You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पत्रकारांना राष्ट्राचे शत्रू म्हणू नका' - ट्रंप यांना न्यूयॉर्क टाइम्सचं आवाहन
सातत्याने पत्रकारांना देशाचे शत्रू म्हणून हिणवणं बंद करा, असं आवाहन 'न्यूयॉर्क टाइम्स' वर्तमानपत्राने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना केलं आहे.
पत्रकारांना उद्देशून अशीच खोचक शेरेबाजी सुरू राहिली तर वातावरण भडकू शकतं, असा इशाराही न्यूयॉर्क टाइम्सने दिला आहे.
न्यूयॉर्क टाइम्सचे प्रकाशक A. G. सल्झबर्गर आणि ट्रंप यांची गोपनीय भेट झाली. पण ट्रंप यांनी या भेटीसंदर्भात ट्वीट केल्यानंतर सल्झबर्गर यांनी या खासगी भेटीचा तपशील उघड केला.
पहिल्या ट्वीटमध्ये ट्रंप यांनी ही बैठक चांगली झाल्याचं लिहिलं. मात्र नंतरच्या ट्वीटमध्ये त्यांनी माध्यमांवर पुन्हा एक टीकास्त्र सोडलं.
"फेक न्यूज कशा पसरवल्या जातात याविषयी मी खूप वेळ चर्चा केली. आता तर फेक न्यूज या संकल्पनेने जनतेच्या शत्रूचं रूप घेतलं आहे," असं ते पुढे बोलले.
प्रसारमाध्यमं वार्तांकनासाठी लोकांचा जीव धोक्यात टाकत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पण 'फेक न्यूज' ही संज्ञा ते स्वतः किती वेळा वापरतात, याविषयी ट्रंप काहीही बोलले नाहीत.
ट्रंप यांचा प्रसारमाध्यमांसाठीचा पूर्वग्रह किती चिंताजनक आहे, हे त्यांना भेटून सांगता यावं म्हणून आपण या चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं, असं न्यूयॉर्क टाइम्सचे सल्झबर्गर म्हणाले
"ट्रंप सातत्याने प्रसारमाध्यमांच्या विरोधात बोलत असतात. हे क्लेशदायक आहे. 'फेक न्यूज' ही संज्ञा खोटी आणि धोकादायक आहे, हे ट्रंप यांना सांगितलं. मात्र फेक न्यूजपेक्षाही पत्रकार लोकांचे शत्रू असतात, असं म्हणणं जास्त धोक्याचं आहे, हेही त्यांना सांगितलं," असं सल्झबर्गर यांनी सांगितलं.
पत्रकारांविरोधातील प्रक्षोभक स्वरूपाच्या वक्तव्यांमुळे त्यांना धमक्या मिळण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे हिंसेला चालना मिळेल, असं सल्झबर्गर यांनी ट्रंप यांना या भेटीदरम्यान कळवल्याचं सांगितलं.
पत्रकारांवर आसूड उगवण्यासाठी जगभरात ट्रंप यांच्या मीडियाविरोधी वक्तव्यांचा आधार घेतला जातो. ट्रंप यांच्या उद्गारांमुळे आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांना धक्का बसतो. देशाच्या घटनेचं गुणवैशिष्ट्य असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर यामुळे गदा येते, असंही सल्झबर्गर म्हणाले.
"आमच्या वर्तमानपत्राची चिकित्सा करू नका, असं आमचं म्हणणं नाही. पण पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांना उद्देशून केली जाणारी सरसकट टीका थांबवा."
सल्झबर्गर यांचं वक्तव्य जाहीर झाल्यानंतर ट्रंप यांनी ट्वीटद्वारे त्यांना उत्तर दिलं. "सरकार संदर्भातलं प्रसारमाध्यमांचं वृत्तांकन यामुळे अनेकांचं (पत्रकार वगळून) आयुष्य धोक्यात येतं. हे एकदम देशद्रोही आहे."
"माध्यमांना ट्रंप हे नाव ऐकल्यावरच नकारात्मकता उफाळून येते. आणि म्हणूनच समाजातल्या सकारात्मक गोष्टींचंही नकारात्मक वृत्तांकन केलं जातं," असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)