You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंगापूरमध्ये ट्रंप आणि किम यांचं संरक्षण गुरखा जवान करणार
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेता किम जाँग-उन यांच्या सिंगापूरमध्ये येत्या 12 जूनला होणाऱ्या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. कधीकाळी एकमेकांना पाण्यात बघणारे हे दोन नेते आता लवकरच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
या ऐतिहासिक भेटीची तयारीसुद्धा जोरदार सुरू आहे. याच तयारीचा एक महत्त्वाचा भाग असेल ती या दोन नेत्यांची सुरक्षा व्यवस्था.
ट्रंप आणि किम आपापली सुरक्षापथकं बरोबर घेऊन येणार असल्याची माहिती सिंगापूरमध्ये अति विशेष व्यक्तींच्या सुरक्षेची माहिती ठेवणाऱ्या राजकीय जाणकारांनी रॉयटर्सला दिली.
ट्रंप आणि किम यांच्या सुरक्षेची जबाबदारी सिंगापूर पोलिसांसह गुरखा जवानांच्या तुकडीवर असेल. गुरखा जवान हे आपल्या शौर्यासाठी आणि उदार मनासाठी ओळखले जातात.
सिंगापूरमध्ये गुरखा जवानांची संख्या फार मोठी जरी नसली तरी विशेष प्रसंगांनिमित्त या तुकडीकडे ही जबाबदारी सोपविली जाते.
अलीकडेच शांग्री-ला हॉटेलमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यांवर झालेल्या जागतिक संमेलनादरम्यान गुरखा जवान तैनात करण्यात आले होते. या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस आणि इतर देशांचे नेते सहभागी झाले होते.
इंग्रजांपर्यंत जातात तार
सिंगापूरमधील गुरखा जवानांच्या नियुक्तीचे तार हे ब्रिटिश परंपरेशी जोडल्या गेलेले आहेत. लष्करी रेजिमेंटकरिता जवळपास दोनशे वर्षं नेपाळमधून भरती करण्यात येत होती.
गुरखा सैनिकांचा पश्चिम जगताशी पहिला संपर्क हा 19व्या शतकात आला, जेव्हा इस्ट इंडिया कंपनीने नेपाळविरोधात युद्ध छेडलं होतं. या युद्धात जरी इंग्रजांचा विजय झाला असला तरी ते गुरखा जवानांच्या शौर्याने आणि युद्धक्षमतेने मोठे प्रभावित झाले.
त्यानंतर इंग्रजांनी ब्रिटिश लष्कारामध्ये त्यांची भरती सुरू केली. आता गुरखा ब्रिटिश, भारतीय आणि नेपाळच्या लष्कारात आपली सेवा देतात. ते ब्रुनेई आणि सिंगापूरच्या सुरक्षादलांचा पण एक भाग आहे.
गुरखा जवानांसाठी स्वतंत्र व्यवस्था
गुरखा जवान हे आपल्या कुटुंबीयांसह सिंगापूरमधील सुरक्षित अशा माऊंट वेरनॉन कॅंपमध्ये राहतात. या परिसरात सर्वसामान्य सिंगापूरवासीयांना प्रवेश नाही.
गुरखा जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कडक नियमांचा पालन करावं लागतं. त्यांची मुलं स्थानिक शाळांमध्ये शिकतात. त्यांना स्थानिक महिलांशी विवाह करण्याची परवानगी नाही.
सिंगापूरमध्ये प्रशिक्षण घेण्याआधी 18 किंवा 19 वर्षं वयाचे असतानाच त्यांची भरती केली जाते. त्यांच्या सेवानिवृत्तीच वय हे 45 वर्षं आहे.
खुकरी बाळगणारे गुरखा
सिंगापूर पोलिस दलात नेपाळच्या दुर्गम भागातून या गुरखा जवानांची भर्ती करण्यात आली आहे. या जवानांकडे अत्याधुनिक हत्यारं असली तरी गुरखांचं मुख्य हत्यार म्हणजे त्यांची प्रसिद्ध खुकरी.
हे त्यांचं पारंपरिक आणि आवडतं हत्यार आहे. असं म्हणतात की, जेव्हा कधीही खुकरी बाहेर काढली जाते, तेव्हा रक्त काढल्याशिवाय ती राहत नाही.
International Institute for Strategic Studies (IISS) मध्ये सिंगापूर सुरक्षा दलाचे तज्ज्ञ टीम हक्सली यांनी रॉयटर्सला सांगितलं की, "सिंगापूरला सगळ्यांत चांगली सुरक्षा पुरवणाऱ्यांमध्ये गुरखा जवानांचा समावेश होतो, आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांना या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी केलं जाईल."
टीम म्हणाले, "हे जवान अती महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि सुरक्षायंत्रणेत नेहमी पुढे असतात. अशा पद्धतीच्या कार्यक्रमांसाठी किंवा प्रसंगासाठी विशेष कौशल्याची गरज भासत असते, आणि गुरखा जवानांना त्यासाठीच प्रशिक्षण दिलं जातं."
असं असलं तरी सिंगापूर पोलीस दलाच्या प्रवक्त्यांनी गुरखा जवानांच्या तैनातीबाबत अजून कुठलीही टिप्पणी केलेली नाही.
सिंगापूर पोलीस दलामध्ये सहा अर्धसैनिक कंपन्यांमध्ये 1,800 गुरखा जवान आहेत. टीम हक्सली यांच्यामते गुरखा जवान हे सिंगापूर पोलीस दलातील एक महत्त्वाची तुकडी आहे. विशेष व्यक्तींच्या सुरक्षेशिवाय दंगलीदरम्यानही यांचा वापर केला जातो.
सिंगापूर पोलिसांच्या वेबसाइटवर त्यांना 'सक्त, सतर्क आणि दृढ' असं म्हटलं आहे. सिंगापूरच्या सुरक्षेत ते सहाय्यक असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)