पाहा व्हीडिओ : दलित गायकांचा सांगीतिक एल्गार

    • Author, सरबजीत धालीवाल
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी

पंजाबमधल्या युवा दलित गायकांनी जातव्यवस्थेला आव्हान देण्याचं काम त्यांच्या सांगीतिक आविष्कारातून केलं आहे.

चमचमत्या जालंधर शहरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर अबादपुरा नावाचा दलित वस्ती असलेला परिसर आहे. मात्र आता हा भाग गिन्नी दा मोहल्ला नावानं प्रसिद्ध झाला आहे.

गिन्नी माही उर्फ गुरकंवालकौर भारती 16 दिवसांनंतर आपला 19वा वाढदिवस साजरा करेल. मात्र लहान वयातच तिनं केवळ पंजाबच्या संगीत वर्तुळात नव्हे तर देशभरात नाव कमावलं आहे.

पंजाबची ओळख असलेल्या रंगीबेरंगी आकर्षक कपड्यांमध्ये वावरणारी गिन्नी सध्या कॉलेजात शिकते.

गिन्नी दलित समाजाची प्रतिनिधी आहे. पिचलेला आणि उपेक्षित अशी या समाजाची वर्षानुवर्षांची ओळख येत्या काही वर्षांमध्ये पुसली जाईल असा विश्वास तिला आहे.

दलित समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणारे गुरू रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उपदेश गिन्नीच्या गाण्यांचा अविभाज्य घटक आहे. समाजाला एकत्र बांधण्यासाठी हे आवश्यक असल्याचं गिन्नीला वाटतं.

'डर के ना रहना ऐसा जोश सिखा गया, हक दे लयी लढना बाबासाहेब सिखा गया', (कोणालाही घाबरू नका ही शिकवण त्यांनी दिली. हक्कांसाठी संघर्ष करण्याचा सल्ला बाबासाहेबांनी दिला.) बाराव्या वर्षांपासून गिन्नी गाणी गात आहे. "माझ्या समाजानं जागृत व्हावं, एवढंच मला वाटतं" असं ती सांगते.

पंजाबमधल्या प्रस्थापित जातीव्यवस्थेविरोधात आपल्या कलेच्या माध्यमातून एल्गार पुकारणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये गिन्नीचा समावेश होतो.

सगळ्यांना समानतेची वागणूक मिळेल आणि वर्चस्ववादी जातीची उतरंड नष्ट होईल या विचारांतून उपेक्षित समाजातील मंडळींनी नव्या धर्माचा स्वीकार केला. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे, हे गिन्नीच्या लक्षात आलं.

पंजाबमध्ये एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जातींचं प्रमाण देशभरात सर्वाधिक असल्याचं 2011 च्या जनगणनेत स्पष्ट झालं. पंजाबमध्ये अनुसूचित वर्गाचं प्रमाण 32 टक्के आहे.

'गौरव से कहों हम चमार है' हे घोषवाक्य उर्वरित समाजसमोर मांडण्यात या वर्गाची दोन दशकं व्यतीत झाली आहेत.

'चर्चा चमारन दे', 'डेंजर चमार' या गाण्यांनी दलित समाजात स्वत:च्या समाजाबाबत स्वाभिमान निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नवा शहरातले गायक रुल लाल धीर हे 'हमर विच औंदा पुत चमार दा' या गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पंजाबमधल्या तरुणाईच्या ओठांवर हे गाणं रुळलं आहे.

"गुरूबानी या पंजाबी समाजाच्या प्रार्थनेत चमार शब्दाचा उल्लेख आहे. साक्षात गुरुंनी आमच्या अस्तित्वाचा गौरव केला आहे. त्याचा सार्थ अभिमान बाळगणं आवश्यक आहे." असं ते सांगतात.

जातीय किनार असल्यानं टीव्ही चॅनेल्स ही गाणी प्रक्षेपित करत नाहीत. अशा परिस्थितीत युट्यूब आणि सोशल मीडिया या नवगायकांसाठी मोठा आधार आहे.

'तौर चमार दी' आणि 'बल्ले बल्ले चमारन दी' या गाण्यांसह राज दाबराल प्रसिद्ध झाला आहे. या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. "मात्र तरीही आमच्या समाजाविरुद्धची भेदभावाची वागणूक संपलेली नाही" अशी खंत राज व्यक्त करतो.

"या गाण्यांनी मला नुसती लोकप्रियता मिळवून दिली नाही, तर माझी लाइफस्टाइलही अमूलाग्र बदलली आहे" असं तो पुढे आवर्जून सांगतो.

"सुरुवातीला माझ्या गाण्यांना जेमतेम प्रतिसाद होता. मात्र आंबेडकर आणि रविदास यांचा उल्लेख असलेल्या गाण्यांनी चित्र बदललं. आता मी बंगल्यात राहतो. आता मी पंचायत समितीचा सदस्यही आहे."

हा बदल अचानक घडलेला नाही. 2009 मध्ये डेराचे प्रमुख संत रामानंद यांची व्हिएन्नात हत्या झाली. या घटनेनं सगळी परिस्थिती बदलली. या घटनेनंतर दलितांना एकत्र येण्याची आवश्यकता जाणवली. संगीताच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणता येईल हे त्यांच्या लक्षात आलं.

या सर्व तरुण गायकांचा जातीव्यवस्थेला प्रखर विरोध आहे. याबाबत गिन्नी म्हणते, 'वैविध्यपूर्ण गायिका म्हणून माझी ओळख असावी असं मला वाटतं. केवळ एका समाजाची किंवा वर्गाची गाणी म्हणणारी गायिका अशी संकुचित ओळख नकोय."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)