट्रांनी मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून अनेक वर्ष श्रीलंकेला दूर सारण्यात आलं होतं.

सिंहली बौद्धांचे नेते

पण सिंहली बौद्धांमध्ये त्यांची लोकप्रियता निर्विवाद आहे. त्यामुळे राजपक्षे 2015ची निवडणूक तामिळ आणि मुस्लीम मतांमुळे हरले, असं जाणकार सांगतात.

एकदा डेली मिररशी बोलताना महिंदा राजपक्षे म्हणाले होते, "माझा स्वभावच लढवय्या आहे. मी स्वतःच्या आणि माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठीही राजकारणात आहे."

अनेकदा त्यांचा हा युक्तीवाद दुबळा ठरतो, तेव्हा ते हेदेखील म्हणतात, "माझा वंश, राष्ट्र आणि आस्थेच्या रक्षणासाठीही मी राजकारणात आहे."

राजपक्षे यांची ओळख सिंहली बौद्धांचे नेते अशी आहे. पुढच्या वर्षी महिंदा 73 वर्षांचे होतील. 1970 साली अवघ्या चोविसाव्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार झाले होते.

2015 साली महिंदा राजपक्षे यांना दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. सिंहली बौद्ध मतदारांमध्ये राजपक्षे सर्वाधिक लोकप्रिय नेते असताना असं घडलं. 2015नंतर राजपक्षे यांची राजकीय प्रासंगिकता कमी झाली असली तरी पूर्णपणे संपली नव्हती.

अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाप्रमाणे सिरिसेना आणि विक्रमसिंगे सरकारने मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून राजपक्षे यांच्याविरोधात कारवाई केली तर लोकांची सहानुभूती राजपक्षेंच्या बाजूने जाईल, असंही म्हटलं जायचं. त्यामुळे सरकारवर अस्थिरतेचं सावटही होतं.

श्रीलंकेच्या प्रसार माध्यमांमध्ये बोललं जातं की जर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली तर राजपक्षे यांना कुणीच आव्हान देऊ शकणार नाही.

मात्र राजपक्षे यांच्या बाजूने केवळ सकारात्मक मुद्दे आहेत, असंही नाही. राजपक्षे यांच्या कार्यालयात एकाधिकारशाही, लागेबांधे, भ्रष्टाचार, सूडभावना आणि कुशासन, असे गंभीर आरोपही झाले आहेत.

महिंदा राजपक्षे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. राजपक्षे यांचं कुटुंब खूप मोठं आहे आणि सरकारमध्ये त्यांचा थेट हस्तक्षेप असायचा. याच कारणामुळे राजपक्षे यांच्या कुटुंबीयांविरोधात अनेक प्रकारच्या चौकशा सुरू झाल्या. राजपक्षे यांच्या मुलांवरदेखील अनेक आरोप आहेत.

वजनदार राजपक्षे घराणं

या कुटुंबाची संपत्ती आणि दरारा वाढण्याचा वेग थक्क करणारा होता. आज श्रीलंकेच्या राजकारणात राजपक्षे कुटुंब सर्वांत सामर्थ्यवान कुटुंब आहे. राजपक्षे राष्ट्रपती होते, तेव्हा पॉवर सर्किटमध्ये या कुटुंबाचा वचक सगळीकडे होता आणि अनेक ठिकाणी आजही आहे. संरक्षण सचिवांपासून राजनायिकांपर्यंत अनेक पदांवर याच कुटुंबातले लोक होते.

अनेक जण निवडून आले होते तर अनेकांची थेट नियुक्ती करण्यात आली होती. या कुटुंबाच्या आशीर्वादाशिवाय छोट्याशा बेटावरच्या या देशातला कुठलाच प्रकल्प कुणालाच मिळू शकत नाही, अशी प्रतिमा तयार झाली होती.

देशातल्या 70% बजेटवर या कुटुंबाचं नियंत्रण असल्याचा आरोप विरोधक करायचे.

राजपक्षे श्रीलंकेच्या रुहुनुतील प्रतिष्ठित राजकीय कुटुंब डेविड विदानराचची राजपक्षे यांचे वंशज आहेत. डॉन डेविन विदानराचची राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे आजोबा होते.

D. D. राजपक्षे श्रीलंकेचे पाणीपुरवठा मंत्री होते. D. D. राजपक्षे यांना तीन मुलं आणि एक मुलगी होती. थोरला डॉन कोरोनेलिस राजपक्षे ऊर्फ D. C. राजपक्षे या भागातले मोठे अधिकारी होते. मधले डॉन मॅथ्यू राजपक्षे आणि धाकटे डॉन अल्वीन राजपक्षे होते.

डॉन मॅथ्यू राजपक्षे म्हणजेच D. M. राजपक्षे यांनी निवडणुकीच्या रिंगणात थेट उडी घेतली आणि ब्रिटिश काळात काउंसिलर म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचे छोटे भाऊ डॉन अल्वीन म्हणजेच D. A. राजपक्षे काउंसिलर झाले. स्वतंत्र श्रीलंकेत D. A. राजपक्षे संसदेत निवडून गेले.

D. M. राजपक्षे यांची मुलं लक्ष्मण आणि जॉर्ज राजपक्षे स्वतंत्र श्रीलंकेत खासदार झाले. जॉर्ज राजपक्षे यांना मंत्रिपदही मिळालं. त्यांचीच मुलगी निरुपमा आज मंत्री आहे.

D. A. राजपक्षे यांची मुलं चमाल, महिंदा आणि बासील हे तिघेही वडिलांप्रमाणेच खासदार झाले. D. A. राजपक्षे यांचे दुसरे चिरंजीव महिंदा 2005 साली राष्ट्रपतिपदी विराजमान झाले. चमाल यांना सभापतीपद तर बासील यांना मंत्रिपद मिळालं. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमाल खासदार आहे, तर चमाल यांचे चिरंजीव शशीन्द्रा हे उवा प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे संपूर्ण राजपक्षे कुटुंब राजकारणात आहे.

महिंदा राजपक्षे यांच्यावर बहुसंख्याक जातीयवादाचा आरोपही झाला आहे. LTTEवर विजय मिळवल्यानंतरही ते मुत्सद्दी राजकारणी म्हणून स्थापित होऊ शकले नाही. युद्ध जिंकूनही शांतता गमावणं, ही म्हण राजपक्षे यांच्यावर चपखल बसते, अस जाणकार सांगतात.

चीनशी मैत्री

हम्बनटोटाची लोकसंख्या 20 हजार आहे. मात्र त्याचा विस्तार वेगाने होत आहे. चीनच्या मदतीने 36 कोटी डॉलर खर्चून देशात एक बंदरही उभारलं जात आहे. 35 हजार आसन क्षमता असलेलं एक स्टेडिअम उभारण्यात येत आहे. 20 कोटी डॉलरचं विमानतळ बांधण्यात आलं. नवीन रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू आहे.

हे सर्व चीनने दिलेल्या कर्जामुळे शक्य झालं आहे आणि हे सर्व शक्य करून दाखवलंय महिंदा राजपक्षे यांनी. मात्र कर्ज चुकवता आलं नाही, म्हणून हम्बनटोटा बंदर 100 वर्षांसाठी चीनला लीजवर द्यावं लागलं.

ब्रिटनमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या 'द गार्डियन'मध्ये 27 ऑक्टोबर 2013 रोजी महिंदा राजपक्षे यांच्यावर एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात लिहिलं होतं, "श्रीलंकेतील जवळपास सर्वच नेते उदारमतवादी, इंग्रजी बोलणारे, परदेशात शिकलेले आणि कोलंबो किंवा आसपास राहणारे आहेत. राजपक्षे यांच्याजवळ विद्यापीठाची पदवी नाही, एका राजकीय कुटुंबातून असूनही ते खूप वेगळे आहेत. राजपक्षे क्वचितच कधी परदेशी पेहरावात दिसतात. त्यांना आजही श्रीलंकेतील पारंपरिक नाश्ता म्हशीचं दूध आणि दही खायला आवडतं. ते सिंहली भाषेत बोलतात. मात्र इंग्रजी त्यांना कळते. ते तमिळही शिकले आहेत."

राजपक्षेविरोधात आता हिंदू-मुस्लीम एकत्र

श्रीलंकेत तामिळभाषिकांची संख्या 15 टक्के आहे. या तामिळ लोकांमध्ये राजपक्षे यांची प्रतिमा कट्टर सिंहली नेता अशी आहे.

तामिळीविरोधातल्या मोहिमेत महिंदा यांचे भाऊ गोटाभाया राजपक्षे यांची भूमिकाही महत्त्वाची होती. गोटाभाया आपल्या भावाच्या सरकारमध्ये संरक्षण सचिव पदावर होते.

श्रीलंकेत मुस्लिमांची संख्या जवळपास नऊ टक्के आहे. विश्लेषकांच्या मते आज तामिळ हिंदू आणि मुस्लीम दोघांनाही राजपक्षे आवडत नाही.

सिंहली राष्ट्रवादाच्या नावाखाली मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय आणि अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस सिंहलींची संख्या कमी होईल, असं मतप्रवाह सिंहली लोकांमध्ये आहे.

त्यामुळेच सिंहली राष्ट्रवादी नेता म्हणून राजपक्षेंविषयी अल्पसंख्याक साशंक असतात. गेल्या पाच वर्षांत मुस्लिमांविरोधात बौद्धांचे हल्ले वाढले आहेत.

श्रीलंकेमध्ये कट्टरतावादी बौद्धांनी एक बोडू बला सेना स्थापन केली आहे. ही सिंहली बौद्धांची राष्ट्रवादी संघटना आहे. ही संघटना मुस्लिमांविरोधात मोर्चा काढते. त्यांच्याविरोधात थेट कारवाईची भाषा वापरते आणि मुस्लिम चालवत असलेल्या उद्योगांवर बहिष्कार टाकण्याचं समर्थन करते. या संघटनेला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येविषयीही तक्रार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)