You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅरेथा फ्रँकलिन : अमेरिकन-आफ्रिकन नागरी चळवळीचा सांगीतिक आवाज
'क्वीन ऑफ सोल' या बिरुदानं नावाजलेल्या सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका अॅरेथा फ्रँकलिन यांचं वयाच्या 76व्या वर्षी डेट्रॉईट इथे निधन झालं. 2010मध्ये कर्करोग झाल्यानं त्यांनी संगीत क्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती.
सात दशकांच्या गाजलेल्या सांगितिक कारकिर्दीत अॅरेथा यांना तब्बल 17 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.
अमेरिकेतल्या डेट्रॉईट 1950च्या दशकांत अॅरेथा फ्रँकलिन लहानाच्या मोठ्या झाल्या. पहिल्यापासूनच त्या नागरी हक्कांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या होत्या.
त्यांनी आजवर गायलेली गाणी चळवळीची अभिमान गीतं बनली होती.
1963मध्ये नागरी हक्कांच्या स्वातंत्र्यासाठी सुरू झालेल्या झालेल्या पायी मोर्चाचं नेतृत्व त्यांच्या वडिलांकडे होतं. ही चळवळ या वर्षअखेरीपर्यंत सुरू राहिली आणि या वर्ष अखेरीसच मार्टीन ल्युथर किंग यांनी त्यांचं जगप्रसिद्ध भाषण केलं.
मार्टीन ल्युथर किंग त्यांच्या वडिलांकडे अनेकदा पाहुणे म्हणून येत. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी त्यांचा पहिला अल्बम रेकॉर्ड केला. हा अल्बम रेकॉर्ड झाल्यावर त्या किंग यांच्यासोबत दौऱ्यावरही गेल्या होत्या. बरोबर दशकभरानंतर त्यांनी किंग यांच्या मृत्यूदिवशी गाणं गायलं होतं.
सामाजिक बदलांच्या चळवळीसाठी कलेचा वापर कसा करावा याचं फ्रँकलिन उत्तम उदाहरण असल्याचं किंग यांची मुलगी डॉ. बर्निस किंग यांनी म्हटलं होतं. "या चळवळीची मुलगी म्हणून ओळखल्या गेलेल्या फ्रँकलिन यांनी केवळ त्यांचा आवाज मनोरंजनासाठीच वापरला नाही, तर सामाजिक बदलांसाठी त्यांच्या गाण्यानं पिढ्यांना प्रेरणा दिली," असंही डॉ. बर्निस म्हणाल्या.
2015मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती बराक ओबामा म्हणाले होते की, "जेव्हा अॅरेथा गातात तेव्हा अमेरिकी इतिहासच त्यांच्या तोंडून बोलत असल्याचा भास होतो." ओबामा यांनी त्यांच्या निधनानंतर ट्वीट करून त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
तर, आयुष्यातल्या सर्वोत्तम गायिका या अॅरेथा याच होत्या. संगीत आणि सामाजिक चळवळ याचा योग्य मेळ साधत त्यांनी गायनाची कारकिर्द सुरू ठेवली, असं ट्वीट सुप्रसिद्ध गायिका मारियाह कॅरी यांनी केलं आहे.
फ्रॅंकलिन त्यांचं संपूर्ण आयुष्य अफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या हक्कांचं प्रतिक बनून राहील्या. त्यामुळे अफ्रिकन-अमेरिकन चळवळीचा सांगितिक श्वास हरपल्याच्या भावना अमेरिकेतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)