इटलीत राजकीय संकट : कुणी सरकार देतं का सरकार?

सरकार स्थापनेसाठीची इटलीत गेले दोन महिने सुरू असलेली मोर्चेबांधणी फसली आहे.

सोमवारी वाटाघाटींची तिसरी फेरी अयशस्वी झाली, ज्यानंतर इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्गियो मात्तारेल्ला यांनी आता आपल्यासमोर दोनच पर्याय शिल्लक असल्याचं सांगितलं - एकतर नवीन निवडणुकांना सामोरं जायचं किंवा वर्षअखेरपर्यंत काळजीवाहू सरकारने देश चालवायचा.

मार्चमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता.

निवडणुकांमध्ये काय झालं होतं?

मार्च महिन्यात इटलीत झालेल्या निवडणुकांमध्ये यावेळी वेगळीच चुरस पाहायला मिळाली. अनेक वर्षं व्यवस्थात्मक राजकारणाचा विरोध करणाऱ्या 'फाईव्ह-स्टार मूव्हमेंट' आणि 'द लीग' या दोन पक्षांनी चक्क निवडणुकांमध्ये लक्षणीय कामगिरी केली.

पण दोन्ही पक्षांना स्वबळावर सत्तेत येण्याइतका पाठिंबा मिळाला नाही.

2009 साली स्थापन झालेल्या फाईव्ह स्टार पक्षाने या निवडणुकीत सुरुवातीपासूनच एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला होता. प्रचारात ही आपली जमेची बाजू आहे, असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

पण बहुमताजवळ पोहोचता न आल्यामुळे त्यांचं हेच 'स्वावलंबित्व' त्यांना अडचणीचं ठरलं.

1991 साली स्थापन झालेल्या द लीगची सुरुवात एक विभक्ततावादी पक्ष म्हणून झाली होती. दक्षिण इटली मुख्य भूमीपासून वेगळा केला जावा, ही त्यांची मागणी बरीच गाजली होती. पण काळाच्या ओघात, दक्षिण इटलीबाबतचा आपला विरोध मवाळ करत त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध भूमिका घेत लोकप्रियता मिळवली.

उजव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये आतापर्यंत माजी पंतप्रधान सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांचा फोर्झा इटालिया हा पक्ष प्रमुख मानला जायचा. मार्चमधल्या निकालांनंतर द लीगने उजव्या पक्षांचं अघोषित नेतृत्व पत्करल्याचं चित्र आहे.

वाटाघाटींमध्ये काय घडलं?

गेले दोन महिने सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये कोणत्याच पक्षाने नमतं घेतलं नाही, त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे.

फाईव्ह स्टार आणि द लीग या दोन प्रमुख पक्षांनी जुलै महिन्यात नवीन निवडणुका घेण्याला पाठिंबा दिला आहे. या संदर्भातला अंतिम निर्णय मात्तारेल्ला घेतील.

आताच्या निवडणुकीत फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षाने सर्वाधिक मतं मिळवी. पण त्यांनी उजव्या विचारसरणीच्या फोर्झा इटालिया आणि द लीग यांच्या आघाडीत सामील होण्यास नकार दिला. तसंच डाव्या विचारसरणीच्या डेमोक्रॅटिक पार्टीबरोबर जाणंही अमान्य केलं.

सोमवारी एका जाहीर भाषणात राष्ट्रपती मात्तारेल्ला म्हणाले की आघाडी सरकार बनणार नाही, हे स्पष्टच आहे. त्यामुळे सर्व पक्षनेत्यांनी एका 'तटस्थ' सरकारला पाठिंबा द्यावा.

"आता आणखी वाट पाहणं शक्य नाही," असंही ते म्हणाले.

"एका नव्या सरकारला पूर्ण अधिकार द्यायचे की जुलै महिन्यात नवीन निवडणुका घ्यायच्या, याचा निर्णय सर्वस्वी पक्षांवर अवलंबून आहे," मात्तारेल्लांनी सांगितलं.

विविध प्रकारच्या धोरण क्षेत्रांतल्या तज्ज्ञांचं मिळून एक नवं हंगामी सरकार राष्ट्रपतींमार्फत स्थापन केलं जाईल.

येत्या वर्षाच्या शेवटी विक्री कर वाढणार आहे. त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार नाहीत याचा विचार करून 2019चा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम या सरकारकडे असेल.

2018 संपेपर्यंत हे सरकार काम करेल, आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांआधी ते बरखास्त केलं जाईल, असं मात्तारेल्ला यांनी सांगितलं. पण फाईव्ह स्टार मूव्हमेंट आणि द लीग यांनी या पर्यायाबाबत फारसा उत्साह दाखवलेला नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती?

विश्लेषकांचं म्हणणं आहे की, इटालियन जनतेचा राजकीय असंतोष शिगेला पोहोचला की ती नव्या चेहऱ्यांना संधी देते.

1994 साली भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या मालिकेनंतर इटलीने सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांना संधी दिली होती.

भूतकाळात इटलीत वारंवार सत्ताबदल झाले आहेत. गेल्या 20 वर्षांतच इटलीच्या निवडणूक प्रक्रियेत नियमितता आली होती.

आत्ताच्या अनिश्चिततेनंतर काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)