खाशोग्जी प्रकरणातलं गूढ : अमेरिकेला हवेत टर्कीकडील पुरावे

सौदी अरेबिया, टर्की

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जमाल खाशोग्जी

सौदी अरेबियातील पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात खून झाला आहे, हे सिद्ध करणारे सबळ पुरावे द्यावेत अशी सूचना अमेरिकेने टर्कीला केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, जर पुरावे असतील तर ते सादर करावेत.

2 ऑक्टोबरला इस्तंबूल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात प्रवेश केल्यानंतर खाशोग्जी बेपत्ता झाले आहेत.

दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने खाशोग्जी यांचा शेवटचा लेख प्रसिद्ध केला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी हा लेख लिहिला होता. मध्यपूर्वेतील माध्यम स्वातंत्र्याचं महत्त्व या विषयावर त्यांनी हा लेख लिहिला आहे.

या वृत्तपत्राचे ग्लोबल ओपिनियन एडिटर करेन अतिहा म्हणाल्या, ते परत येतील या आशेने या लेखाचं प्रकाशन आम्ही थांबवलं होतं. "पण आता आपल्याला मान्य करावं लागेल की ते परत येणार नाहीत. वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेला त्यांचा हा शेवटचा लेख आहे. या लेखात त्यांना अरब जगतातील माध्यम स्वातंत्र्याबद्दल त्यांना असणारी कळकळ दिसून येते. त्यासाठीच त्यांनी जीव दिला." या लेखात खाशोग्जी यांनी अरबमधील माध्यमांच्या स्वातंत्र्याची पाठराखण केली आहे. अरब नागरिकांना जगात काय सुरू आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. अरब आवाजाला व्यासपीठ मिळालं पाहिजे, असं त्यांनी लिहिलं आहे.

तपासाची दिशा

बुधवारी आणि गुरुवारी टर्कीतील तपास संस्थांनी सौदी दूताच्या निवासस्थानांची 9 तास तपासणी केली. त्यानंतर तपास पथकं सौदी दूतावासाकडे गेली. या तपास पथकांत फॉरेन्सिक तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ यांचा समावेश आहे. सोमवारी दूतावासाची पाहिल्यांदाच तपासणी करण्यात आली.

टर्की, सौदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी दूतावासाची पाहणी सुरू आहे.

मंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पओ रियाधमध्ये होते. सौदीचे युवराज मोहंमद बीन सलमान यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सलमान यांनी खशोग्जी यांच्या बेपत्ता होण्यात कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे.

2 ऑक्टोबरला काय घडलं?

खाशोग्जी अमेरिकेचे नागरिक असून ते वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी सौदी युवराजांच्या धोरणांवर टीका करू नये, असे कथितरीत्या धमकावल्यानंतर गेले एक वर्षभर ते अज्ञातवासात होते. 

टर्कीतील एका महिलेशी ते लग्न करणार होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रं घेण्यासाठी ते दूतावासात गेले होते. 

सौदी अधिकारी म्हणतात खाशोग्जी दूतावासातून बाहेर पडले त्यावेळी त्यांना कसलीही इजा झालेली नव्हती. 

पण टर्कीच्या अधिकाऱ्यांना असा वाटतं की, दूतावासातील इमारतीमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सौदीच्या एजंटांनी त्यांना मारल्याचा संशय आहे. काही माध्यमांनी सौदीचे एजंट टर्कीत येताना आणि बाहेर पडतानाचे व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. 

न्यूयॉर्क टाइम्सने 15 पैकी 4 एजंट सौदीच्या युवराजांशी तर एक एजंट सौदीतील एका मंत्र्याशी संबंधित आहे, असं म्हटलं आहे.

मंगळवारी जी7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. 

खाशोग्जी यांच्या बेपत्ता प्रकरणानंतर पुढील आठवड्यात सौदी अरेबियात होत असलेली गुंतवणूक परिषद अडचणीत आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिन लाग्रेड यांनी या परिषदेतून माघार घेतली आहे.

सौदी अरेबिया अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्याने अमेरिकेचं प्रशासनही अडचणीत आलं आहे. या प्रकरणात पुरावा असलेला व्हीडिओ सादर केला जावा, असे आदेश दिले असल्याचे ट्रंप यांनी म्हटलं आहे. तसेच सौदी अरेबियाची पाठराखण करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

टर्कीच्या तपास यंत्रणांनी खाशोग्जी यांचा खून झाल्याचे पुरावे असल्याचं म्हटलं होतं. खाशोग्जी यांच्या खून प्रकरणातील एका ऑडिओ क्लिपमध्ये सौदीच्या राजदूताचा आवाज येत ऐकू येत असल्याचं एका वृत्तपत्राने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)