You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गॅबॉन : दवाखान्याचं बिल भरलं नाही म्हणून पाच महिने बाळाची आबाळ!
एका दवाखान्याच्या प्रशासनाने कित्येक महिने एका नवजात बाळाला ओलिस ठेवून घेतलं होतं. का? कारण त्याच्या आईवडिलांनी दवाखान्याचं थकित बिल भरलं नव्हतं.
अखेर जन्माच्या पाच महिन्यांनंतर बिलाचे पैसे भरल्यानंतर दवाखान्याने बेबी एंजलची सुटका केली. "पहिल्या पाच महिन्यात मला माझ्या बाळापासून लांब ठेवल्यानं माझं दूध आटून गेलं आहे," असं एंजलच्या आईने बीबीसीला सांगितलं.
आफ्रिका खंडातल्या गॅबॉन या देशात घडलेल्या या प्रकारानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. अनेक जणांनी बेबी एजेंलच्या आईला पाठिंबा दिला. या परिवारासाठी एक लोकवर्गणी मोहिम राबवण्यात आली, ज्यातून दोन कोटी CFA (गॅबॉनचं चलन) म्हणजेच 2.33 लाख रुपये जमा झाले आणि त्या दवाखान्याचं बिल भरलं गेलं.
गॅबॉनचे राष्ट्राध्यक्ष अली बोंगो यांनीही यात आर्थिक हातभार लावला.
या दवाखान्याच्या संचालकांना सोमवारी बाळाचं अपहरण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. "मात्र त्यांच्यावर लावलेले गुन्हे दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले," अशी माहिती बीबीसी आफ्रिकाचे प्रतिनिधी चार्ल्स स्टेफान माव्होग्नू यांनी दिली.
बेबी एजेंलला अखेर घरी सोडण्यात आलं.
बाळाची आई सोनिया ओकमे यांनी बीबीसीला सांगितलं त्यांना एकाच वेळी आनंद-दुःख एकाच वेळी होत आहे. "माझं बाळ मला परत मिळालं म्हणून मी खूश आहे. पण वाईट याचं वाटतंय की मी तिला आता दूध पाजू शकत नाही. कारण पाच महिने तिच्यापासून लांब राहिल्यामुळे माझं दूध आटलं आहे."
बाळाला कोणत्याही प्रकारच्या लसी दिलेल्या नाहीत, अशी तक्रारही सोनिया यांनी केली आहे.
गॅबॉन मीडिया टाईम्स या तिथल्या फ्रेंच वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एजेंलच्या आईची प्रसूती वेळेआधीच झाली. म्हणून त्या बाळाला 35 दिवस काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. दवाखान्याने त्याचंच एवढं जास्त बिल पाठवलं होतं जे एजेंलचा परिवार भरू शकलं नव्हतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)