पाकिस्तानतल्या पत्रकारांच्या जीवाला का आहे इतका धोका?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एम इलियास खान
- Role, बीबीसी न्यूज, इस्लामाबाद
पाकिस्तानात पत्रकार म्हणून काम करणं तेवढं सोपं नाही. सरकार, लष्कर, कट्टरतावादी आणि फुटीरतावाद्यांच्या दबावाचा सामना पत्रकारांना सतत करावा लागत आहे.
ताहा सिद्दीकी. पाकिस्तानातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार. पाकिस्तानात सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्करावर टीका करणारं एक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पण, याचे गंभीर परिणामही त्यांना सोसावे लागत आहेत.
सिद्दीकी यांनी यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये काम केलं आहे. २०१४ मध्ये त्यांना अल्बर्ट लाँड्रेक्स प्रिक्स हा पुलित्झर पुरस्कारा एवढाच महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातल्या उत्कृष्ट पत्रकारितेसाठी त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
पाकिस्तानात लष्कराचे टीकाकार म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. त्याचे वाईट परिणामही त्यांच्या वाट्याला आले आहेत.
मे महिन्यात सिद्दीकी त्यांच्या घरी आपल्या चार वर्षांच्या मुलाशी खेळत होते. त्याचवेळी त्यांना फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सी (FIA), या संस्थेतून त्यांच्या कार्यालयात तत्काळ हजर होण्याचे आदेश देणारा फोन आला.
सिद्दीकी यांनी लगेच काही जणांना फोन करून FIAच्या या फोनची माहिती मिळवली. तेव्हा त्यांना कळलं की, लष्करावर टीका केलेल्या इतर काही लेखकांची चौकशी होणार असून त्यात त्यांचही नाव आहे.
"मला लगेचच समजलं की हा दबाव नेमका कुठून आला आहे," सिद्दीकी म्हणाले. कारण, त्यांनी केलेल्या कामाबाबत विचारणा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून त्यांना यापूर्वीही अनेकदा असे फोन आले होते.

सिद्दीकी यांनी FIAनं अटक करू नये यासाठी कोर्ट ऑर्डर मिळवली. पण, चौकशीसाठी FIAमध्ये हजर राहण्याचं समन्स मात्र कायम होतं.
सिद्दीकी म्हणाले, "लष्कराबाबत न बोलता परखड पत्रकारिता करणं मला शक्यच होणार नाही. माझ्यावर असलेल्या सरकारी दबावाचं मला काही वाटत नाही. पण, हल्ली मी गप्प रहावं यासाठी माझे कुटुंबीय आणि मित्रांकडूनच दबाव वाढतो आहे."
लाजिरवाणे खुलासे
ताहा सिद्दीकींना धमक्या आल्या असल्या तरी त्यांना इजा झालेली नाही. मात्र, पाकिस्तानातले इतर पत्रकार तसे फारसे नशिबवान ठरलेले नाहीत.
ऑक्टोबरच्या शेवटी इस्लामाबादमधल्या जंग ग्रुप ऑफ न्यूज पेपर्सचे प्रतिनिधी अहमद नूरानी यांना सहा माणसांनी लोखंडी रॉड, चेन आणि चाकूनं बेदम मारहाण केली.
नूरानी यांनी पनामा पेपर्स प्रकरणातले पाकिस्तानशी संबंधित धक्कादायक पुरावे उजेडात आणले होते. त्यात, लष्कर आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संबंधांचा समावेश होता. यामुळेच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे शरीफ यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं.
नूरानी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडे बोट दाखवण्यात आलं. मात्र, लष्करानं याचा इन्कार केला.
अज्ञात हल्लेखोरांनी खळबळ माजवण्यासाठी हा हल्ला केल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. तसंच लष्करानं हॉस्पिटलमध्ये नूरानी यांच्यासाठी पुष्पगुच्छ पाठवून सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला.
वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्स २०१७ म्हणजेच माध्यमांना त्यांचं स्वातंत्र्य देण्याऱ्या राष्ट्रांच्या निर्देशांकांमध्ये १८० देशाच्या यादीत पाकिस्तानचा १३९ वा क्रमांक लागतो. रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटीअर्स (RSF) या संस्थेनंच ही आकडेवारी जाहीर केली आहे.
१३९ क्रमांक म्हणजेच पत्रकारांसाठी सगळ्यांत धोकादायक देश."पत्रकारांना सरकार आणि इतर घटकांकडून नियमित धमक्या येत असतात," असं RSFचे पाकिस्तानातले प्रतिनिधी इक्बाल खट्टक सांगतात.
"या वर्षात पाच पत्रकारांची हत्या करण्यात आली. स्थानिक राजकारण्यांविरोधात आवाज उठवल्यामुळे यातल्या काहींची हत्या झाली. तर काहींची वैयक्तिक वादातून हत्या झाली, इस्लामिस्ट या कट्टरतावाद्यांच्या गटाकडूनही एकाची हत्या झाली," असंही खट्टक यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
डझनावारी प्रकरणांमध्ये पत्रकारांना धमक्या किंवा मारहाण झाली आहे. ज्यात ठार करण्याचा नव्हे तर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं पाकिस्तान फेडरल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या एका प्रतिनिधीनं सांगितलं.
"या पत्रकारांच्या बातम्या या देशाच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असतात. तसंच, या यंत्रणांच्या आशिर्वादामुळे शहरांमध्ये प्रस्थापित झालेले कट्टरतावाद्यांचे गट यांच्या विरोधात असतात," असंही खट्टक यांनी सांगितलं.
२०१६ मध्ये पत्रकारांबाबतीत विशेष काही घडलं नाही. मात्र, यंदाच्या जानेवारीपासून सोशल मीडियावर 'अॅक्टीव्ह' असलेल्या अनेकांचं एका अज्ञात व्यक्तीनं अपहरण केलं. या प्रकरणांमध्येही लष्कराकडेच बोट दाखवण्यात आलं. मात्र, याचा तपास अद्याप स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
'फुटीरतावाद्यांची घुसखोरी'
ऑक्टोबरमध्ये दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातल्या फुटीरतावाद्यांनी पत्रकारांना धमक्या दिल्या होत्या. कारण, त्यांच्यामते हे पत्रकार एकांगी बातम्या करत होते.
या धमकीमुळे या प्रांतातल्या वृत्तपत्रांचं काम थांबल्यात जमा झाले. अनेक वृत्तपत्रांना आपली छपाई थांबवावी लागली आहे तर काहींचे वितरणाचे आकडे घसरले आहेत.
बलुचिस्तान गेल्या १५ वर्षांपासून लष्कराच्या ताब्यात आहे. या भागात इस्लामी कट्टरतावाद्यांचे अनेक गट कार्यरत असून ते धार्मिक अल्पसंख्य नागरिकांवर नियमित हल्ले करत असतात.
त्या भागातील पत्रकार उघडपणे याप्रकरणाबाबत बोलण्यास नकार देतात. मात्र, खाजगी चर्चांमध्ये ते त्यांना येणाऱ्या अडचणी बोलून दाखवतात.

फोटो स्रोत, AFP
"जर पत्रकारांनी इथल्या लष्कर आणि धार्मिक कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल लिहिलं तर त्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तसंच, आमची आर्थिक अडवणूक करण्यासाठी ते सरकारी जाहीरातीही आम्हाला देत नाहीत," असं क्वेट्टामधल्या एका वरिष्ठ पत्रकारानं सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, "पण, जर आम्ही असं केलं नाही तर फुटीरतावादी आम्हाला धमक्या देतात. त्यामुळे आमची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली आहे."
या गोष्टी फक्त बलुचिस्तानातच घडत नाहीत. एका पत्रकारानं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी अफगाणिस्तानची सीमा बंद झाल्यामुळे टोमॅटोंचे भाव वाढले अशी बातमी दिली होती. यावर एका लष्करी अधिकाऱ्यानं मला फोन करून झापलं होतं."
तसंच, फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (FATA) भागात काम करणाऱ्या एका पत्रकाराला तिथल्या कट्टरतावादी गटाकडून एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीनं फाटा आणि शेजारील खैबर पख्तुनवा प्रदेशाच्या एकीकरणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या बातम्या करू नये अशी समज फोनवरून दिली होती.
जूनमध्ये इस्लामाबादमधील एका मशिदीजवळ एका वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांवर कट्टरतावाद्यांनी मोठा हल्ला केला होता. मशिदीच्या व्यवस्थापनाकडून विजेच्या व्यवहाराबाबत झालेल्या काही गडबडींबद्दल द डिन न्यूजची टीम तिथं चित्रीकरण करण्यासाठी गेली होती.
"मी कॅमेरा काढून चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मशिदीतला एक दाढीवाला गृहस्थ माझ्याकडे बघत होता." असं चित्रीकरण करणाऱ्या रशिद अझीम यांनी सांगितलं.
रशीद पुढे म्हणाले, "तो माणूस आत गेल्यानंतर मी पुन्हा चित्रीकरण सुरू केलं. पण, तो परत आला आणि त्यानं मला मारत खाली पाडलं आणि ओढत नेण्यास सुरुवात केली. माझ्या मित्रांनी लगेच गाडीत बसून गाडी मुख्य प्रवेशद्वारात आणली. त्यामुळे हल्लेखोराचं लक्ष वेधलं गेलं आणि मी पळून जाण्यात यशस्वी झालो."
"रशीद यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. तसंच त्यांना मारहाण झाल्यामुळे त्यांचे कपडेही फाटले होते. शरिरावर इतर ठिकाणीही जखमा होत्या," असं रशीदचे सहकारी पत्रकार अली उस्मान यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, DIN NEWS
घटनेच्या दोन दिवसांनंतर रशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी सांगितलं की, मशीद व्यवस्थापनाकडून तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. रमझानचा महिना असूनही तुम्ही मशिदीत पाणी प्यायलं जे पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे गुन्हा ठरतं.
"हल्लेखोराला कोर्टानं जामीन दिला तसंच रशीद यांनी हल्ल्याची काही दृश्य घेतली होती आणि पोलिसांकडेही दिली होती. या दृश्यांच्या जोरावर पत्रकारांना दहशतीच्या मार्गानं अडवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद रशीद यांच्यावतीनं करण्यात आला. मात्र, कोर्टानं ते अमान्य केलं. त्यामुळे आता आम्ही त्या प्रकरणासाठी लढणं बंद केलं आहे." असं अली उस्मान यांनी सांगितलं.
आणखी वाचा -
आवर्जून पाहावं असं
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









