You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धुळीच्या वादळातील बळींची संख्या सव्वाशे; पुन्हा तडाख्याची शक्यता
उत्तर भारतात 2 मेच्या रात्री आलेल्या धुळीच्या वादळानं सव्वाशे जणांचा बळी घेतला आहे. येत्या काही दिवसात धुळीचं वादळ पुन्हा अवतरण्याची शक्यता आहे.
जोरदार वारे आणि वीज पडून अनेक गावांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी भिंत पडून माणसं जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत.
धुळीच्या वादळाने झालेलं नुकसान गेल्या 20 वर्षांतलं सर्वाधिक असल्याचं उत्तर प्रदेश आपत्ती निवारण आयुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
वादळाचा फटका बसलेल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शनिवार-रविवारपर्यंत उत्तर भारतातल्या आणखी काही भागांना धुळीच्या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
लोकांनी सावधानता बाळगावी असं आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे.
उत्तर प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांना धुळीच्या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. असंख्य ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती.
आग्र्याच्या ताजमहाल परिसराला धुळीच्या वादळानं सर्वाधिक तडाखा दिला. राजस्थानमधल्या अल्वर, भरतपूर आणि धोलपूर या जिल्ह्यांना वादळाचा फटका बसला.
रात्रीच्या वेळी घरात झोपलेल्या अनेकांनी या वादळात जीव गमावले. धुळीच्या वादळानं घरांची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली.
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत, असं उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलं. दरम्यान आंध्र प्रदेशलाही वादळाचा फटका बसला आहे.
मी गेली 20 वर्ष कार्यरत आहे. एवढ्या वर्षांतलं हे सगळ्यांत भयंकर असं धुळीचं वादळ आहे, असं राजस्थान आपत्ती निवारण व्यवस्थापनाचे सचिव हेमंत गेरा यांनी सांगितलं.
11 एप्रिललाही मोठ्या तीव्रतेचं धुळीचं वादळ आलं होतं. त्यात 19 जणांनी जीव गमावला होता. मात्र परवा आलेलं वादळ रात्री आलं. त्यामुळे पीडितांची संख्या वाढली. लोक जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडू शकले नाहीत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)