पोटनिवडणूक निकाल : उत्तर प्रदेशातील भाजपच्या बालेकिल्याला असं पडलं भगदाड

भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेदरम्यान
    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, कैरानाहून बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमधला पराभव भाजपच्या बालेकिल्याला भगदाड असल्याची चर्चा आहे. काय आहे नेमकं वास्तव, याचा घेतलेला आढावा.

उत्तर प्रदेशातील कैरानामध्ये लोकसभेच्या आणि नूरपूरमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका 28 मे रोजी होणार होत्या. 27 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा कैरानाहून साधारण 60 किमी दूर बागपतमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या ठिकाणापासून पाच-सहा किलोमीटर दूर असलेल्या बडौत जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी एक आठवड्यापासून आंदोलन करत होते.

दुर्दैवी योगायोग म्हणजे पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. मात्र तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहिलं.

या आंदोलनाचा थेट परिणाम भाजपच्या कैराना आणि नूरपूरमधल्या मतांवर पडेल, अशी चर्चा होऊ लागली. मोदींनी आपल्या भाषणात कैराना आणि नूरपूर मतदारसंघातील घडामोडींचा उल्लेख केलाही, आणि तो आवाज या दोन निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भागांपर्यंत पोहोचला असावाही.

पण एवढ्या प्रचंड फौजेसह घेतलेल्या या सभेत मोदी आपला संदेश तेवढ्या प्रभावीपणे मांडू शकले नाही, जितक्या जोरदारपणे बडौतच्या दोन-तीन डझन शेतकऱ्यांनी आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचविला.

आश्वासनं कागदावरच आणि शेतकऱ्यांचा राग

शेतकऱ्यांचा रागातून स्पष्ट होत होतं की ते भाजपवर खूश नाहीत. कैराना आणि नूरपूर हे इथून जवळपास दोनशे किलोमीटर आहे, पण इथली राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संरचना काही वेगळी नाही.

भाजप, उत्तर प्रदेश, कैराना, नूरपुर

फोटो स्रोत, Samiratmaj Mishra/BBC

फोटो कॅप्शन, विरोधी पक्ष एकवटल्याने उत्तर प्रदेशात भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली.

शेतकऱ्यांची नाराजी अनेक कारणांसाठी होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासनं तर देण्यात आली, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत. वीजेची बिलं भरमसाठ वाढवण्यात आली आणि कर्जमाफीच्या नावावर त्यांची फसवणूक करण्यात आली.

पण असंतोष एवढ्यापुरता मर्यादित नव्हता.

कैराना लोकसभा मतदारसंघातील सहारनपूर, शामली जिल्ह्यांचा एक आठवडा दौरा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या.

ऊस उत्पादक शेतकरी सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज होते. काही गावांमधले शेतकरी खूश असल्याचं दाखवत होते, पण हे शेतकरी भाजपचे समर्थक होते.

या ठिकाणापासून दूर बिजनौर जिल्ह्यातील नूरपूरमध्येही अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली. या भागातील बहुतांशी शेतकरी उसाची शेती करतात.

पक्षांतर्गत राग

दोन महिन्यांपूर्वीच फूलपूर आणि गोरखपूर मतदारसंघात लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. सरकारच्या कामकाजासंदर्भात मतदारांमध्ये नाराजी होती, म्हणूनच त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली. या नाराजीतूनच मतदार मतदानासाठी फिरकलेच नाहीत.

याबरोबरीने फूलपूर आणि गोरखपूरप्रमाणे नूरपूर आणि कैरानामध्येही भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळाली.

या सरकारमध्ये आमचं ऐकणारं कुणीही नाही, अशा शब्दांत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप, उत्तर प्रदेश, कैराना, नूरपुर
फोटो कॅप्शन, या परिसरात निवडणुका होत्या.

सहारनपूरमधील भाजपच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. "इथले पोलीस आणि प्रशासनातले अधिकारी सरळ बोलतही नाहीत. त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. ही अवस्था फक्त कार्यकत्यांची नाही. खासदारांशी बोलताना, भेटताना अडचणी येतात."

यासंदर्भात भाजपच्या उमेदवार मृगांका सिंह यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, "तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्याही ही गोष्ट लक्षात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी ही अडचण सांगितली. आता आचारसंहिता लागू असल्याने काही मर्यादा आहेत. मात्र निवडणुकीनंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन."

राजकीय समीकरणं आणि भीम आर्मीचा पाठिंबा

मुस्लीमबहुल अशा कैराना लोकसभा मतदासंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत. यामध्ये गंगोह, नकुड, सहारनपूर येतं. कैराना, थाना भवन आणि शामली विधानसभा शामली जिल्ह्यामध्ये मोडतात.

याच भागाला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे नूरपूर. सामाजिकदृष्ट्या हा जाट आणि गुजरबहुल भाग आहे. मात्र सैनी, कश्यप जातीची समीकरणंही प्रभावी आहेत.

जाणकारांनुसार समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दल यांनी आघाडी केल्याने भाजपची ताकद कमी झाली. 2014 लोकसभा निवडणुकांवेळी भाजपचं असलेलं वर्चस्व या निवडणुकीपर्यंत कमी झालं.

भाजप, उत्तर प्रदेश, कैराना, नूरपुर
फोटो कॅप्शन, मतांच्या जातीय ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न फसला.

योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं उदाहरण मतदार देतात. मात्र तरीही भाजपला ध्रुवीकरणात यश मिळालं नाही.

काही दिवसांपूर्वी सहारनपूरमध्ये भीम आर्मीचे नेते सचिन वालिया यांची हत्या झाली. यानंतरच्या पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाईने दलित मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.

भीम आर्मीने भाजपविरोधातल्या महाआघाडीला मत देण्याचं स्पष्ट आवाहन मतदारांना केलं होतं.

भाजपचे प्रयत्न आणि अपयश

ज्येष्ठ पत्रकार रियाज हाशमी यांच्या मते, लोकांचं लक्ष जाट मतांवर होतं. जाट समाजाने चौधरी चरण सिंह कुटुंबीयाला पसंती दर्शवली आणि राष्ट्रीय लोक दलाला मत दिलं.

बाकी मतं कोणाला मिळणार, यासंदर्भात लोकांचं जे अनुमान होतं तसंच झालं. मुस्लीम मतं फोडण्याचा भाजपने प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. कैराना मतदारसंघात भाजपने मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली. मृगांका यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते हुकूम सिंह यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. मात्र समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने मृगांका यांना चीतपट केलं.

तरीही भाजपने पोटनिवडणुकीत मृगांका यांना तिकीट दिलं होतं, जेणेकरून मृगांका यांना सहानुभूतीचं मतं मिळतील, असा भाजपचा होरा होता. मात्र तो सपशेल फोल ठरला.

भाजप, उत्तर प्रदेश, कैराना, नूरपुर
फोटो कॅप्शन, भाजपला निवडणुकीत अंतर्गत बंडाळ्यांचा फटका बसला

मृगांका यांना विजय मिळू नये, असं भाजपमधल्या एका गटाला वाटत होतं. पोटनिवडणुकीत मृगांका यांचा पराभव झाला तर यापुढच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघेल आणि या मतदारसंघात आपल्या माणसाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करता येतील, असं या गटाला वाटत होतं.

रियाझ हाश्मी आणि सहारनपूरमधील अन्य ज्येष्ठ पत्रकार यासंदर्भात भाजपमधील काही दिग्गज पण असंतुष्ट नेत्यांची नावंही सांगतात, मात्र ते सगळं 'ऑफ द रेकॉर्ड'.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)