मिखाइल गोर्बाचेव्ह यांचा अण्वस्त्र करारावरून अमेरिकेला इशारा

फोटो स्रोत, REUTERS AND EPA
''INF अर्थात इंटरमीडिएट रेंज न्युक्लिअर फोर्स करारातून अमेरिकेची माघार ही आण्विक नि:शस्त्रीकरणादृष्टीने हाती घेण्यात आलेल्या प्रयत्नांना खीळ घालणारी आहे,'' असं मत सोव्हिएत संघराज्याचे माजी अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी सांगितलं.
1987मध्ये गोर्बाचेव्ह आणि रेगन यांनी INF करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. गोर्बाचेव्ह यांनी या करारामागचा विचार आणि हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
रशिया अनेक वर्ष कराराचं उल्लंघन करत आहे असं ट्रंप यांचं म्हणणं आहे. रशियाने हे आरोप फेटाळले आहेत आणि अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ असं म्हटलं आहे.
शीतयुद्धाच्या अखेरीस अमेरिका आणि रशिया यांनी अणुकरार केला होता.
कोण आहेत गोर्बाचेव्ह
- सोव्हिएत संघराज्याचे शेवटचे महासचिव होते.
- देशांतर्गत प्रशासनात सुधारणा आणि आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळे शीतयुद्धाचा शेवट झाला होता.
- 1991मध्ये सोव्हिएतचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी राजीनामा दिला.
रशियाने केली टीका
रशियाबरोबरच्या महत्त्वपूर्ण अण्वस्त्र करारातून माघार घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर रशियाने टीका केली आहे. याचा बदला घेण्यासाठी आम्हीही "काहीतरी घातक पाऊल उचलू," असं रशियाने म्हटलं आहे.
मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्र करारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच शनिवारी केली. रशियाने या कराराच्या कलमांचं वर्षानुवर्षं उल्लंघन केलं आहे, असं ट्रंप म्हणाले.
1987 साली झालेल्या सोव्हियत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या INF करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार, 500 ते 5,500 किलोमीटर अंतरावरील म्हणजे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रं सोडण्यावर बंदी घालण्यात आली होती.
अमेरिका रशियाला अण्वस्त्रांचा मोकाट व्यापार करू देणार नाही, असं ट्रंप यांनी सांगितलं.
ट्रंप यांनी घेतलेल्या या निर्णयावर बोलताना रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सरजे रयाबकोव्ह म्हणाले, "हे एक अत्यंत घातक पाऊल आहे. मला वाटतं यामागचा विचार समजून घेण्यापेक्षा यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकाच अधिक होईल."
"आतंरराष्ट्रीय सुरक्षितता आणि अण्वस्त्रांच्या विश्वात स्थैर्य कायम ठेवण्यासाठी हा करारा महत्त्वाचा आहे," असं त्यांनी टॅस वृत्तसंस्थेला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"हे पाऊल म्हणजे स्वस्तात काम करवून घेण्यासाठी धमकावण्यासारखं आहे. जर अमेरिकेने आपला उद्धटपणा सोडला नाही आणि असंच आंतरराष्ट्रीय करारांमधून ते माघार घेत राहिले तर मग आम्हाला त्याचा बदला घेण्यासाठी घातक पावलं उचलावीच लागतील. त्यात लष्करी तंत्रज्ञानाचा मार्गही अवलंबण्याचा पर्याय आहेच, पण आम्हाला हे तेवढं ताणायचं नाहीये," असं रयाबकोव्ह RIA नोव्होस्ती वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
प्रकरण काही नवीन नाही
2014मध्ये रशियाने या कराराचा भंग केला, असा आरोप बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष असताना रशियावर केला होता. ग्राउंड लाँच क्रूझ मिसाइलची कथित चाचणी घेतल्याचा आरोप त्यावेळी रशियावर होता.
"तेव्हा ओबामा यांनी या करारातून माघार का घेतली नाही किंवा करारासंदर्भात वाटाघाटी का केल्या नाहीत, हे ठाऊक नाही. रशियाने गेली अनेक वर्षं कराराच्या लामां चं उल्लंघन केलं आहे," असं ट्रंप यांनी नेवाडा इथल्या रॅलीत बोलताना सांगितलं.
"युरोपियन नेत्यांच्या दबावामुळे अमेरिकेने यांनी करारातून माघार घेतली नाही. करारातून माघार घेतली तर अण्वस्त्रांची स्पर्धा तीव्र होऊ शकते," असं ओबामा यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, AFP
पश्चिम पॅसिफिक परिसरात चीनचं वाढतं वर्चस्व टाळण्यासाठी अमेरिकेने रशियाविरुद्धच्या करारातून माघार घेतल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे.
रशियाने कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नसल्याने निर्बंधाविना मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार करण्याची परवानगी त्यांना असल्याचंही स्पष्ट झालं आहे.
जगभरात अमेरिकाच एकमेव महासत्ता राहील, असं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हे पाऊल उचललं आहे, अशी प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
रशियाने कराराच्या कलमांचा भंग केल्याचा अमेरिकेने पुनरुच्चार केला. रशियाने 9M729 हे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. या मिसाइलचं नाव नाटो SSC-8 असं आहे. या मिसाइलमुळे अगदी कमी वेळात रशियाला नाटो राष्ट्रांवर आण्विक हल्ला चढवता येईल.
आपण या कराराचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचं रशियाने खंडन केलं आहे. मात्र नव्या क्षेपणास्त्रांबाबत त्यांनी सूचक मौन बाळगलं आहे.
पारंपरिक शस्त्रांच्या तुलनेत अशी क्षेपणास्त्रं हा स्वस्त पर्याय ठरतात, अशी रशियाची भूमिका आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या महिन्याअखेरीस होणाऱ्या चर्चेवेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन रशियाला करारातून माघार घेण्याविषयी कल्पना देतील.
अण्वस्त्रांच्या संदर्भात मोठ्या करारातून माघार घेण्याची 2002 नंतरची अमेरिकेची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी अँटी बॅलॅस्टिक क्षेपणास्त्र करारातून माघार घेण्याची घोषणा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी केली होती.
बॅलॅस्टिक न्युक्लिअर वेपन्स निर्मितीवर या करारानुसार बंदी घालण्यात आली होती.
बुश यांच्या प्रशासनाने युरोपात मिसाइल शिल्ड उभारण्याचा निर्णय घेतला. याची कुणकुण रशियाला लागली. ओबामा प्रशासनाने 2009मध्ये हा करार रद्दबातल ठरवला. 2016 मध्ये एका नव्या कराराने याची जागा घेतली.
Intermedia Range Nuclear Treaty म्हणजे काय?
- 1987मध्ये अमेरिका आणि रशियाने या करारावर स्वाक्षरी केली. समुद्राच्या माध्यमातून मारा करण्यात येणाऱ्या अस्त्रांचा अपवाद वगळता या करारानुसार छोट्या तसंच मध्यम पल्ल्याची आण्विक आणि बिगरआण्विक क्षेपणास्त्रावर बंदी घालण्यात आली होती.
- रशिया SS-20 मिसाइल सिस्टमची निर्मिती तसंच युरोपमध्ये क्रूझ क्षेपणास्त्र यामुळे अमेरिकेला चिंता वाटू लागली.
- 1991पर्यंत 2,700 क्षेपणास्त्रांचा नायनाट करण्यात आला. दोन्ही देशांना एकमेकांच्या अण्वस्त्र केंद्रांची तपासणी करण्याचे अधिकार होते.
- हा करार रशियाच्या हिताचा नसल्याचं मत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेने अँटी बॅलॅस्टिक मिसाइल करारातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी हे उद्गार काढले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








