2019ला राहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का?

    • Author, प्रमोद जोशी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसीसाठी

2019 साली लोकसभा निवडणुका जिंकल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. प्रथमदर्शनी तरी असं वाटतं की राहुल गांधींनी हे भाष्य फार सल्लामसलत करून केलेलं नाही.

पण दुसऱ्याच क्षणी असंही वाटतं की संधीचा फायदा उचलत काही विचाराअंती ते हे बोललं असतील. औपचारिकतेच्या विळख्यात अडकले असते तर वादविवाद झाले असते.

असं असेल तर राहुल गांधी यांनी फार झपाट्यानं राजकारणाचं शिखर सर केलं आहे. आणि तेही आता एखाद्या मुरलेल्या नेत्यासारखं म्हणींचा वापर करून बोलायला लागले आहेत.

राहुल यांचं प्रोफाइल बनवण्यासाठी पण अशा घोषणांची गरजच आहे. या घोषणेचा धक्का भाजपपेक्षा काँग्रेसच्या सहकारी पक्षानांच जास्त बसेल.

मित्रपक्ष काय म्हणतील?

राहुल गांधींच्या या वक्तव्याचं विश्लेषण करून त्याचा राजकीय अर्थ त्यांचे मित्रपक्ष आणि विरोधक आता काढत असतील. त्यांच्या समर्थनार्थ आता त्यांच्याच पक्षातून वक्तव्यसुद्धा केली जाऊ लागली आहेत.

म्हणून याचंही आश्चर्य वाटायला नको की बघता बघता त्यांच्याच नावाचे पोस्टर्स सर्वत्र दिसू लागले आहेत.

पण सध्या तरी सगळ्यांत मोठा प्रश्न हाच आहे की, काँग्रेस पक्ष आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करून 2019च्या निवडणुकांना सामोरं जाणार का? याची गरज आहे का?

आणि पक्षात राहुल गांधींशिवाय असा कोण आहे ज्याचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केलं जाऊ शकतं?

जेव्हा राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की मग 'तुम्ही पंतप्रधान होणार का?' त्यावर राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं की हे तर निकालांवर अवलंबून असेल.

कोणी निश्चित केलं राहुल यांच नाव?

यानंतर प्रश्न त्यांना विचारण्यात आलं की, "काँग्रेस जर सगळ्यांत मोठा पक्ष म्हणून 2019 मध्ये उदयास आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का?"

यावर राहुल म्हणाले, "का नाही?"

राहुल यांच्या उत्तरातच गोम आहे. ते म्हणू शकले असते की हे तर संसदीय समिती ठरवेल. तसंच जर आघाडीचं सरकार आलं तर राहुल गांधी तरी हे कसं काय ठरवू शकतील?

अजून हे पण निश्चित नाही की त्यांचे मित्रपक्ष कोण असतील. तर मग याला सुतावरून स्वर्ग गाठणं, असं मानायचं का?

अजून तर हेही ठरलं नाहीये की भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या समोर विरोधी पक्षांची एक आघाडी लढेल की दोन आघाड्या तयार होतील?

म्हणून या हिशोबानं त्यांच्या या वक्तव्याला अपिरपक्वच म्हणावं लागेल. शक्यता आहे यावर काही पक्षांच्या प्रतिक्रियाही येऊ शकतात.

अर्थात अशीही शक्यता आहे की, त्यांनी हे विचारपूर्वक म्हटलं असेल.

नरेंद्र मोदी यांच्याशी आपला थेट सामना असल्याचं राहुल गांधी असेल, कदाचित हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

घोषणेची गरज आहे का?

हे एक मोठं सत्य आहे की, गेल्या चार-पाच दशकांमध्ये आमचं राजकारण हे अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर स्वार राहिली आहे आणि काही नेते अचानक प्रकट होत आहेत.

राहुल गंधी जर स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषीत करतील तर ही घोषणा पक्षासाठी नसून मतदारांसाठी आहे.

तसं तर काँग्रेस पक्षाची परंपरा पाहता ते कधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करत नाहीत. त्याची त्यांना कधी गरजही भासली नाही. कारण नेहरू, इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या, तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं स्वाभाविक होती.

अर्थात 2009मध्ये पक्षाने मनमोहनसिंग यांना पंतप्रधान घोषित केलं होतं, कारण तेव्हा तशी गरज त्यांना भासली होती.

अटल बिहारी वाजपेयी नेते असताना भाजपला कधी अशा घोषणेची गरज पडली नाही. पण नरेंद्र मोदींनी पक्षांतर्गत संघर्ष करत स्वतःला उमेदवार घोषित करायला लावलं.

जोपर्यंत पक्ष त्यांना उमेदवार घोषित करत नाही तोपर्यंत मोदी यांनी स्वतःला कधीच पंतप्रधानपदाचा दावेदार नाही म्हटलं.

निःसंशय 2014मध्ये ते झपाट्याने लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन पंतप्रधान झाले, पण निवडणुकांच्या सहा महिन्यांआधी पर्यंत भाजप जिंकेल किंवा नाही, याची शाश्वती नव्हती.

प्रादेशिक नेत्यांच्याही मनोकामना

ही शक्यता आताही आहे की, 2019च्या निवडणुकांमध्ये अनेक 'किंग' आणि 'किंग मेकर' बाजूला बसून प्रतीक्षा करतील की कदाचित आपल्यालाही संधी मिळेल.

हा आमच्या राजकारणाचा नवीन पैलू आहे. अनेक राजकीय नेत्यांकडे पंतप्रधान होण्यासाठी 'व्हॅलिड' कारणही आहेत. त्रिशंकू लोकसभेच्या शक्यतेनं अनेक प्रादेशिक नेत्यांच्या या आशेला बळच मिळालं आहे.

2012मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीला जबरदस्त विजय मिळूनही मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री नाही झाले. त्यांना वाटलं होतं की कदाचित दिल्लीमध्ये आपल्याला मोठ्या पदावर सेवा करायला मिळेल. त्यांना ती संधी नाही मिळाली.

पण राहुल गांधी यांच्याशिवाय राष्ट्रीय राजकारणामध्ये किमान अर्धा डझन तरी असे नेते आहेत, ज्यांच्यात पंतप्रधान होण्याची सूप्त इच्छा अजूनही दडलेली आहे.

प्रामुख्याने शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सारख्या अनेक नेत्यांकडे सत्तेचा दांडगा अनुभव आहे आणि राजकीय आधारही. तो त्यांना खुर्ची मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल.

महत्त्वपूर्ण असेल परिस्थिती

महत्त्वपूर्ण ठरेल त्या वेळेसची ती परिस्थिती जी एखाद्या नेतृत्वच्या दिल्लीच्या त्या सिंहासनापर्यंत घेऊन जाईल. आणि अशी परिस्थितीही निवडणुकीतून उत्पन्न होऊ शकते.

अनेक वेळा आमचे राष्ट्रीय स्तरावरील नेते अशा एखाद्या विशिष्ट परिस्थितीतच उदयास आले आहेत.

1964मध्ये लाल बहादुर शास्त्री आणि त्यानंतर लगेचच इंदिरा गांधी, 1984मध्ये राजीव गांधी, 1989मध्ये व्ही. पी. सिंग, 1991मध्ये पी. व्ही. नरसिंहराव आणि त्यांच्यानंतर एच. डी. देवेगौडा आणि इंद्र कुमार गुजराल हे विपरीत परिस्थितीतच उदयास आले होते.

मनमोहन सिंग हे पंतप्रधान होतील असं तरी पहिल्यांदा कुणाला वाटलं होतं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)