You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतिनच्या पक्षातून निवडणूक लढवून रशियात आमदार झालेला भारतीय डॉक्टर
- Author, नितिन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी मॉस्कोहून
रशियात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या एका व्यक्तीनेही विजय मिळवल्याचं तुम्हाला माहितीये का?
भेटा अभय कुमार सिंह यांना. मूळ बिहारची राजधानी पाटण्याचे अभय आज रशियातल्या कुर्स्क नावाच्या प्रांतातील सरकारमध्ये डेप्यूतात आहेत.
रशियात डेप्यूतात म्हणजे आपल्याकडचा आमदार.
अभय कुमार यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 'युनायटेड रशिया' पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली.
पुतिन यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यांच्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, असं पाटण्यात जन्मलेले अभय सिंह सांगतात.
रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाने दणदणीत विजय मिळवला. 'डुमा' या रशियाच्या संसदेत 75 टक्के संसदपटू पुतिन यांच्या पक्षाचे आहेत. पुतिन गेली 18 वर्षं सत्तेत आहेत.
यंदा झालेल्या निवडणुकांमध्ये पुतिन अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. तरीही त्यांनी विजय मिळवला. अर्थातच त्यांना पक्षाचा पाठिंबा होता.
पुतिन निवडून येण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये अभय यांनी कुर्स्क मतदारसंघातून विजय मिळवला होता.
मॉस्को शहरातील एका हॉटेलात चहापान करता करता त्यांनी राजकीय कारकिर्दीविषयी बीबीसीला सांगितलं. भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय मीडियाबरोबरची माझी ही पहिलीच मुलाखत आहे, असं ते आनंदात म्हणाले.
"माझा जन्म पाटण्याचा. लोयोला शाळेत माझं शिक्षण झालं. 1991 साली मित्रांच्या बरोबरीने शिक्षणासाठी मी रशियात आलो. खडतर अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतलो आणि डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करण्यासाठी रजिस्ट्रेशन पण केलं," ते सांगतात.
अभय आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी काहीही सांगत नाही, पण बिहारशी आपले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत, असं ते सांगतात.
"माझ्या करिअरमध्ये रशियाच लिहिलं होतं, असं वाटतं. मी रशियात परतलो. काही लोकांच्या बरोबरीने रशियात औषधांचा व्यवसाय सुरू केला."
"सुरुवातीला या व्यवसायात खूप अडचणी आल्या, कारण मी गोरा नव्हतो. पण माझा निर्धार पक्का होता. अथक मेहनत करत राहिलो. हळूहळू अडचणी कमी होत गेल्या आणि व्यवसायात जम बसवला," ते सांगतात.
फार्मा व्यवसायानंतर अभय यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात हात आजमावला. आज रशियात त्यांच्या मालकीचे काही शॉपिंग मॉल्स आहेत, असं ते सांगतात.
भारतीय असूनही रशियात स्थायिक झाल्याचा अभिमान आहे, असं ते आवर्जून सांगतात. "पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो बिहारला भेट देतो, कारण मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक तिथेच राहतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)