You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...आणि त्याने जपानी पंतप्रधानांना बुटात चॉकलेट डिझर्ट वाढलं!
- Author, बीबीसी मॉनिटरींग
- Role, बीबीसी हिंदीसाठी
जेवणाच्या टेबलावर कुणी बूट कसं ठेवू शकतं? आणि इथे तर चक्क बुटात एक पदार्थ वाढला होता! हे काय चाललंय?
असेच प्रश्न जपानच्या राजनायिकांना पडले, जेव्हा 2 मे रोजी इस्राईलच्या पंतप्रधान निवासस्थानी आयोजित एका मोठ्या महत्त्वाच्या मेजवानीत हा प्रसंग घडला.
तेव्हा डिनर टेबलवर विराजमान होते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी, सोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी. तमाम विशेष पाहुण्यांच्या भोजनव्यवस्थेची जबाबदारी इस्राइली पंतप्रधानांचे खास आणि इस्राईलचे सेलेब्रिटी शेफ मोशे सेगेव यांच्यावर.
आधी दोन्ही देशांच्या प्रथम दांपत्यांनी शानदार जेवण घेतलं. मग भोजनाचा गोड शेवट करण्याची वेळ आली तेव्हा मोशे सेगेव यांनी टेबलावर चक्क बूट आणून ठेवले. या काळ्या लेदर बुटात विशिष्ट चॉकलेटपासून तयार केलेल्या डिझर्ट वाढण्यात आलं होतं.
काहींना याचं अप्रूप वाटलं असेल, पण जपानी संस्कृतीमध्ये बुटांना फार अपमानजनक समजलं जातं.
पण यजमानांचा मान राखत शिंजो आबे यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता बुटामध्ये सादर केलेलं ते डिझर्ट संपवलं. पण जपान आणि इस्राईलच्या मुत्सद्यांना हे काही रुचलं नाही.
जपानच्या घडामोडींवर नजर ठेवून असलेले विश्लेषकांनीही या प्रसंगाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जपानी संस्कृतीत बूट
जपानमध्ये प्रदीर्घ काळ राहिलेल्या एक वरिष्ठ राजनायिकाने इस्राईलच्या 'येदियोत अहरानोत' या वृत्तपत्राशी बोलताना, "हा एक असंवेदनशील आणि मूर्खपणाचा निर्णय" असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, "जपानी संस्कृतीमध्ये बुटापेक्षा जास्त तुच्छ काहीही नाही. जपानी फक्त आपल्या घरातच नाही तर कार्यालयांमध्येही बूट बाहेर काढूनच आत जातात. इतकंच काय तर पंतप्रधान आणि इतर मंत्री आणि खासदारसुद्धा आपापल्या कार्यालयांमध्ये बूट घालून जात नाहीत. हे म्हणजे एखाद्या ज्यू पाहुण्याला डुकराच्या रूपाने जेवण वाढण्यासारखं आहे."
एका जपानी राजनायिकाने 'येदियोत'ला सांगितलं, "कुठल्याही संस्कृतीत बुटांना टेबलावर ठेवलं जात नाही. मग त्या शेफच्या डोक्यात नेमकं काय चाललं होतं? जर हा कुठला विनोद होता तर आम्हाला हा नक्कीच आवडलेला नाही. आमच्या पंतप्रधानाबरोबर झालेल्या या व्यवहारामुळे आम्ही नाराज आहोत."
शेफ सेगेव यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर रात्रीच्या या भोजनाचे काही फोटो शेअर केले होते. यात बुटात सादर केलेलं ते डिझर्टही होतं.
एका युझरने या फोटोवर कॉमेंट केली - "तुम्ही सगळ्यांत मोठी चूक केली आहे."
एक दुसरा युझर म्हणाला, "हा देश या प्रकाराला कधीच विसरणार नाही. सेगेव, तुम्ही मला आवडत होतात पण आता तुम्ही मान शरमेनं खाली घातली आहे."
आणखी एकाने कॉमेंट केली, "जपानी पंतप्रधानांना कुणी बुटात अन्न कसं काय वाढू शकतं? हा माणूस (शेफ सेगेव) प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतोय!"
अनेक पुरस्कार जिंकलेले शेफ सेगेव हे इस्राईलच्या एका प्रमुख रेस्टॉरंटचे मालक आहेत. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत, आणि ते एक टीव्ही सेलेब्रिटी आहेत.
ते EI AI इस्राईल एअरलाइन्सचे मुख्य शेफसुद्धा आहेत.
शिंजो आबे यांनी 2015 मध्ये इस्राईलला भेट दिली होती. असं करणारे ते पहिले जपानी पंतप्रधान होते.
आबे आणि नेतान्याहू यांच्या भेटीदरम्यान उत्तर कोरिया, इराण अणू करार आणि इस्राईल पॅलेस्टाइन शांतता बोलणीवर चर्चा झाली होती.
(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)