...तर अमेरिका अण्वस्त्र बनवेल : डोनाल्ड ट्रंप यांची धमकी

रशिया आणि चीनवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अण्वस्त्र निर्माण करण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

रशियाने 1987च्या Intermediate-Range Nuclear Forces (INF) कराराचे पालन केलेलं नाही, असं ते म्हणाले. अमेरिकेने या करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तर रशियाने ट्रंप यांचा दावा नाकारला आहे. तसेच रशियाने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

शीतयुद्धाच्या काळाताला करार तत्कालीन सोव्हिएत रशियापासून, युरोपमधील राष्ट्रांना असलेल्या धोक्यापासून संरक्षण निर्माण व्हावं म्हणून करण्यात आला होता.

ते म्हणाले, "रशियाने कराराच्या तत्त्वांचं किंवा पूर्ण कराराचं पालन केलेलं नाही. हा इशारा चीन आणि रशिया यांना आहे. ज्यांना हा खेळ खेळायचा आहे, त्या सर्वांना हा इशारा आहे."

या करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर रशियाने अमेरिकाचा निषेध केला आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशियाशी चर्चा करणार आहेत. अमेरिका जर या करारातून बाहेर पडली तर निशस्त्रीकरणाला मोठा झटका असेल, असं बोल्टन म्हणाले आहेत.

तर रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पाट्रूशेफ यांनी या करारावरून असणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलं आहे.

बोल्टन यांचा दौरा सुरू होत असतानाच रशियाने अण्वस्त्रांचं संतुलन साधू असाही इशारा दिला आहे.

क्रेमलिनचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह म्हणाले, "अमेरिकेचं काय म्हणणं आहे, ते आम्हाला जाणून घ्यावं लागेल. जर अमेरिका या करारातून बाहेर पडणार असेल तर आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी पावलं उचलावी लागतील."

Intermedia Range Nuclear Treaty म्हणजे काय?

1.1987मध्ये अमेरिका आणि रशियाने या करारावर स्वाक्षरी केली. समुद्राच्या माध्यमातून मारा करण्यात येणाऱ्या अस्त्रांचा अपवाद वगळता या करारानुसार छोट्या तसंच मध्यम पल्ल्याची आण्विक आणि बिगरआण्विक क्षेपणास्त्रावर बंदी घालण्यात आली होती.

2.रशिया SS-20 मिसाइल सिस्टमची निर्मिती तसंच युरोपमध्ये क्रूझ क्षेपणास्त्र यामुळे अमेरिकेला चिंता वाटू लागली.

3.1991पर्यंत 2,700 क्षेपणास्त्रांचा नायनाट करण्यात आला. दोन्ही देशांना एकमेकांच्या अण्वस्त्र केंद्रांची तपासणी करण्याचे अधिकार होते.

4.हा करार रशियाच्या हिताचा नसल्याचं मत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेने अँटी बॅलॅस्टिक मिसाइल करारातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे उद्गार काढले होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)