You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या एकट्या ट्रस्टने भाजपला दिली 251.22 कोटींची देणगी
राजकीय पक्ष कंपन्यांकडून किती देणगी घेतात? सर्वसामान्य माणसांकडे या प्रश्नाचं उत्तर असण्याची शक्यता कमीच आहे.
पण राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेनं हे पुन्हा समोर आणलं आहे.
भाजप, काँग्रेस, CPI, CPM, बसपा आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या देणग्यांचा अभ्यास करून संस्थेन एक अहवाल तयार केला आहे.
20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी देणाऱ्या देणगीदारांचं नाव जाहीर करणं, हे कायद्यानं राजकीय पक्षांना बंधनकारक करण्यात आलं आहे.
ADRच्या अहवालानुसार, 2016-17 या एका वर्षात सत्य इलेक्टोरल ट्रस्टनं भाजपला 251.22 कोटी रुपयांची देणगी दिली.
भाजपला मिळालेल्या एकूण देणगीपैकी ही रक्कम 47.19% एवढी आहे. याच कंपनीनं काँग्रेसला 13.90 कोटी रुपये दिले आहेत.
सत्य इलेक्टोरल ट्रस्ट हे नाव यापूर्वी आपण कधी ऐकलं नसेल. कॉर्पोरेट जगताकडून पैसा घेऊन तो राजकीय पक्षांना पुरवण्याचं काम ही संस्था करते.
अहवालातल्या ठळक बाबी
1. 2016-17 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त मिळालेल्या देणगीची रक्कम 589.38 कोटी रुपये आहे. ही रक्कम 2123 देणगीदारांकडून मिळाली.
2. भाजपला 1194 लोक अथवा कंपन्यांकडून 532.27 कोटी रुपयांची देणगी मिळाली. तर काँग्रेसला 599 लोक अथवा कंपन्यांकडून 41.90 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. इतर राजकीय पक्षांना एकूण जेवढी देणगी मिळाली त्याच्या 9 पटींहून जास्त देणगी एकट्या भाजपला मिळाली आहे.
3. बहुजन समाज पक्षाला कुणीही 20,000 रुपयांपेक्षा अधिक देणगी दिलेली नाही. गेल्या 11 वर्षांपासून असा दावा बसप करत आहे.
4. 2016-17 या वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीत 487.36 कोटी रुपयांची (478 %) वाढ झाली आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना एकूण 102.02 कोटी रुपये देणगी मिळाली होती.
5. भाजपला मिळालेल्या देणगीत 593 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015-16 या वर्षात 76.85 कोटी रुपये देणगी मिळाल्याचं भाजपनं म्हटलं होतं. 2016-17 या वर्षात देणगीची रक्कम वाढून 532.27 कोटी रुपये झाली.
6. तृणमूल काँग्रेस पक्षाला मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मिळालेल्या देणगीत 231 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सीपीएम आणि काँग्रेसच्या देणगीत अनुक्रमे 190 % आणि 105 % वाढ झाली आहे.
देणगीचा स्रोत अज्ञात
देणगी देणाऱ्या सगळ्यांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत. अशा अज्ञात स्रोतांकडून भाजपला 2016-17 या वर्षात 464.94 कोटी रुपये मिळाले. तर काँग्रेसला 126.12 कोटी रुपये देणगी रुपात मिळाले.
भारतातल्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला कोणाकडूनही देणगी घेता येते. परदेशी नागरिकांकडूनही देणगी स्वीकारता येते. फक्त परदेशी कंपन्या आणि सरकारी कंपन्यांकडून त्यांना देणगी घेता येत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)