You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थायलंड LIVE : मोहीम फत्ते - गुहेत अडकलेली सर्व मुलं, प्रशिक्षक सुखरूप बाहेर
थायलंडमधल्या गुहेतून एक मुलगा आणि प्रशिक्षक यांनाही बाहेर काढण्यात आलं आहे. गुहेत अडकलेल्या सर्वांची यशस्वी सुटका झाली असून रविवारपासून सुरू असलेल्या या रेस्क्यु ऑपरेशनची यशस्वी सांगात झाली आहे. मोहिमेत सहभागी 4 रेस्क्यू डायव्हर देखील गुहेतून बाहेर आले आहेत.
गुहेत अडकलेल्या उर्वरित मुलांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारी सकाळी मोहीम सुरू करण्यात आली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार 10व्या आणि 11व्या मुलाला गुहेतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर राहिलेला शेवटचा मुलगा आणि प्रशिक्षक यांनाही बाहेर काढण्यात आलं.
थायलंडच्या नौदलाने फेसबुकवर ही माहिती जाहीर केली आहे. ही मुलं फुटबॉल टीमची होती. या टीमचं नाव वाईल्ड बोर असं आहे. वाईल्ड बोर याचा अर्थ रानडुक्कर असा आहे. हा संदर्भ घेत नौदलाने सर्व वाईल्ड बोर आणि त्यांचे प्रशिक्षक बाहेर आले असून ते सुखरूप आहेत, अशी माहिती दिली आहे.
नौदलाने म्हटलं आहे की, "हा चमत्कार आहे, विज्ञान आहे की आणखी काही आहे हे सांगात येणार नाही. सर्वांना गुहेतून बाहेर काढण्यात आलं आहे"
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंगेला मर्केल यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
तर याआधी आणखी एका मुलाला बाहेर काढल्याची बातमी स्थानिक माध्यमांनी दिलं आहे, याला थायलंडच्या नेव्ही सीलनेही दुजोरा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांत ज्या मुलांना गुहेतून काढण्यात आलंय त्यांचे X-Ray आणि रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. दोन मुलांना फुप्फुसांत संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
सध्या त्यांना रुग्णालयात कमीत कमी सात दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या गुहेत आणखी चार मुलं आणि प्रशिक्षक अडकले आहेत.
रविवारी सोडवण्यात आलेल्या 4 मुलांनी हॉस्पिटलमध्ये खाण्यासाठी फ्राईड राईसची मागितला होता. पण त्यांना फ्राईड राईस पचणार नाही, हे लक्षात घेऊन ही परवानगी देण्यात आली नाही. तर सोमवारी सुटका केलेल्या मुलांनी खाण्यासाठी ब्रेड आणि चॉकटेल मागितला होता. त्यांच्याही इच्छा पूर्ण करण्यात आली आहे.
"सर्व आठ मुलांची तब्येत उत्तम आहे. सर्वांची मानसिक स्थिती उत्तम आहे," असं सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे सचिव जेसेडा चोकेडाम्रोंगसूक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
संसर्ग कमी झालाय की नाही ही तपासणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या निकालाची वाट पाहतांनाच अधिकारी अतिशय काळजी घेत आहे असंही त्यांनी सांगितलं.
23 जूनला ही मुलं त्यांच फूटबॉल खेळून झाल्यानंतर गुहेत गेले होते. पण त्यानंतर आलेल्या पावसामुळे आणि पुरामुळे ते गुहेत अडकून पडले होते. मागच्या आठवड्यापासून ही शोधमोहिम सुरू आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)