थायलंड गुहेतून सुटका झाल्यानंतर मुलांची हॉस्पिटलमधील छायाचित्रं

उत्तर थायलंडच्या गुहेत दोन आठवड्यांपासून अधिक काळ अडकलेल्या 12 मुलांसह त्यांच्या कोचवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलांची छायाचित्रं पहिल्यांदाच बाहेर आली आहेत.

मागच्या तीन दिवसांमध्ये अत्यंत नाट्यमय पद्धतीनं एका साहसी आणि जोखीमीच्या बचाव मोहिमेद्वारे या मुलांना अरुंद आणि पाण्याने भरलेल्या गुहेतून बाहेर काढण्यात आलं होतं.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या मुलांची छायाचित्रं आता बाहेर आली आहेत. त्यात काही मुलांनी तोंडाला मास्क लावलेला असून रुग्णालयाचा गाऊनही घातलेला आहे. त्यातील एक मुलगा कॅमेऱ्यासाठी व्हिक्ट्री साइन दाखवतानाही आपण पाहू शकतो.

सूत्रांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी लोकांच्या आणि डायव्हर्सच्या हवाल्याने बीबीसीला माहिती दिली की, मुलांना गुहेतून बाहेर काढण्याआधी त्यांना गुंगीचं औषध (सिडेटिव्ह) देण्यात आलं होतं. जेणेकरून अंधारलेल्या अरुंद गुहेतून पाण्याखालून बाहेर येताना ते भयभीत होऊ नये.

रिपोर्टवरून वाद

त्यानंतर त्यांना दोनपैकी एका रेस्क्यू डायव्हर्ससोबत बांधण्यात आलं. त्यांच्यावर पाण्यातून मुलांना एकेक करून सुरक्षित बाहेर आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मुलांना स्ट्रेचरवरून पुढे नेण्यात आलं.

बचाव मोहीम यशस्वी झाल्यानंतर काही तासांमध्ये काही कथित रिपोर्ट बाहेर आले ज्यावरून वाद सुरू झाला. यात मुलांना बाहेर काढतेवेळी अतिरिक्त प्रमाणात गुंगीचं औषध देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

असं असलं तरी मंगळवारी थायलंडच्या पंतप्रधानांनी मुलांना बेशुद्ध करून बाहेर काढण्यात आल्याचा दावा धुडकावून लावला. बाहेर येताना मुलांनी घाबरू नये यासाठी सैनिकांना देण्यात येणाऱ्या औषधांसारखीच औषधं मुलांना देण्यात आली होती, असं पंतप्रधान म्हणाले.

पण अनेक सूत्रांनी असा दावा केलाय की, मुलांनी जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हा ते पूर्णपणे शुद्धीत नव्हते.

यशस्वी ऑपरेशन

हे बारा फुटबॉल खेळाडू आपल्या कोचसमवेत 23 जूनला या गुहेत गेले आणि पाऊस सुरू झाला. पावसाचं पाणी भरल्यानं ते तिथेच अडकले.

मिट्ट काळोखात बुडालेल्या, पाण्याने भरलेल्या आणि अतिशय अरूंद रस्ते असणाऱ्या या गुहेतून मुलांना सुखरूप बाहेर काढण्याच्या मोहिमेवर संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालं होतं.

या मुलांच्या सुखरूप बाहेर येण्याच्या बातमीकडे थायलंडबरोबरच जगभरातले लोक डोळे लावून बसले होते.

"अतिशय खडतर परिस्थितीवर माणसं धीरोदात्तपणे कशी मात करतात याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे."

हे मिशन पूर्ण झाल्यावर चियांग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसक ओसोटानकोर्न यांनी या शब्दांत टीमचं कौकुत केलं. या ऑपेरशनमध्ये सामील झालेल्या टीमला 'संयुक्त राष्ट्रांची टीम' म्हटलं.

या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याठी थायलंडच्यासमवेत भारत, यूके, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपानसारख्या अनेक देशांच्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.

जगभरातून आलेले तज्ज्ञ आणि डायव्हर्सनी आपला जीव धोक्यात घालून गुहेत अडकलेल्या मुलांना आणि त्यांच्या कोचला शोधून काढलं. त्यानंतर प्रदीर्घ चाललेल्या ऑपरेशननंतर या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)