पाकिस्तानातून पालकांच्या शोधात भारतात आलेल्या गीताला प्रतीक्षा घरच्यांची

गीता, भारत, पाकिस्तान, मुलांचे हक्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गीताच्या पालकांचा शोध अजूनही सुरूच आहे.
    • Author, शुरैह नियाजी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून मूकबधीर गीताला पाकिस्तानातून भारतात आणण्यात आलं. मात्र दोन वर्षांनंतरही गीता आणि घरच्यांची भेट होऊ शकलेली नाही.

2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अद्याप तिचे कुटुंबीय भेटलेले नाहीत.

26 ऑक्टोबर 2005 रोजी गीता आपल्या कुटुंबीयांच्या शोधात भारतात दाखल झाली. इंदूर शहरातील मूकबधिरांसाठी काम करणारी बिगरसरकारी स्वयंसेवी संस्था हेच तिचं घर झालं आहे.

घरच्यांना शोधण्याचे तिचे आतापर्यंतचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. यादरम्यान दोन वेळा ती स्वयंसेवी संस्थेच्या परिसरातून गायबही झाली आहे.

गीताच्या पालकांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे, असं इंदूरमधील मूकबधीर केंद्राचे संचालक ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगितलं.

घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ

गीताबाबत ज्ञानेंद्र पुरोहित म्हणतात, 'गीता मूकबधीर आहे. तिची आणि तिच्या पालकांची भेट व्हायला हवी. मन विचलित करणाऱ्या स्थितीत मूकबधीर मुलांना सांभाळणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांची मानसिक स्थिती ढासळू शकते."

गीता भारतात आली तेव्हा आणि आताची स्थिती यामध्ये नक्कीच फरक आहे. फोटो पाहिले की हे लक्षात येतं, असंही ते म्हणाले.

गीता, भारत, पाकिस्तान, मुलांचे हक्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर गीताच्या परिस्थितीत सुधारणा आहे.

याच महिन्यात अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनच्या फैसल ईधी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना गीतासंदर्भात पत्र लिहिलं.

या पत्रात ते म्हणतात, 'गीताचे कुटुंबीय शोधण्यासाठी ज्ञानेंद्र पुरोहित यांची मदत घ्या. अशा स्वरुपाचं काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गीता पाकिस्तानमध्ये असताना पुरोहित यांनी साईन लँग्वेजच्या माध्यमातून तिच्याशी संवाद साधला होता.

मात्र भारतात आल्यापासून गीता आणि पुरोहित यांचीही भेट होऊ शकलेली नाही.

घरच्यांची भेट न झाल्याने गीता अस्वस्थ असते. यामुळेच स्वयंसेवी संस्थेच्या आवारातून पळण्याचा तिने प्रयत्न केला.

गीताला आणणं हा मुत्सदीपणा

गीताच्या घरच्यांना शोधण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप जितेंद्र सिंह यांनी केला आहे. गीताच्या प्रश्नासंदर्भात इंदूरमध्ये जितेंद्र यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानातून तिला भारतात आणण्यात आलं आणि इंदूर शहरात सोडून देण्यात आलं.

गीता, भारत, पाकिस्तान, मुलांचे हक्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डावपेचांचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यातं आलं होतं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणलेले असताना मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून गीताला भारतात आणण्यात आलं. न्यायलायने हेच कारण देत जितेंद्र यांची याचिका फेटाळली.

याप्रकरणी न्यायालय सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

गीता राहात असलेल्या संस्थेच्या संचालिका मोनिका पंजाबी यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. बोलण्यास मनाई असल्याचं त्यांनी सांगितलं.

'गीता इंदूर शहरात व्यवस्थित राहते आहे. ती राहते आहे त्या संस्थेत तिला अनेक मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. ती शिवणकाम शिकते आहे. मूकबधिरांसाठीच्या मदतनीसांच्या माध्यमातून तिने शिकायला सुरुवात केली आहे', असं इंदूरमधील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं

मात्र गीता गायब का आणि कशी होते याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

अब्दुल सत्तार ईधी फाऊंडेशनचे विश्वस्त फैसल ईधी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "भारतासारख्या खंडप्राय देशात गीताच्या आईवडिलांना शोधणं अवघड आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि लवकरच ते गीताच्या पालकांना शोधून काढतील".

गीताला इथे आणून भारताने पाकिस्तानवर कुरघोडी केली आहे. राजकीय फायदा उठवण्यासाठीच गीताला भारतात आणण्यात आलं. मात्र त्यानंतर तिच्या पालकांचा शोध सरकारने गांभीर्याने घेतलेला नाही, असं बोललं जातं

लाहोरमध्ये सापडली होती गीता

गीताच्या घरच्यांना शोधण्यात मदत करणाऱ्याला एक लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ गीता पाकिस्तानमध्ये होती. ती बोलू आणि ऐकू शकत नाही.

गीता, भारत, पाकिस्तान, मुलांचे हक्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गीताचं शिक्षणही सुरू झालं आहे.

2003-04 मध्ये लाहोरमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर गार्ड्सना गीता सापडली. त्यांनी तिला अब्दुल सत्तार ईधी अनाथालयाकडे सोपवलं. त्यावेळी गीताचं वय अकरा असल्याचं सांगण्यात आलं होतं.

27 ऑक्टोबरला, गुरुवारी झारखंडमधलं एक कुटुंब गीताला भेटणार आहे. कदाचित ते तिच्या घरचे असू शकतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)