अण्वस्त्रांचा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गटाला सर्वोच्च पुरस्कार

फोटो स्रोत, iStock
विनाशकारी अण्विक अस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आंतरराष्ट्रीय समूहाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
'इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स' अर्थात 'आयकॅन' (ICAN ) असं या चळवळीचं नाव आहे.
अण्विक अस्त्रांना रोखण्याच्या दृष्टीने आयकॅन उपक्रमाचं योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच या पुरस्कारासाठी या गटाची निवड करण्यात आली, असं नोबेल समितीच्या प्रमुख बेरिट रेइस-अँडरसन यांनी सांगितलं.
अण्विक अस्त्रांचा धोका सर्वाधिक असलेल्या काळात आपण आहोत, असं सांगताना त्यांनी उत्तर कोरियाचा उल्लेख केला.
अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी अण्वस्त्रधारी देशांनी वाटाघाटासाठी पुढाकार घ्यावा असं अपील अँडरसन यांनी केलं.

फोटो स्रोत, Reuters
नोबेल शांतता पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.
'आयकॅन'नक्की काय आहे?
आयकॅन म्हणजे अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी शंभराहून अधिक देशांत कार्यरत असलेला अनेक स्वयंसेवी संस्थांचा समूह आहे.
दहा वर्षांपासून अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रयत्नशील या उपक्रमाचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा इथे आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या नोबेल पुरस्कार सोहळ्यात या गटाला 11 लाख डॉलर, पदक आणि प्रमाणपत्र यांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

फोटो स्रोत, Twitter
अण्वस्त्रं वापरावर बंदी आणि टप्याटप्याने अण्वस्त्रं नष्ट करण्याच्या दृष्टीनं संयुक्त राष्ट्र संघटनेनं तयार केलेला तह 122 देशांनी अंगीकारला होता.
अण्वस्त्रं बंदीकरार
अण्वस्त्र बंदी करार नेहमीच चर्चेत असतो. अमेरिका आणि इंग्लंडसह जगातल्या नऊ अण्वस्त्रधारी देशांनी या तहाच्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
नोबेल शांतता पुरस्काराची निवड कशी होते?
- जगभरातील पात्र शिफारसकर्ते दरवर्षी 1 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांची नावे सुचवू शकतात. नोबेल समिती सदस्यांना शिफारस करण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
- समिती प्रत्येक शिफारसीची छाननी करते. अंतिम पुरस्कारासाठी 20 ते 30 शिफारशी पात्र ठरतात. यातून अंतिम विजेता ठरतो.
- पाच सदस्यीय समिती सदस्यांची निवड नॉर्वेच्या संसदेतर्फे केली जाते.
- नॉर्वे तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार अंतिम टप्प्यातील उमेदवारांसंदर्भात अहवाल देतात. या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम विजेता ठरवला जातो.
- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात होणाऱ्या समितीच्या शेवटच्या बैठकीत अंतिम विजेत्याची घोषणा होते.
- अंतिम विजेत्यासंदर्भात समिती सदस्यांचं एकमत न झाल्यास मतदानानं निर्णय घेतला जातो.
- पुरस्कार विजेत्याची घोषणा केल्यानंतर 10 डिसेंबरला एका दिमाखदार सोहळ्यात पुरस्कारांचं वितरण केलं जातं. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीदिनी पुरस्कार दिले जातात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








