ट्रंप यांनी ट्विटरवरून केली स्वतःच्या परराष्ट्र मंत्र्यांची हकालपट्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी परराष्ट्र मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) रेक्स टिलरसन यांची हकालपट्टी केली आहे.

अमेरिकेची तपास संस्था CIAचे संचालक माईक पाँपेओ आता नवीन परराष्ट्र मंत्री होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ट्विटरवर याची घोषणा करत ट्रंप यांनी टिलरसन यांचे त्यांनी केलेल्या सेवेसाठी आभार मानले. टिलरसन आधी एक्सॉनमोबिल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यांनी वर्षभरापूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रं स्वीकारली होती.

जिना हास्पेल या CIAच्या संचालकपदाची सूत्र स्वीकारतील, असं ट्रंप यांनी "जिना या CIA च्या पहिल्या महिला संचालक असतील. सर्वांना शुभेच्छा!" असं ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं.

या घोषणेच्या वेळेविषयी बोलताना "उत्तर कोरियाशी मे मध्ये होणाऱ्या चर्चेपूर्वी त्यांची नवीन टीम पूर्णपणे तयार असेल याची ट्रंप यांना खात्री करायची होती." असं व्हाईट हाउसच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

ट्रंप यांचा सैन्यप्रमुख तसंच मोठ्या अधिकाऱ्यांसोबत वाद होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होत्या. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यासमोर सध्या इराण आणि उत्तर कोरियाबरोबर असणाऱ्या संबंधांसारखी मोठी आव्हानं आहेत.

गेल्या ऑक्टोबरमध्ये " उत्तर कोरियासोबत चर्चा करून टिलरसन आपला वेळ वाया घालवत आहेत" असं ट्वीट ट्रंप यांनी केलं होतं.

गेल्या आठवड्यात टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर होते. तेव्हा डोनाल्ड ट्रंप उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्याशी बातचीत करण्यास तयार झाले आहेत. ही बातमी ऐकून धक्का बसला होता असं समजतं.

काही बातम्यांनुसार ट्रंप यांचं परराष्ट्र धोरणांबद्दल किती कमी ज्ञान आहे, यावर टिलरसन यांनी आश्चर्यही व्यक्त केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)