बायबलशिवाय शपथ घेणारे स्पेनचे नवे नास्तिक पंतप्रधान

फोटो स्रोत, EPA
स्पॅनिश सोशलिस्ट पक्षाच्या पेद्रो सँचेझ यांनी स्पेनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. माद्रिद इथे किंग फिलीप यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सँचेझ यांनी देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी शपथ घेतली मात्र ती बायबलशिवाय.
सत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानं त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली.
सँचेझ यांना देशातल्या इतर 6 पक्षांचा पाठिंबा मिळाला आणि शनिवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
सँचेझ यांच्या पक्षाकडे संसदेतल्या एकूण जागांपैकी फक्त एक चर्तुर्थांश जागा आहेत. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं याचाही निर्णय अद्याप बाकी आहे. पुढील आठवड्यात तो होईल अशी आशा आहे.
माद्रिद इथे झालेल्या शपथविधी समारंभात सँचेझ म्हणाले की, "मी माझं कर्तव्य पार पाडीन. राजाशी प्रामाणिक आणि घटनेशी बांधील राहून मी काम करीन."
अविश्वास प्रस्तावानंतर पराभूत होणारे राहॉय हे आधुनिक स्पेनमधले पहिलेच नेते ठरले आहेत. ते 2011पासून ते पंतप्रधान होते.
कोण आहेत पेद्रो सँचेझ?
मारिआनो राहॉय अविश्वास ठराव हरल्यामुळे पेद्रो सँचेझ स्पेनचे पंतप्रधान झाले आहेत. ते अर्थतज्ज्ञ आणि माजी बास्केटबॉलपटू आहेत.
2014मध्ये जेव्हा ते स्पॅनिश सोशलिस्ट पार्टीचे नेते बनले तेव्हा त्यांच्याबद्दल फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकला आणि पक्षाची घडी व्यवस्थित बसवण्याचा संकल्प केला. सोशलिस्ट पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास त्यांनी पक्ष सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला.

फोटो स्रोत, AFP
2015 आणि 2016 मध्ये ते सलग दोनदा पराभूत झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मारिआनो यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षाचं नेतेपद सोडण्याचीही वेळ आली होती. तेव्हा देशात राजकीय संकट उभं राहिलं आणि सोशलिस्ट पक्षातही वाद होऊ लागले.
पण कालांतराने त्यांनी सोशलिस्ट पार्टीच्या निवडणुकांमध्ये आघाडी मिळवली आणि पुन्हा पक्षप्रमुख झाले. शिवाय ते पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत आले.
ज्या पक्षानं अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यामुळे आधीच्या पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं तर त्याच पक्षाच्या नेत्याला सरकार चालवावं लागतं, असं स्पेनची राज्यघटना सांगते. अर्थात त्या नेत्याला संसदेत बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यामुळे 46 वर्षीय मवाळ पण महत्त्वाकांक्षी पेद्रो पंतप्रधान झाले.
विशेष म्हणजे, सँचेझ यांच्या पक्षाचे स्पेनच्या संसदेत एक चतुर्थांशपेक्षा कमी सदस्य आहेत, तरीदेखील ते देशाचं नेतृत्व करणार आहेत.
आता काय होणार?
राहॉय यांच्या गच्छंतीमुळे युरोपियन युनियनची 5वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था स्पेन राजकीय अनिश्चितते ढकलला गेला होता.
सँचेझ सोशलिस्ट पक्षाचं प्रतिनिधित्व करत असले तरी ते संसदेचे सदस्य नाहीत. 84 सदस्य असलेल्या त्यांच्या पक्षाला सरकारच्या स्थैर्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

सँचेझ यांच्या पक्षाला समर्थन देणारा पोदेमॉस हा पक्ष त्यांच्याकडून काही महत्त्वाची खाती मिळवण्याचा प्रयत्न करील.
राहॉय यांच्या बजेटसंबंधीची योजना तशीच स्वीकारण्याच्या सँचेझ यांच्या मतालाही आव्हान दिलं जाऊ शकतं.
बास्क आणि कॅटलन याही पक्षांनी राहॉय यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. पण ते नवीन सरकारला पाठिंबा देतील की नाही हे अजून स्पष्ट नाही.
क्यूददानोस पक्षानं मात्र राहॉय यांनाच समर्थन दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








