डेन्मार्कमध्ये नकाब आणि बुरखा घालण्यावर बंदी, पण यामधला फरक काय?

फोटो स्रोत, Getty Images
डेन्मार्कमध्ये पूर्ण चेहरा झाकणारी कुठलीही वस्त्र घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम न पाळणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला 1,000 क्रोनर (म्हणजे साधारण 10,500 रुपये) दंड ठोठावण्यात येणार आहे.
डेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी झालेल्या मतदानात बंदीच्या बाजूने 75 तर विरुद्ध 30 मतं मिळाली. 1 ऑगस्टपासून हा नवा कायद अमल लागू होणार आहे.
नकाब आणि बुरखा त्यामुळे वापरता येणार नाही.
या कायद्याबद्दल बोलताना डेन्मार्कचे कायदा मंत्री सोरेन पापे पॉसलन म्हणाले, "आपल्या समाजात वेळोवेळी चर्चा होत असते की आपल्याला कसा समाज हवा आहे, आपला समाज कसा आहे. चेहरा झाकणं, डोळे झाकणं आपल्या संस्कृतीचा भाग नाही. आपल्याला एकमेकांना सहज बघता, ओळखता आलं पाहिजे. ही डेन्मार्कची स्वतःची मूल्यं आहेत."
दरम्यान, बुरखा, नकाबसारख्या पोशाखांवर बंदी घालणारा डेन्मार्क काही पहिला देश नाही. एप्रिल 2011 मध्ये प्रथम फ्रान्सने युरोपात सर्वप्रथम अशी बंदी घातली. त्यानंतर बेल्जियमनेही असे कपडे घालण्यावर बंधनं आणली, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुण्या व्यक्तीची ओळख कळणार नाही.
शिवाय, ऑस्टिया, बल्गेरिया आणि दक्षिण जर्मनीतल्या बव्हेरिया राज्यात अशीच बंदी आहे. नेदरलँड्सच्या संसदेनेही 2016 साली या संदर्भातला एक प्रस्ताव मंजूर केला होता, पण त्याला अजून कायदेशीररीत्या मान्यता मिळाली नाहीये.
नकाब, हिजाब, बुरखा यात काही फरक आहे का?
जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.
तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील कधीतरी... मग जाणून घेऊ या हेडस्कार्फचे आणि परिधान करण्याचे प्रकार.
1. हिजाब
तसं तर 'हिजाब'चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. पण आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.

हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्त्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.

2. नकाब

नकाब चेहऱ्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.

3. बुरखा
मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणाऱ्या भागावर एक जाळी असते.


4. अल-अमिरा

अल-अमिरा या वस्त्राचे दोन भाग असतात. एक म्हणजे कॉटन आणि पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि दुसरा म्हणजे एक झोळीसारखा स्कार्फ.

5. शायला
आखाती देशांमधला एक लोकप्रिय स्कार्फचा प्रकार म्हणजे शायला. हा लांबलचक स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळून, कमीज किंवा टॉपवर खांद्याजवळ त्याला पिन लावली जाते.


6. खीमार

खीमार एक लांब केपसारखा कपडा असतो, जो डोक्यावरून थेट कमरेपर्यंत असतो. त्याने डोकं, गळा आणि खांदे झाकले जातात, पण चेहऱ्यावर पदर नसतो.

7. चादोर

इराणमधल्या महिलांमध्ये चादोर खूप प्रसिद्ध आहे. घराबाहेर पडायचं असल्यास त्या हे वस्त्र घालतात, जे पूर्ण शरीर झाकतं. कधी कधी त्याच्यासोबत एक छोटा हेडस्कार्फ असतो.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








