Nobel Peace Prize 2018 : डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

महिला हक्क आणि बलात्कार विरोधी कार्यकर्त्या नादिया मुराद आणि डेनिस मुकवेगे यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागात महिलांवर होणारे बलात्कार थांबावेत यासाठी या दोघांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांची दखल नोबेल समितीनं घेतली आणि त्यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

डॉक्टर डेनिस मुकवेगे हे मुळचे काँगोचे आहेत. त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा भाग त्यांनी लैंगिक अत्याचार पीडितांना मदत करण्यासाठी खर्च केला आहे.

डॉक्टर डेनिस मुकवेगे यांच्या स्टाफनं आतापर्यंत हजारो बलात्कार पीडितांवर उपचार केले आहेत. नोबेल पारितोषिक जाहीर करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे.

नादिया मुराद यांची 2016 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी आयएसच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. मानवी तस्करांच्या तावडीतून सुटलेल्यांसाठी काम करणाऱ्या त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या सदिच्छादुत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)