BBC SPECIAL: चीनमध्ये असा भरतो लग्नाचा आठवडी बाजार

चीन
फोटो कॅप्शन, मुलींना असं वाटतं की चुकीच्या मुलाबरोबर राहण्याऐवजी एकटं राहणं कधीही चांगलं.
    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

शनिवारचा दिवस होता. पाऊस असूनसुद्धा शांघायच्या पीपल्स पार्कधमध्ये प्रचंड गर्दी होती. पार्कात वाटेच्या बाजूला बसलेले काही लोक कुणाची तरी वाट बघत होते. तर इतर काही एकमेकांशी बोलत बसले होते. काही छत्र्या डोक्यावर होत्या तर काही जमिनीवर ठेवल्या होत्या.

छत्र्या, भिंती, जमीन, झाडांवर प्लॅस्टिकच्या पिशवीत A4 साईझच्या कागदावर मँडरिन भाषेत मुलामुलींचे बायोडाटा ठेवले होते. पण यांचं काम काय?

हा एकप्रकारे लग्नाचा आठवडी बाजार आहे. 2005पासून हा बाजार दर आठवड्याच्या शेवटी भरतो. आधी इथे लोक व्यायाम करायला यायचे. आता ते मुलामुलींची लग्न जुळवायला येतात.

चीनमध्ये महागाई वाढतेय आणि आपल्या जोडीदाराकडून मुलामुलींच्या अपेक्षासुद्धा वाढत आहेत. म्हणून ते उशिरा लग्न करतात किंवा लग्नच करत नाही. लग्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलत आहे.

चीन
फोटो कॅप्शन, ग्रेस यांनी आपल्या भाच्यासाठी मुली शोधल्या. पण त्या मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांना नकार दिला.

चीनसारख्या देशात असं होणं स्वाभाविक आहे. अमेरिका, जपान, भारत प्रत्येक देशात असंच चित्र तयार होतंय. जसं भारतात मुलांनी लग्न केलं नाही तर त्यांचे पालक काळजीत पडतात, त्याचप्रमाणे चीनमधल्या पालकांनाही त्यांच्या मुलांच्या लग्नाची चिंता असतेच.

या पार्कमध्ये आमची ओळख ग्रेसबरोबर झाली. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ग्रेस इथे आपल्या भाच्यासाठी मुलगी शोधत होत्या. मात्र अनेक मुलींच्या कुटुंबांनी त्यांच्या प्रस्तावाला नकार दिला.

लक्षाधीश मुलांना मागणी

ग्रेस यांनी आम्हाला त्यांचा भाचा झांग शी मिंग याचा फोटो मोबाईलवर दाखवला. "माझा भाचा महिन्याला 5,000 युआन (जवळपास 50,000 रुपये) कमावतो. पण मुलींच्या कुटुंबाची मागणी आहे की त्याने महिन्याला कमीतकमी 10,000 युआन (म्हणजे साधारण एक लाख रुपये) कमवावेत. यामुळे तो स्वत:साठी मुलगी शोधू शकत नाही."

चीनमध्ये मुलांना लग्नाच्या आधी घराची सोय करावी लागते आणि इथं घरांच्या किंमती कोटींमध्ये आहेत.

चीन
फोटो कॅप्शन, इथे छत्रीवर मुलामुलींचा असा बायोडाटा लिहिला असतो.

पार्कमध्ये बसलेल्या मुलींच्या घोळक्यातून एक मुलगी हसत म्हणाली, "चीनच्या संस्कृतीमध्ये लग्नाआधी मुलांना आपल्या घराची व्यवस्था करावी लागते. कारण मुली फर्निचर घेऊनच येतात."

पण ग्रेस योग्य वेळेची वाट पाहत आहे.

चीनमध्ये शिक्षण झाल्यावरसुद्धा जर मुलीचं लग्न झालं नाही तर तिला लेफ्टओव्हर म्हणजे उरलीसुरली असं म्हटलं जातं आणि तिला चांगल्या नजरेनं पाहिलं जात नाही.

ग्रेस यांनी मला सांगितलं, "इथे ज्या मुलींचे आईवडील आले आहेत त्या मुली पस्तिशीच्या आसपास आहेत. त्यांच्याकडे चांगलं शिक्षण आणि नोकऱ्या आहेत. योग्य व्यक्ती निवडण्याची पातळी उंचावली आहे. जेव्हा या मुलीचं वय 40 पर्यंत पोहोचेल तेव्हा त्यांची निवडीची चाळणी बदलेल."

चीनमध्ये पुरुषांसाठी लग्नाचं वय 22 आणि मुलींसाठी ते 20 आहे.

लग्नासाठी येणाऱ्या अडचणींसाठी सरकारच्या 'वन चाईल्ड' धोरणाला जबाबदार ठरवलं जात आहे.

चीन
फोटो कॅप्शन, 2005 पासून प्रत्येक आठवड्याच्या शेवटी इथे लग्नााचा बाजार भरतो

खरंतर भारतासारखं चीनमध्ये सुद्धा बहुतांश कुटुंबांमध्ये मुलगाच जन्माला यावा अशी इच्छा असते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या धोरणामुळे लोकांचा मुलीऐवजी मुलांकडे कल वाढला होता. त्यामुळे चीनमधलं लिंग गुणोत्तर बिघडलं.

मुलींची घटती संख्या

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या 2016 च्या आकडेवारीनुसार चीनमध्ये 1000 पुरुषांमागे फक्त 868 महिला आहेत.

पार्कमध्ये आलेल्या बहुतांश पालकांना एकुलतं एक मुल होतं. मात्र या समस्येला शहरीकरणाला जास्त जबाबदार ठरवलं जातं.

स्थानिक पत्रकार एडेरा लियांग सांगतात, "चीनमध्ये लग्न करण्याची ही पारंपरिक पद्धत नाही. इथं येणारी बहुतेक कुटुंब रुढीवादी आहेत. ज्या मुलांचे आई बाप इथं आहेत त्यांचं वय 35-40 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यांच्या आईवडिलांना इथे येण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना असं वाटतं की इथं त्यांच्या मुलांना जोडीदार मिळेल."

चीन

पण अनेकांच्या मते, इथे लग्न जुळण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे.

बऱ्याच प्रयत्नानंतर एका मुलीनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, "लग्न करण्यासाठी हे चांगलं व्यासपीठ आहे. इथे लोक एकमेकांना भेटतात. त्यातून काही झालं तर चांगलंच आहे."

नुकतंच सरकारनं 'वन चाईल्ड' धोरण रद्दबातल ठरवलं. म्हणजे तुम्ही एकापेक्षा अधिक मुलांना जन्म देऊ शकता. यामुळे भविष्यात लग्नाची समस्या सुटण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

एका आकडेवारीनुसार लोकसंख्या कमी करण्यासाठी या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली होती. हे धोरण 1979 साली आलं होतं. पण चीनच्या लोकांचं वाढलेलं आयुर्मान बघता सरकारला धोरणात बदल करावा लागला.

चीन
फोटो कॅप्शन, मुलींना असं वाटतं की चुकीच्या मुलाबरोबर राहण्याऐवजी एकटं राहणं कधीही चांगलं.

एडेरा सांगतात, "सरकारच्या या धोरणामुळे लिंग गुणोत्तर असंतुलित झालं. मात्र लग्नात येणाऱ्या समस्यांचं हे एक कारण आहेच. या धोरणात बदल झाल्यामुळे काही वर्षांत ही समस्या सुटेल अशी आशा आहे."

काल्पनिक बॉयफ्रेंड, ऑनलाईन मॅरेज वेबसाईट्स, मॅचमेकिंग पार्टीजच्या दुनियेतून लग्नाच्या या बाजारात नवीन नाती तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश मिळेल अशी आशा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)