पुणे विसरा, हे आहे जगात राहायला सगळ्यांत चांगलं शहर

शहरं

फोटो स्रोत, Getty Images

जर सोमवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या Most Livable Cities च्या यादीत पुण्याचं नाव देशात अव्वल पाहून खूश झाले असाल तर जरा थांबा. कारण जगातील सगळ्यांत जास्त राहण्यायोग्य 10 शहरांपैकी भारतातलं एकही शहर नाहीये. एवढंच नव्हे तर आशियाई शहरांपैकी फक्त जपानच्या दोन शहरांचा समावेश आहे - राजधानी टोक्यो आणि ओसाका.

Economist Intelligence Unitच्या वार्षिक जागतिक सर्वेक्षणानुसार ऑस्ट्रियाची राजधानी जगातील सगळ्यांत जास्त राहण्यायोग्य शहर आहे. गेली तीन वर्षं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिएन्नाने ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहराला मागे टाकत बाजी मारली.

दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या रँकिंगमध्ये पहिल्यांदाच युरोप खंडातील एखाद्या शहराने हा मान पटकावला आहे.

विएन्नामधलं श्रॉब्रंग पॅलेस
फोटो कॅप्शन, विएन्नामधलं श्रॉब्रंग पॅलेस

राजकीय आणि सामाजिक स्थिरता, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्यसुविधा या निकषांच्या आधारावर 140 शहरांची यादी तयार करण्यात आली होती.

या सर्वेक्षणात युरोपियन शहरांमध्ये मँचेस्टरचा सगळ्यांत जास्त विकास झाल्याचं लक्षात आलं आहे. या क्रमवारीत त्यांनी 16 स्थानांची मुसंडी मारत 35वा क्रमांक मिळवला. यादरम्यान मॅंचेस्टरने लंडनलाही 13 क्रमांकांनी मागे टाकलं.

संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या सुधारणेमुळे मँचेस्टरची क्रमवारी सुधारली, असं इकॉनॉमिस्टचं मत आहे.

कालच भारताच्या गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने भारतीय शहरांचा Ease of Living Index जाहीर केला. त्यात पुणे शहर देशात अव्वल, नवी मुंबई दुसऱ्या, बृहन्मुंबई तिसऱ्या आणि ठाणे सहाव्या क्रमाकांवर आहे.

संवेदनशीलता

गेल्या वर्षी मँचेस्टरमध्ये झालेल्या हल्ल्यात 22 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या सर्वेक्षणात मँचेस्टरची क्रमवारी घसरली होती. त्यामुळे या सर्वेक्षणावर टीका झाली होती.

सर्वेक्षणाच्या संपादिका रोक्साना स्लाचेव्हा म्हणाल्या की या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामुळे मँचेस्टरमधली शांतता भंगली होती. पण त्या धक्क्यातून सावरायला मँचेस्टरने जराही वेळ दवडली नाही. त्यांनी पुढे सांगितलं की अनेक पश्चिम युरोपियन शहरांची सुरक्षितता वाढली आहे, आणि व्हिएन्नाचं या रँकिंगमधलं यश म्हणजे युरोपात शांतता पुन्हा एकदा नांदत असल्याचं द्योतक आहे.

सर्वेक्षणात सामील झालेल्या अर्ध्याअधिक शहरांचा जगण्यायोग्य क्रमवारीतील मानक गेल्या वर्षभरात सुधारल्याचं सांगण्यात येत आहे.

गेली सात वर्षं सर्वोच्च स्थानावर राहिलेल्या मेलबर्नची यंदा दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि अॅडिलेड या शहरांनीही या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे.

मेलबर्न

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेलबर्न शहराने गेल्या सात वर्षांत या सर्वेक्षणात वरचा क्रमांक मिळवला आहे.

पण या क्रमवारीच्या तळाशी युद्धाने ग्रासलेल्या सीरियातील दमास्कस शहराचं नाव आहे. त्यानंतर बांगलादेशातील ढाका आणि नायजेरियातील लागोसचा समावेश आहे.

गुन्हेगारी, नागरी अशांतता, कट्टरवाद किेंवा युद्धामुळे ही शहरं क्रमवारीत तळाशी असल्याचं द इकॉनॉमिस्टने सांगितलं आहे.

शहरं

फोटो स्रोत, Getty Images

line

जगातील राहण्यायोग्य 10 शहरांची क्रमवारी (2018)

1.व्हिएन्ना, ऑस्ट्रिया

2.मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

3.ओसाका, जपान

4.कलगारी, कॅनडा

5.सिडनी, ऑस्ट्रेलिया

6.वॅनकूव्हर, कॅनडा

7.टोक्यो, जपान

8.टॉरांटो, कॅनडा

9.कोपनहेगन, डेन्मार्क

10.अॅडिलेड, ऑस्ट्रेलिया

line

जगातील राहण्यायोग्य नसलेल्या 10 शहरांची क्रमवारी (2018)

1.दमास्कस, सीरिया

2.ढाका, बांगलादेश

3.लागोस, नायजेरिया

4.कराची, पाकिस्तान

5.पोर्ट मोर्स्बे, पापुआ न्यू गिनी

6.हरारे, झिंबाब्वे.

7.त्रिपोली, लिबिया

8.डॉव्ला, कॅमेरून

9.अल्गेरिस, अल्जेरिया

10.डकार, सेनेगल

line

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)