You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांची यशस्वी सुटका
भारतीय महासागरातील वादळात किनाऱ्यापासून 3200 किलोमीटर अंतरावर अडकून पडलेले भारतीय खलाशी कमांडर अभिलाष टॉमी यांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील समुद्रात त्यांची 'थुरिया' यॉट मोडली होती. त्यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने पथकं रवाना केली होती. अभिलाष यांनी गोल्डन ग्लोब अराऊंड द वर्ड रेस या शर्यतीत भाग घेतला आहे.
'या वादळात माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून मी हालचाल करू शकत नाही, मी काही खाऊपिऊ शकत नाही', असा संदेश अभिलाष यांनी पाठवला होता.
130 कि.मी.च्या सोसाट्याच्या वाऱ्याने या वादळात 45 फूट उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या लाटात त्यांची नौका सापडली.
या स्पर्धेत सहभागी 11 खलाशी स्वतःला वाचवू शकले आहेत, आणि ते उत्तरेला आहेत, असं संयोजकांनी म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेचे विमान उड्डाण भरण्यासाठी सज्ज असून ते परिस्थितीची पाहणी केली होती. ऑस्ट्रेलियन जॉईंट रेस्क्यू को ऑर्डिनेशन सेंटर अभिलाष यांना सोडवण्यासाठी सर्व प्रयत्न केले.
अभिलाष भारतीय नौसेनेतील कमांडर आहेत. शनिवारी त्यांनी संदेश पाठवला होता. त्यात ते म्हणातात, "चालता येणंही कठीण झालं आहे. मला बहुतेक स्ट्रेचर लागेल. मी बोटीत सुरक्षित आहे. माझा सॅटेलाईट फोन बंद पडला आहे." बोटीतील टेक्स्टिंग युनिटचा वापर करून त्यांनी हा संदेश पाठवला होता.
अभिलाष यांच्या बॅगेत स्वतंत्र सॅटेलाईट फोन आहे, पण ते बॅगेपर्यंत पोहोचू शकत नव्हते.
गोल्डन ग्लोब या स्पर्धेत जगाची प्रदक्षिणा करायची असते. यात सॅटेलाईट फोन वगळता इतर कोणतीही आधुनिक साधनं वापरली जात नाहीत. हा प्रवास 30 हजार मैल इतका असतो. ही स्पर्धा 1 जुलैला सुरू झाली असून यातून आतापर्यंत 7 स्पर्धक बाहेर पडले आहेत.
टॉमी यांनी 2013ला जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली होती. अशी प्रदक्षिणा करणारे ते पहिले भारतीय आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)