'आम्ही सुरक्षित आहोत, Don't worry' : थायलंडच्या गुहेतून मुलांनी पाठवली पालकांना पत्रं

गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील एका गुहेत 12 मुलं आणि त्यांचा एक प्रशिक्षक अडकले आहेत. गेल्या सोमवारी ते जिवंत सापडल्यानंतर त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी गुहेत पुराचं पाणी आल्यामुळं त्यांना काही महिने हे पाणी ओसरेपर्यंत गुहेतच राहावं लागणार आहे.

दरम्यान, आज या मुलांनी आपल्या पालकांना पत्रं लिहिली आहेत. "Don't worry... आम्ही सर्वजण स्ट्राँग आहोत," असं त्यांनी या पत्रांतून म्हटलं आहे.

गुहेबाहेर आल्यावर आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर तुटून पडू, असं मुलांना लिहिलं आहे.

एका मुलाने तर "बाहेर आल्यावर आम्हाला खूप सारा अभ्यास देऊ नका," अशी विनंती आपल्या शिक्षकाला केली आहे. तर दुसऱ्या पत्रात त्या मुलांच्या प्रशिक्षकाने पालकांची माफी मागितली आहे.

मुलांनी आपल्या पालकांना लिहिलेल्या काही पत्रांवर एक नजर टाकू.

टॅन (टोपणनाव) : आई-बाबा माझी काळजी करू नका. मी इथं सुखरूप आहे. दादाला सांगा की जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा फ्राइड चिकन खाईल. त्याला ते रेडी ठेवायला सांगा. लव्ह यू.

प्रशिक्षक एक्कापॉल चॅंटावाँग : सर्व पालकांनो, आता मुलं सुखरूप आहेत. मी सर्व पालकांची माफी मागतो. इथे आलेली रेस्क्यू टीम आम्हा सर्वांची योग्य काळजी घेत आहे. मी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मुलांची काळजी घेईन. आमच्या मदतीसाठी पुढं आलेल्या लोकांचे मनापासून आभार.

प्रशिक्षक एक्कापॉल चॅंटावाँग: प्रिय आजी, मी इथं सुखरूप आहे. माझी काळजी करू नकोस. मावशी, आजीला सांग मी जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिच्या हातचं नुंपक (थायलंडमधला एक शाकाहारी पदार्थ) आणि पोर्क स्किन खाईल. इथून बाहेर पडल्यावर मी आधी जेवायला जाईल. Love you guys.

पाँग: आई बाबा, मी तुमच्यावर प्रेम करतो. मी इथं सुरक्षित आहे.

Love you guys.

निक: आई, बाबा, माझं तुमच्यावर प्रेम आहे. बाहेर आल्यावर मला मूकाथा (बार्बेक्यूचा एक प्रकार) खायचा आहे.

आई, बाबा, दादा, खूप खूप प्रेम ❤

मिक: आई बाबा, माझी काळजी करू नका. माझी इथं योग्य काळजी घेतली जात आहे. माझं सर्वांवर प्रेम आहे.

डॉम: मी इथं सुखरूप आहे. इथलं वातावरण थोडं थंड आहे, पण माझी काळजी करू नका आणि माझी बर्थ डे पार्टी द्यायला विसरू नका.

अडॉल: आमची काळजी करू नका. मला सर्वांची आठवण येते. मला लवकरात लवकर घरी यावसं वाटतंय.

नाइट: आई, बाबा आणि ताई, माझी काळजी करू नका. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.

टर्न: आई, बाबा, आजोबा, मला तुम्हा सर्वांची आठवण येतेय. माझी काळजी करू नका. मी माझी काळजी योग्य प्रकारे घेतोय.

ब्यू : आई-बाबा मी गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालो, म्हणून काळजी करू नका. बाहेर आल्यावर मी दुकान चालवण्यासाठी आईला मदत करणार आहे.

टी: माझी काळजी करू नका. मी इथं आनंदात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)