You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाह - उद्धव चर्चेनंतर शिवसेना म्हणते '2019 स्वबळावरच'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात मातोश्रीवर काल 2 तास बैठक चालली. या भेटीनंतर आज (गुरुवारी) सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे की शिवसेना 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.
शिवसेना खरंच स्वबळावर लढवणार आहे की हे दबावतंत्र आहे, यावरून राजकीय वर्तुळांत चर्चा सुरू आहे.
या भेटी आधी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं होतं की शिवसेनेसोबत युती राहील. आम्ही 2019 चीच निवडणूक नाही तर 2024ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवू, असं अमित शाह म्हणाले.
2014 सालच्या आणि आताच्या अमित शाहांच्या भाषेत आणि देहबोलीत बराच फरक जाणवत आहे. या बैठकीच्या वेळी काय काय झालं ते पाहूया.
रात्री 10.08 - बैठक संपली
तब्बल 2 तासांनंतर दोन्ही नेत्यांमधली बैठक संपली आहे. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांच लक्ष आहे. अमित शाह मातोश्रीवरून रवाना झाले आहेत.
रात्री 10 - 2 तासांपासून बैठक सुरू
अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या 2 तासांपासून चर्चा सुरू आहे. मीडियाचे प्रतिनिधी मात्र मातोश्रीबाहेर कॅमेरा सज्ज करून थांबले आहेत.
रात्री 8 - बैठक सुरू
अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू.
संध्याकाळी 7.47 - शाह मातोश्रीवर दाखल
अमित शाह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत.
संध्याकाळी 7.30 - शिवसेनेसोबतच लढू
अमित शाह यांनी थोड्यावेळापूर्वी झी24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 2019ची लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबतच लढू असं म्हटलं आहे. 2019चं नाही तर पुढच्या लोकसभा सुद्धा एकत्र लढू असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.
संध्याकाळी 6. 40 - राज ठाकरेंचे कार्टून
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची खिल्ली उडवणारं कार्टून राज ठाकरे यांनी काढलं आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे कार्टून टाकले आहे.
संध्याकाळी 6.30 - मीडियाची लगबग आणि वाहतूक कोंडी
मातोश्रीच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक ऑफीसेस आहेत. ऑफीस सुटण्याची वेळ झाल्यामुळे या भागात थोडी वाहतूक कोंडी आहे. त्यातच या भागात मीडियाची मोठी गर्दी झाली आहे.
संध्याकाळी 5.30 - मातोश्री बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णुर यांनी या भेटीची विषद केलेली पार्श्वभूमी
बुधवारी संध्याकाळी जेव्हा 'भाजपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 'मातोश्री'वर पोहोचतील तेव्हा 'युतीचं भवितव्य काय' या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या आद्य प्रश्नावर पुन्हा एकदा पैजा लागतील. पण मुख्य प्रश्न हा आहे की भाजपा आता स्वबळावर केंद्रात सत्ता मिळवू शकत नाही आणि दुखावलेल्या मित्रपक्षांच्या विनवण्या केल्याशिवाय पर्याय नाही, हे या भेटीनं सिद्ध होतंय का?
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत या संबंधात कटूतेने नवी पातळी गाठली. पण त्यानंतर आठवडाभरातच अमित शहांनी थेट 'मातोश्री'वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणं, याला भाजपला या कटू वास्तवाची झालेली जाणीव, असं म्हटलं जातंय.
पालघरचा निसटता विजय सोडला तर भंडारा-गोंदियात आणि विशेषत: उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकांत पाठीला लागलेल्या मातीमुळे भाजपला याचीही स्पष्ट जाणीव झाली आहे, की 2019 मध्ये त्यांना स्वबळावर सत्ता येणं शक्य नाही. त्यामुळेच राहिलेल्या मित्रपक्षांना तात्काळ गोंजारणे हाच पर्याय होता आणि अमित शहा तेच करताहेत का?
या अचानक आलेल्या 'मातोश्री' भेटीचा अर्थ तसा नाही, असं भाजप नेते सांगताहेत. "केवळ उद्धव ठाकरेच नाही तर मुंबईत अनेक इतर महत्त्वाच्या व्यक्तींना राष्ट्रीय अध्यक्ष भेटणार आहेत. 26 मे ते 11 जून असं त्यांचं देशभर संपर्क अभियान सुरू आहे. ही त्यातलीच एक भेट आहे," असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
पण याहून अधिक भाजपतर्फे या भेटीवर काहीही बोललं जात नाहीये.
हे खरं आहे की संध्याकाळी 'मातोश्री'वर जाण्याअगोदर अमित शहा त्यांच्या 'संपर्क फॉर समर्थन'साठी रतन टाटा, लता मंगेशकर आणि माधुरी दीक्षित यांनाही भेटणार आहेत. पण बऱ्याचदा 'मातोश्री'वर जायला अनुत्सुक असलेले आणि 6 एप्रिललाच वांद्र्यात BKC मैदानावर पक्षाच्या स्थापना दिनाच्या सभेला येऊनही शेजारी 'मातोश्री'ला सदिच्छा भेटही न दिलेले अमित शहा, शिवसेना इतकी जहरी टीका करत असताना तत्परतेनं ठाकरेंच्या भेटीला जाताहेत, याचं कारण लपण्यासारखं नाही.
शिवसेना राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचा इतिहास हा भांडणांचा आहे. पालघर पोटनिवडणुकीत त्या भांडणाने कळस गाठला.
महाराष्ट्रातला नाणार प्रकल्प असो वा नोटाबंदीचा केंद्राचा निर्णय, शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. केंद्रात आणि राज्यात सेनेच्या मंत्र्यांना कोणताही स्वत:चा निर्णय घेता येत नाही, अशी टीका सतत होत राहिली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकमेकांचा केलेला पाणउतारा उभ्या महाराष्ट्रानं पाहिला. पण पालघरची पोटनिवडणूक उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी त्याहूनही जास्त कडवट केली.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची तथाकथित 'साम-दाम-दंड-भेद' ऑडिओ क्लिप भर सभेत ऐकवून हे वैर काय पातळीला पोहोचलंय, हे दाखवलं. भाजपने निवडणूक जिंकली, पण त्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी परत भाजपवर हल्लाबोल केला आणि "लोकशाही वाचवण्याची गरज" बोलून दाखवली. सेना सरकारमधून बाहेर पडली नाही, पण भाजपवर त्यानंतरही सतत टीका करत राहिली.
सतत अपमान होतो आहे तर सरकारमधून बाहेर का पडत नाही, हा प्रश्न विचारून सेनेवर पुन्हा सारे हसले.
पण पोटनिवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी धोक्याची घंटा होती. उत्तर प्रदेशातल्या फुलपूर आणि गोरखपूर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतला पराभव ताजा असतानाच कैराना, भंडारा-गोंदिया आणि इतर ठिकाणच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे पराभव समोर आले. कर्नाटकमध्ये सर्वाधिक संख्याबळाचा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर फेकला गेला.
सर्व विरोधक एकत्र आले की भाजपला पराभूत करता येतं, हे दोन पोटनिवडणुका आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकींनी दाखवून दिल्यानंतर भाजपला मित्रपक्षांची आठवण होणं स्वाभाविक होतं. पण जवळचे आणि लक्षणीय संख्याबळ असलेले मित्रपक्ष भाजपच्या 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'पासून दूर गेले आहेत.
मोदीविरोधी आघाडीची चिन्हं?
वास्तविक 10 एप्रिल 2017 रोजी 'रालोआ' पक्षांची बैठक झाली होती. त्यात 2019 मध्ये मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. याच बैठकीवेळेस 'रालोआ' मध्ये असलेले 33 पक्ष सहभागी होते. त्यात चंद्राबाबू नायडूही होते, ज्यांनी नंतर अरुण जेटलींसोबत पत्रकार परिषदही घेतली होती. पण नंतर चंद्राबाबू सरकारमधून टीका करून बाहेर पडले.
या बैठकीत प्रस्तावाला मान्यता द्यायला उद्धव ठाकरेही होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा सेना-भाजपा वैरानं उचल खाल्ली, मतभेद वाढत गेले आणि 2019च्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं सेनेनं ठरवलं.
विरोधकांनीही सेनेला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, ज्याला पालघर निवडणुकांचं कारण पुढे करून उद्धव ठाकरे गेले नाहीत. पालघरच्या निकालानंतर शरद पवारांनी शिवसेनेला लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट विरोधकांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या निवडणुकीनंतर सेना तत्काळ युतीबाहेर पडणार, अशी हवा गरम झाली होती, पण उद्धव ठाकरेंनी पुन्हा संयम दाखवला.
त्याअगोदरही जेव्हा ममता बॅनर्जींनी उद्धव यांची मुंबईत भेट घेतली होती तेव्हा सेना तिसऱ्या आघाडीचा पर्याय पाहते आहे, अशी चर्चा सुरू झाली होती.
भाजपसुद्धा सेनेसोबत सुंदोपसुंदी सुरू असतानाही युती टिकेल, अशा आशा सतत व्यक्त करत राहिलं आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात सेनेचे खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीत युतीबद्दल आशावादी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. शेतकरी प्रश्न असेल वा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, राज्यात तयार झालेल्या टीकेच्या वातावरणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे गरज भासणार याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे.
विरोधी पक्षांच्या 'हल्लाबोल' सभांना, शेतकऱ्यांच्या सतत होणाऱ्या आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद भाजपाला दिसतो आहे. त्याचा परिणाम मतांच्या गणितावर होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच पालघरच्या युद्धानंतर तत्परतेनं अमित शहा 'मातोश्री'च्या वाटेवर निघाल्याचं म्हटलं जात आहे. देशभरातल्या मित्रपक्षांशी आता वैर जोपासणे शक्य होणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
वेगळे झाले तर फटका दोघांनाही?
"भाजप आता मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी डेस्परेट आहे आणि हा त्यांचा डावही आहे," असं दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके म्हणाले. "आज त्यांना मित्रपक्ष हवे आहेत, पण निवडणुकीनंतर ते तसेच राहतील असं नाही. भाजपला आता समजलं आहे एकटं लढलं तर लोकसभा निवडणुकीत त्यांचं अवघड आहे. आता ते सहज बहुमतापर्यंत पोहोचतील असं चित्रं नाही."
"त्यापेक्षाही सगळे विरोधक एकत्र येणं, स्वत: मित्रपक्ष विरोधकांना जाऊन मिळणं त्यांच्यासाठी अधिक चिंतेचं आहे. त्याशिवाय 'मोदी विरुद्ध सगळे' असं चित्रं आता फायद्याचं नाही, हेही भाजपला पटलं आहे. पूर्वी त्यांना अशा परिस्थितीचा कायम फायदा झाला, पण आता तसं होणार नाही. म्हणून सेना त्यांना महाराष्ट्रात हवी आहे. महाराष्ट्रातून जेवढ्या जागा गेल्या वेळेस मिळाल्या, त्या जर हातून गेल्या तर तो तोटा कुठे भरून काढणार? म्हणून महाराष्ट्र ते हातून जाऊ देणार नाहीत," चावके म्हणाले.
पण उद्धव ठाकरे-अमित शहा भेटीदरम्यान रणनीती काय असेल? गोंजारल्यानं त्यांचा राग दूर होईल?
चावकें यांच्यानुसार "ही शिवसेनेचीही परीक्षा आहे, कारण त्यांनाही मतांचं विभाजन नको आहे. जेव्हा भाजपसोबत लढाई होते तेव्हा त्यांचीही मतं जातात. शिवाय सरकारमध्ये राहून आणि टीका करून त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. गेल्या वेळेस जिंकलेल्या 18 जागा परत येतील, असं त्यांनाही वाटत नाही. इतक्या जागा मिळाल्या, पण त्याचा फायदा करून घेतला नाही, याचा परिणाम तर नक्की होणार. त्यामुळे दोन्हीकडून शिवसेनेला मार बसणार हे नक्की."
"पण उद्धव ठाकरे आता ताठरपणा कमी करणार नाहीत. तुम्हाला आमच्यापुढे नमतं घ्यावं लागत आहे, असं ते भाजपला सांगतील. भाजपचे नेते 'मातोश्री'वर येऊन लीन झाले, हे सांगण्यात त्यांना धन्यता वाटते. आता ते आपला नैतिक विजय झाला, असं बाहेर मोठ्यानं सांगतील," चावके म्हणाले.
'हवेत तलवारबाजी नाही'
शिवसेना मात्र या भेटीबद्दल त्यांच्या स्टाईलमध्ये अंतर राखून बोलते आहे. जेव्हा खासदार संजय राऊतांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "अमित शहांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीची वेळ मागितली आणि आम्ही त्यांना ती दिली, इतकंच आहे. आमचा बाकी काही अजेंडा नाही या भेटीसंदर्भात. त्यांच्याकडे काय अजेंडा आहे, तो उद्या कळेल."
"गेल्या महिन्याभरात अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली आहे. पण अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना प्रथम भेटीची वेळ दिली. आता आम्ही त्यांच्या मित्रपक्षांच्या यादीत आहोत का, हे आम्हाला शोधावं लागेल," राऊत पुढे म्हणाले.
पण अमित शहांनी मनधरणी केली तरी सेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्णय कायम असेल का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "आम्ही काही हवेत तलवारबाजी करत नाही. स्वबळावर निवडणुका लढवायच्या हा राष्ट्रीय कार्यकारिणीनं आणि उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आहे. तो शिवसेनेत राबवला जातो."
बुधवारी सकाळी प्रकाशित झालेल्या 'सामना'च्या अग्रलेखाद्वारे सेनेने "2019च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे," असं ठामपणे सांगितलं आहे. "...भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे 2019च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकतं, पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे आणि त्यामागची कारणे शोधायला हवीत," असा सल्ला या अग्रलेखात सेनेने दिला आहे.
सगळ्यांचं लक्ष आता 'मातोश्री'कडे आहे. 2014 मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर एकदा स्नेहभोजनासाठी आणि नंतर जून 2017 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीवेळेस अमित शहा 'मातोश्री'वर येऊन गेले आहेत. पण यंदाच्या भेटीला राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणात जास्त महत्त्व आहे, कारण या भेटीनंतर निवडणुकांना वर्ष उरलेलं असताना नवा राजकीय पट रंगू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)