फ्लोरेन्स चक्रीवादळाचा वेग मंदावला, 17 लाख लोक स्थलांतरित

फ्लेरेन्स चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत ते अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दशकांतील सगळ्यांत शक्तिशाली असं हे वादळ असेल असं अंदाजकर्त्यांचं म्हणणं आहे.

वादळ येण्यापूर्वीच परिसर सोडण्यासाठी लोकांची मोठी घाई झाली आहे. आतापर्यंत जवळपास 17 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या हायवेची वाहतूक बाहेर पडण्याच्या दिशेने एकेरी करण्यात आली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लवकर लोकांना सुरक्षित स्थळी जाता येईल

फ्लोरेन्स आता अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याच्या जवळ पोहोचलं आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला असून अधिकाऱ्यांनी जीवितहानीचा इशारा दिला आहे.

सध्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे, पण तरी तो 195 किमी प्रतितास आहे. आता या वादळाचं रुपांतर कॅटेगरी 4 वरून कॅटेगरी 3 मध्ये झालं आहे. म्हणजेच त्याची तीव्रता कमी झाली आहे.

या वादळामुळे उत्तर कॅरोलिनाच्या विलिंग्टन भागात गुरुवारी भूस्खल्लन होण्याची शक्यता आहे.

व्हर्जिनिया, मेरिलँड, वॉशिंग्टन, उत्तर आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांनी बुधवारी आणीबाणीची घोषणा केली आहे. त्यात आता जॉर्जीयाची सुद्धा भर पडली आहे.

"हे राक्षसी, धोकादायक आणि ऐतिहासिक वादळ आहे," असं उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कूपर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

किती हानी होऊ शकते?

NWSच्या मते वादळाची उंची 13 फूट असू शकते. किनारपट्टीला या वादळाचा धोका सगळ्यांत जास्त आहे.

या वादळामुळे काही भागात 64 सेमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भूस्खलन झाल्यानंतरही वादळ राहिलं तर या धोक्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांच्या कार्यालयाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तीव्र पूर, वादळी वारे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

दक्षिण कॅरोलिनातील WCBD-TV साठीचे मुख्य हवामान तज्ज्ञ रॉब फॉलेर यांनी बीबीसीला सांगितलं की, "फ्लॉरेन्सची तीव्रता वाढत आहे आणि अगदी 100 मैलावर असलेल्या लोकांनाही त्याची तीव्रता जाणवू शकते."

ज्या भागात वादळाचा परिणाम होणार आहे तिथले लोक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे या वस्तूंचा अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे.

ट्रंप यांचं काय म्हणणं आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनात आणीबाणी लागू करण्याच्या आदेशावर सही केली आहे. वादळाला तोंड देण्यासाठी आणि मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी मंजूर केला आहे.

या परिस्थितीत लढा देण्यासाठी निधी देण्यात कोणतीही कसूर केली जाणार नाही, असं ट्रंप यांनी आपल्या कार्यालयात बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)