'जमाल खाशोग्जी कुठे आहेत?' UK, फ्रान्स, जर्मनीची 'विश्वासार्ह' तपासाची मागणी

सौदी अरेबिया, टर्की

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जमाल खाशोग्जी

2 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा शोध घेण्यासाठी विश्वासार्ह यंत्रणेतर्फे तपास व्हायला हवा, अशी मागणी युनायटेड किंग्डम (UK), जर्मनी आणि फ्रान्सने केली आहे.

याप्रकरणी कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी, अशी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मागणी केली आहे. सौदी याप्रकरणी उत्तर देण्यास बांधिल असल्याचंही या देशांनी स्पष्ट केलं.

जे घडलं आहे त्या सगळ्याची जबाबदारी सौदी अरेबियाची आहे, असं UKचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी सांगितलं.

सौदी सरकारच्या धोरणांचे विरोधक असलेले पत्रकार खाशोगी 2 ऑक्टोबर रोजी इस्तंबूल येथील दूतावासात शिरताना शेवटचे दिसले होते. याच दूतावासात खाशोग्जी यांना ठार करण्यात आलं, याचा व्हीडिओ तसंच ऑडियो पुरावा आपल्याकडे असल्याचा टर्कीचा दावा आहे.

मात्र खाशोग्जींना त्या दूतावासात मारण्यात आल्याच्या वृत्ताचा सौदीने इन्कार केला आहे. या सर्व राजकीय आणि आर्थिक धमक्यांना बळी न पडता सौदी देशाविरोधातील कोणत्याही कृतीला चोख प्रत्युत्तर देईल, असं वृत्त सौदी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.

काय म्हणाले UK, फ्रान्स, जर्मनी?

जमाल खाशोग्जी हे वॉशिंग्टन पोस्टसाठी स्तंभलेखन करायचे. त्यांचा सौदी सरकारविरोधी लेखनामुळे त्यांना संपवण्यात आलं, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

खाशोग्जी यांच्यासोबत नक्की काय झालं, यासंदर्भात सौदीने विश्वासार्ह तपास यंत्रणा कार्यान्वित करावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी, अशा आशयाचं संयुक्त निवेदन UK, फ्रान्स आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जारी केलं.

"सौदी आणि टर्की यांनी संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करावी. सौदीने खाशोग्जी यांच्याबाबत जगाला खरी माहिती द्यावी," असं UKचे जेरेमी हंट, फ्रान्सचे जिन युवेस ली ड्रिअन आणि जर्मनीचे हेइको मास म्हणाले.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्यासोबत नेमकं काय झालं?

नक्की काय घडलं आहे याची कुणालाही कल्पना नाही. मात्र यासंदर्भात समोर येणारे तपशील अस्वस्थ करणारे आहेत. सौदी अरेबिया सत्य समोर आणेल अशी अपेक्षा आहे, असं या तीन देशांच्या निवेदनात म्हटलं आहे.

जर खाशोग्जी यांचा मृत्यू झाला नसेल तर मग ते कुठे आहेत, याचं उत्तर सौदीने जगाला द्यावं, असं या तीन देशांचं म्हणणं आहे.

खाशोग्जी यांच्या हत्येला सौदी अरेबिया जबाबदार आहे, असं लक्षात आलं तर ते सौदीला 'शिक्षा' केली जाईल, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं होतं.

टर्कीचा आरोप आणि सौदीचं प्रत्युत्तर

खाशोग्जींचा मृत्यू इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीत झाल्याचे ऑडिओ आणि व्हीडिओ पुरावे आपल्याकडे असल्याचं टर्कीने बीबीसीला सांगितलं आहे.

सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. त्या दिवशी खाशोग्जी मंत्र्यांबरोबर बाहेर पडले होते, या तपशीलाचा सौदीने पुनरुच्चार करत, आपल्यालाही संपूर्ण सत्य जाणून घेण्याची इच्छा असल्याचं सौदीने म्हटलं आहे.

खाशोगी यांच्या बेपत्ता होण्यामुळे आणि कथित खुनाच्या बातम्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच व्यापार विश्वात सौदीच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)