नेपाळच्या लोकांचा प्रश्न : 'या 500-1000च्या नोटा नदीत सोडून द्यायच्या का?'

    • Author, विनीत खरे
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीचा फटका बसलेल्या नेपाळी लोकांचा विषय ते काठमांडूमध्ये बसलेल्या नेत्यांबरोबर चर्चेला घेऊ शकतात, असं म्हटलं जातंय.

आजही नेपाळच्या केंद्रीय बँकेत आठ कोटी रुपयांच्या जुन्या भारतीय नोटा आहेत. भारताचे नोटाबंदीचे दिवस तुम्हाला आठवत असतीलच- ATM समोर असलेल्या लांबच लांब रांगा, सरकारवर टीका करणारे व्यापारी, 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर असलेली गर्दी तुम्हाला आठवत असेल.

पण भारतातच नव्हे तर नेपाळमध्येही लोकांना नोटाबंदीचा तितकाच त्रास झाला.

भारतीय चलनावरचा विश्वास कमी

भारताच्या लोकांना तरी 500 आणि 1000च्या नोटा बदलण्याची संधी मिळाली. पण नेपाळमध्ये असलेले लोक आजही या संधीची वाट पाहत आहेत.

नोटाबंदीच्या आधी या मोठ्या मूल्यांच्या अनेक नोटा नेपाळमध्ये होत्या.

नोटाबंदीच्या आधी लोक 25,000 रुपयांपर्यंतची रोख नेपाळमध्ये घेऊन जाऊ शकत होते. तसंच नेपाळच्या पूर्ण व्यापारातला 70 टक्के व्यापार भारतातून होतो म्हणून लोक भारतीय नोट बाळगत होते.

पण अचानक 8 नोव्हेंबर 2016 ला रात्री 8 वाजता नोटाबंदीची घोषणा झाली, अन् 500 आणि 1000च्या नोटा बाळगणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला.

नेपाळची केंद्रीय बँक 'नेपाल राष्ट्र बँके'च्या एका अधिकाऱ्याच्या मते नोटाबंदीनंतर लोकांचा भारतीय चलनावरचा विश्वास कमी झाला आहे.

भारताचा विश्वास, नेपाळची प्रतीक्षा

नेपाळच्या राष्ट्रीय बँकेत 500 आणि 1000च्या आठ कोटी रुपयांच्या नोटा आहेत. पण सामान्य माणसांकडे अजूनही असलेल्या नोटांचं मूल्य किती आहे, याचा पत्ता अद्याप लागलेला नाही.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी एप्रिलमध्ये भारत दौऱ्यावर असताना सांगितलं होतं की, ते भारतीय अधिकाऱ्यांच्या या मुद्द्यांवर चर्चा करतील. पण परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं होतं की बैठकीत असा कोणताच मुद्दा उपस्थित झाला नाही.

यावर स्पष्टीकरण देताना पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या जवळच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की भारतीय अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर अनौपचारिक चर्चा झाली आणि त्यांच्याकडून कारवाईचं आश्वासन मिळालं आहे. पण कारवाईबद्दल अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

'भारतात एके काळी या नोटा चालायच्या'

दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचं नेपाळमधील भारताचे राजदूत संजीव सिंह पुरी यांनी बीबीसीला सांगितलं. ते म्हणाले, "तुम्हाला (भारतात) जी मुदत दिली होती तीच आम्हाला दिली होती. नेपाळमधील लोक त्याच मुदतीचा वापर करू शकत होते. आमच्यात आणि नेपाळमध्ये औपचारिक चर्चा सुरू आहे. त्याबाबतीत सरकारला माहिती आहे."

काठमांडूपासून 300 किलोमीटर वर गौतम बुद्धाचं जन्मस्थान लुंबिनी आहे. इथल्या एका दुमजली घरात मिथिला उपाध्याय राहतात. नोटाबंदीच्या काळात त्या दिल्लीत होत्या तर त्यांचे पती दीप कुमार उपाध्याय भारतात नेपाळचे राजदूत होते.

त्यांच्या या टुमदार घरात भिंतींवर त्यांचे दिल्लीतल्या दिवसांचे अनेक फोटो आहेत. याच घरातल्या एका छोट्या खोलीत बसून त्या आम्हाला नोटाबंदीच्या वेळच्या आठवणी सांगतात. "जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा हाहा:कार माजला. दिल्लीमध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या."

त्यांच्याकडे आजही काही 500 आणि 1000च्या नोटा आहेत, ज्यांचं एकूण मूल्य 10-15 हजार आहे. आपल्याला या नोटा बदलण्यासाठी नक्कीच काहीतरी सोय होईल, अशी आशा त्यांना आहे.

"पण जर नाहीच काही झालं तर आम्ही लोकांना दाखवू की 'पाहा, भारतात एके काळी या नोटा चालायच्या'. आता काय करणार? बाजारात या 500-1000च्या नोटा चालत नाही. त्या नदीत सोडून दयायच्या का? आमचं सोडा, मोदींच्या आईसुद्धा नोटा बदलायला गेल्या होत्या," त्या हसत हसत सांगतात.

मिथिला यांनी सांगितलं की इथे आजही अनेक लोक नोटा बदलण्याची आस लावून बसले आहेत.

नोटा बदलणं किती कठीण?

भारताच्या सीमेला लागून असलेल्या या भागात रस्ते कच्चे आहेत. एखादी गाडी वेगाने गेली तर इतकी धूळ उडते की सूर्यही लपू शकतो.

मिथिला यांच्या शेजारी तीन महिला बसल्या होत्या. त्यापैकी एकीने सांगितलं की त्यांनी एका जुन्या नोटा घालवण्यासाठी एका तीर्थयात्रेत 10 हजार रुपये खर्चून टाकले. दुसरीने तर लखनौमध्ये एका डॉक्टरला 7000 रुपयांच्या नोटा जबरदस्ती दिल्या.

आता कुणीच अडचणीत यायला नको म्हणून आम्ही आता कोणत्याच भारतीय नोटा घेत नाही, तिसऱ्या महिलेने सांगितलं.

लोकांनी जुन्या नोटांपासून सुटका मिळवण्यासाठी तोटा सहन करून नोटा विकल्या, त्यांच्या भारतीय नातेवाईकांकडून मदत घेतली आणि आणखी काही मार्ग अवलंबले.

भारतीय सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी हे सगळं सोपं होतं. पण डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी हे इतकं सोपं नव्हतं. त्यांच्यावर सरकावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.

'भारताने असं का केलं?'

दिल्लीत नेपाळचे राजदूत राहिलेले उपाध्याय यांच्याकडे मदतीसाठी फोन यायचे, तेव्हा ते लोकांना दिलासा देत की नोट बदलण्यासाठी एक निश्चित मुदतीची घोषणा केली जाईल, पण आजवर असं झालेलं नाही.

ते सांगतात, "लोक मला सांगायचे की, पाहा आम्ही आमच्या घरच्यांपासून लपवून हे पैसै जमा केले होते. एका माणसाने तर 60-65 हजार गोळा केले असल्याचं सांगितलं. आता त्या पैशांचं काय करायचं?"

काठमांडूमध्ये दरबार चौकाजवळ एका व्यक्तीने मला विचारलं, "दूर टेकड्यांमध्ये राहणाऱ्या निवृत्त गोरखा सैनिकांचं कुटुंब पेन्शनवर अवलंबून आहे. त्यांना विचारा की त्यांची काय परिस्थिती आहे. त्यांच्या 500 आणि 1000च्या नोटांचं त्यांनी काय झालं, विचारा. सगळा कचरा झालाय आता. भारताने असं का केलं?"

अनेक महिलांनी अडचणीच्या काळात उपयोगी पडतील म्हणून नवऱ्यापासून लपवून काही पैसे ठेवले होते. नोटाबंदीचा त्यांनाही जबर फटका बसला आहे.

अनेक लोक भारतात मजुरी करायचे जे भारतीय नोटा आपापल्या घरी आणायचे. तेसुद्धा अडचणीत सापडले होते.

रिझर्व्ह बँकेच्या अटी

नोटाबंदीचा पेन्शनधाऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना, सगळ्यांनाच मोठा झटका बसला. पण सरकार कोणाचंच वाईट होऊ देणार नाही, अशी सगळ्यांना आशा होती.

नोटाबंदीच्या आधी लोक 25 हजार रुपये 500 आणि 1000च्या नोटांच्या रूपात नेऊन मग नेपाळी चलनात बदलू शकत होते.

पण नोटाबंदीच्या घोषणेमुळे नेपाळच्या राष्ट्रीय बँकेचे अधिकारी हादरले आणि त्यांनी लगेच 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यावर बंदी घातली, आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू केली.

अशा भारतीय नोटा परत घेण्यावर नेपाळ राष्ट्रीय बँक आणि रिझर्व्ह बँकेत चर्चा झाली. नेपाल राष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक भीष्मराज ढुंगाना यांच्या मते, रिझर्व्ह बँकेकडून प्रति व्यक्ती 4500 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलण्याबाबत चर्चा झाली होती. पण त्यांना वाटायचं की हे लोक स्वीकारणार नाही, उलट आणखी नाराज होणार.

नोट बदलण्याचा मुद्दा

25,000 रुपये नेण्याची मुभा असताना 4,500 रुपये बदलून मिळणं, ही बाब तितकीशी सोपी नव्हती. "म्हणून आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही. हे प्रकरण आजही प्रलंबित आहे," ढुंगाना सांगतात.

ते पुढे सांगतात, "भारतीय चलनावरचा लोकांचा विश्वास कमी झाला आहे. भारतीय लोकांशी आमचे चांगले संबंध आहेत. मग या मुद्द्यावर तोडगा का निघाला नाही? मला भूतानच्या एका मंत्र्यानं सांगितलं की भारताने भूतानच्या आठ अब्ज मूल्याच्या 500 आणि 1000च्या भारतीय नोटा बदलल्या. मग आमच्याशी असा भेदभाव का?"

नेपाळने 100 रुपयांपेक्षा जास्त भारतीय चलन ठेवण्यास आणि बदलण्यास बंदी घातली आहे.

ढुंगाना सांगतात, "आम्ही लोकांना डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट-डेबिट कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन देतोय. आम्हांला आशा आहे की एक दिवस भारत सरकार आमचे पैसै बदलण्यासाठी आम्हाला परवानगी देईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)