You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या चिमुरडीचं हृदय 22 मिनिटं बंद पडलं होतं, तरीही तिने मृत्यूला हरवलं
लंडनमध्ये एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा झाला. आता तुम्ही म्हणाल त्यात विशेष काय. पण या बाळाच्या बाबतीत मात्र हे विशेष आहे, कारण या बाळाने मृत्यूलाही हरवलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
जन्मावेळी तिचं वजन फक्त 635 ग्रॅम होतं. आणि तिचं हृदय तब्बल 22 मिनिटं बंद पडलं होतं!
डॉक्टरांनीही या बाळाच्या जगण्याच्या सर्व आशा सोडल्या होत्या. तेवढ्यात अचानक त्या बाळाचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. म्हणूनच या 'मिरॅकल बेबी'चा पहिला वाढदिवस खास ठरला.
या चिमुरडीचं नाव लेसी शरीफ. तिची आई 27 आठवड्यांची गरोदर असताना तिचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला.
पण Necrotising Enterocolitis या आजारावर उपचार करण्यासाठी तिला तातडीने लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं. आतड्यांशी संबंधित या आजारात आतड्यांतील ऊतींना सूज येते आणि आतड्यांत छिद्र तयार होतं.
ही शस्त्रक्रिया होत असताना या बाळाचं हृदय आधी 12 मिनिटं बंद पडलं. पण डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर केली. नंतर पुन्हा तिचं हृदय 10 मिनिटं बंद पडलं.
"शस्त्रक्रिया योग्यरीत्या सुरू होती. पण तिची प्रकती बिघडतच चालली होती. पण आम्ही प्रयत्न सोडले नव्हते," असं भूलतज्ज्ञ डॉ. थॉमस ब्रीन सांगतात.
"इतक्या लहान आणि आजारी बाळाची, जे खरंतर दगावलंच होतं, प्रकृती पूर्ववत झाली आणि तेही मेंदूला कसलीही इजा न होता, हे माझ्या कारकिर्दीत मी कधीही पाहिलं नव्हतं," असं डॉ. ब्रीन म्हणाले.
ही मुलगी खरोखर जिद्दी आहे, तिनं बिकट परिस्थितीशी झुंज दिली आणि त्यावर मात केली, असं ते म्हणाले.
लेसीची आई ल्युसी आणि वडील फिलिप सांगतात त्यांच्या मुलीच प्रकृती फारच गंभीर होती आणि तिच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती. ल्युसी सांगतात, "या शस्त्रक्रियेतून ती जगू शकेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. तिच्या जन्म दाखल्याची आणि मृत्यूच्या दाखल्याची नोंद एकाच वेळी करावी लागेल, अशी भीती आम्हाला वाटली होती."
शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती सुधारत गेली. 13 दिवसांनंतर तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास 111 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर फेब्रुवारी 2018मध्ये तिला डिस्चार्ज देण्यात आला.
सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टर आता सांगतात की या मुलीची वाढ चांगली होईल आणि सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल.
बालरोगतज्ज्ञ झाहीद मुख्तार म्हणाले, "आरोग्य तपासणीसाठी तिला सातत्याने हॉस्पिटलला यावं लागेल. पण नंतर ती सामान्य आयुष्य जगू शकेल. ही चांगली बातमी आहे. तिचा पहिला वाढदिवस ही आनंदाची बातमी आहे."
ल्युसी सांगतात हॉस्पिटलमधले पहिले चार महिने त्यांच्यासाठी फारच कठीण होते, पण ती सुरक्षित हातांमध्ये आहे, याची त्यांना खात्री होती.
सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लेसी पहिला वाढदिवस साजरा करू शकली नसती, असं त्या सांगतात.
आहे ना खरंच ही 'मिरॅकल बेबी'?
हेही वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)