You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्पेनमध्ये 'फेमिनिस्ट कॅबिनेट' : 18 मंत्र्यांपैकी 11 महिला आणि एक अंतराळवीर
स्पेनमध्ये सोशलिस्ट पक्षाकडून नवनियुक्त पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांनी आपल्या मंत्रिमंडळात 17 जागांपैकी 11 जागांवर महिलांची नियुक्ती केली आहे.
पंतप्रधानांसह 18 सदस्य असलेल्या या नव्या मंत्रिमंडळात 61.1 टक्के महिला आहेत. हे प्रमाण देशाच्या इतिहासातलं सर्वाधिक आहे. जगभरात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत देशांतल्या संसदेत 50 टक्के किंवा त्याहून अधिक महिला मंत्री आहेत. यांत फ्रान्स, स्वीडन आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे.
स्पेनचे माजी पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्या पुरुषी वर्चस्व असलेल्या मंत्रिमंडळाला फाटा देत नवे पंतप्रधान पेद्रो यांनी अपल्या मंत्रिमंडळात अनेक महिलांना स्थान दिलं आहे. या मंत्रिमंडळात महिलांना संरक्षण, अर्थ आणि शिक्षणसारखी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. माजी अंतराळवीर पेद्रो डूके यांच्याकडे विज्ञान खातं देण्यात आलं आहे.
राजकारणाबाहेरील अनुभवी व्यक्ती आणि पक्षातल्या सहकाऱ्यांचा समतोल साधत तयार केलेल्या या मंत्रिमंडळाचं वर्णन 'फेमिनिस्ट कॅबिनेट' असं केलं जात आहे.
"आधुनिकतेची कास धरून विकासाभिमुख समाज घडवण्याची दृष्टी असलेल्या लोकांना माझ्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे," असं सँचेझ यांनी एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.
"स्पेनमध्ये 8 मार्चला झालेल्या स्त्रीवादी चळवळीतून उदयास आलेल्या बदलाचं प्रतिबिंब म्हणजे माझं हे मंत्रिमंडळ आहे," असं सँचेझ म्हणाले आहेत.
याच दिवशी स्पेनच्या रस्त्यांवर जवळपास 50 लाख महिलांनी एकत्र येत वेतनातील असमानता (जेंडर पे-गॅप) आणि लैंगिक हिंसाचाराविरुद्ध निदर्शनं केली होती. त्या आणि या क्षणातला हा फरक असल्याचं सँचेझ यांनी म्हटलं आहे.
सँचेझ यांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण महिला?
- मारिया माँटेरो - वित्तमंत्री, अँडलुसियाच्या माजी काउन्सिलर
- नाडिया कालव्हिनो - अर्थमंत्री, युरोपियन यूनियन कमिशनमध्ये बजेट प्रमुख
- डोलोरस डेल्गाडो - न्याय मंत्री, दहशतवादविरोधी तज्ज्ञ वकील
- मार्गारिटा रॉब्लेस - संरक्षण मंत्री, पंतप्रधानांच्या विश्वासू सहकारी
- इसाबेल सेला - शिक्षण मंत्री, शिक्षण क्षेत्रातील अनुभवी
- जोसेफ बोरेल - परराष्ट्र मंत्री, युरोपियन पार्लमेंटच्या माजी अध्यक्ष
- फर्नांडो मारलस्का - अंतर्गत मंत्री, दंडाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
'नव्या पंतप्रधानांची टॅलेंटला पसंती'
माझं सरकार सोशलिस्ट असेल आणि त्यात लैंगिक समानता असेल असं सँचेझ यांनी आश्वासन दिलं होतं.
"खरं पेद्रो यांचं तर सरकार पूर्णत: सोशलिस्ट नाही, कारण त्यात अनेक टेक्नोक्रॅटिक लोकांचा समावेश आहे आणि सध्या तरी महिलांची संख्या त्यात अधिक आहे. दोन वर्षांच्या आत आपण स्पेनमध्ये निवडणुका घेऊ, असं आश्वासन सँचेझ यांनी दिलं आहे. त्यांनी गत सरकारच्या अर्थसंकल्पातूनच आपल्या योजनांच्या आखणी करावी लागणार आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवून देईल, अशा सूत्राच्या ते शोधात आहेत," असं माद्रिदचे पत्रकार जेम्स बॅडकॉक सांगतात.
"त्यांच्याकडे 350 पैकी फक्त 84 जागा आहेत, त्यामुळे सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. पण किमान स्पॅनिश मतदारांना आकर्षित करेल, अशा योजना पेद्रो यांना आणाव्या लागतील," असं जेम्स पुढे सांगतात.
त्यांचं आणखी एक निरीक्षण आहे. "पक्षातल्या आणि पक्षाबाहेरील तज्ज्ञांना सँचेझ यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. एकीने पॅरिस हवामान बदल कराराच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, दुसरी युरोपातल्या मोठी राजनायिक आहे आणि तिसरी एक मोठी दहशतवादविरोधी वकील."
माजी अंतराळवीर कोण?
सँचेझ यांच्या मंत्रिमंडळात 55 वर्षांचे माजी अंतराळवीर पेद्रो डूके यांचा समावेश आहे. International Space Stationच्या (ISS) मोहिमेअंतर्गत त्या 2003मध्ये अंतराळात गेले होते.
डूके हे एरोनॉटिकल इंजीनियर असून त्यांना तीन मुलं आहेत. युरोपियन स्पेस एजंसीच्या Astronaut Corpने 1992मध्ये त्यांची निवड केली होती. 1998मध्ये पहिल्यांदा ते अंतराळात गेले होते. तेव्हा त्यांनी Cape Canaveral कडून नासाची STS-95 मोहीमेत सहभाग नोंदवला.
डूके हे नऊ दिवसांच्या Space Shuttle Discovery या मोहिमेत विशेष तज्ज्ञ होते. 1999मध्ये ड्यूके आणि STS-95 मोहीमेमधल्या त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी देण्यात येणाऱ्या Princess of Asturias Awardनं सन्मानित करण्यात आलं होतं.
2003मध्ये त्यांनी फ्लाईट इंजिनियर म्हणून 10 दिवसांच्या Cervantes ISS मोहीमेत ते सहभागी झाले होते.
राहॉय राजकारण सोडणार
गेल्या आठवड्यात 2011मध्ये सत्तेत आलेले पीपल्स पार्टीचे नेते मारिआनो राहॉय यांना अविश्वास प्रस्ताव हरल्यामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव सँचेझ यांनी इतर सहा पक्षांच्या सहकार्यानं जिंकला होता.
स्पेनच्या राज्यघटनेनुसार असा प्रस्ताव दाखल करणारी व्यक्तीच, तो प्रस्ताव जिंकल्यास मग पंतप्रधान बनू शकते. म्हणून सँचेझ यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली. असं असलं तरी त्यांच्या पक्षाच्या संसदेत फक्त एक चर्तुथांश जागा आहेत.
63 वर्षीय राहॉय यांनी बुधवारी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला.
"स्वत:ला राजकारणासाठी समर्पित करण्यापेक्षा आयुष्यात करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत," असं राहॉय यांनी म्हटलं आहे.
"मी प्रदीर्घ वेळ राजकारणात घालवला आहे आणि आता राजकारणात राहण्याला काहीच अर्थ नाही, असं मला वाटतं," असं ते म्हणाले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)