डोनाल्ड ट्रंप यांनी रद्द केला परराष्ट्र मंत्र्यांचा उत्तर कोरिया दौरा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ हे सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार नाहीत. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांना प्रस्तावित दौरा रद्द करण्यास सांगितले आहे.

कोरियाला अण्वस्त्र मुक्त करण्याच्या दृष्टीनं योग्य ती प्रगती झालेली नाही, असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधांवरून तणाव सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेला उत्तर कोरियावर पुरेसा दबाव आणता आलेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रत्यक्षात, जून महिन्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ट्रंप यांनी उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा धोका नसल्याची भूमिका घेतली होती.

त्यापाठोपाठ, उत्तर कोरियानं अजूनही अणुचाचणी केंद्र बंद केलेली नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

दरम्यान, एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यानं वॉशिंग्टन पोस्टला माहिती दिली की, उत्तर कोरया आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याची शक्यता आहे.

माइक पोम्पिओ आणि उत्तर कोरियासाठी नेमलेले विशेष दूत स्टीफन बेगन हे दोघेही पुढल्या आठवड्यात उत्तर कोरियात जाणार होते.

हा पोम्पिओ यांचा उत्तर कोरियाचा चौथा दौरा होता. पण आता तो रद्द झाला आहे.

त्यासंदर्भात केलेल्या तीन ट्वीटमध्ये ट्रंप यांनी चीनवरही टीका केली आहे.

काय म्हणाले ट्रंप

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)