You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीजिंगमध्ये रेल्वेतून आलेली ती व्यक्ती कोण?
उत्तर कोरियाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीची खास रेल्वे बीजिंगमध्ये आली आहे. या रेल्वेतून कोण चीनला कोण आलं आहे, या बद्दल तर्कवितर्क लढवले जात असले तरी ही व्यक्ती म्हणजे दुसरंतिसरं कोण नसून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन आहेत, असं मानलं जात आहे.
जपानच्या माध्यमांनी सर्वप्रथम या संदर्भातली बातमी दिली आहे. उत्तर कोरियाच्या 'हाय प्रोफाईल' व्यक्तीनं चीनला भेट दिली असून त्यासाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे, असं सांगण्यात आलं आहे. उत्तर कोरियाच्या 'डिल्पोमॅटिक ट्रेन'नं ही व्यक्ती बीजिंगला आली आहे, असं जपानच्या माध्यमांतून लिहिण्यात आलं आहे.
या व्यक्तीची औपचारिक ओळख काय हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही भेटीवर काळजीपूर्वक लक्ष ठेऊन आहोत, असं दक्षिण कोरियानं म्हंटलं आहे.
2011ला उत्तर कोरियाची सत्ता घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच विदेश भेट असू शकेल.
चीन किंवा उत्तर कोरियातून या भेटीबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी या घडामोडींकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे.
गेल्याच महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी किम यांना भेटण्याचे निमंत्रण स्वीकारले. या भेटीसाठी अत्यंत जटिल अशी राजनयिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे, असं सांगितलं जात आहे.
विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात चर्चा होण्यापूर्वी चीन आणि उत्तर कोरियातील नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे, कारण चीन हा उत्तर कोरियाचा मुख्य आर्थिक सहकारी आहे.
टोकियोतील निप्पोन न्यूज नेटवर्कवर या ट्रेनचं व्हीडिओ फुटेज दाखवण्यात आलं आहे. किम यांचे वडील किम जाँग इल वापरत असलेली रेल्वे आणि ही रेल्वे सारखीच असल्याचं यात म्हटलं आहे. किम जाँग इल यांनी 2011ला चीनला भेट दिली होती. त्यांची ही भेट झाल्यानंतर चीननं या भेटीला दुजोरा दिला होता.
सोमवारी दुपारी बीजिंग रेल्वस्टेशनच्या बाहेर काही अनियमित हालचाल दिसली, असं अशी प्रतिक्रिया इथल्या एका दुकान चालकानं दिली.
रेल्वे स्टेशन परिसर तसंच रेल्वे स्टेशनच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त होता, अशी माहिती या दुकान चालकानं एएफपी न्यूज चॅनलला दिली.
बीजिंगमधल्या तियानानमेन चौकातून पर्यटकांना पोलिसांनी दूर केलं होतं, असं रॉयटर्सनं म्हटलं आहे. सर्वसाधारणपणे इथल्या 'ग्रेट हॉल ऑफ पीपल' इथं उच्चस्तरीय बैठक होणार असेल तर ही खबरदारी घेतली जाते.
ब्लमबर्गनं तीन वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यानं भेट देणारी व्यक्ती किम असल्याचं म्हटलं आहे. पण या सूत्रांची नावं देण्यात आलेली नाहीत.
पण दक्षिण कोरियाच्या होनहॅप न्यूजला एका विश्लेषकांनी सांगितलं आहे की, भेट देणारी व्यक्ती किम यांची लहान बहीण किम यो जाँग असू शकते किंवा लष्करी अधिकारी चो-ऱ्योंग ही असू शकतात.
सेऊलमधील राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यानं बीजिंगला गेलेली व्यक्ती कोण याची खातरजमा झाली नसल्याचं सांगितलं. "सर्व शंका गृहीत धरून आम्ही या भेटीकडे लक्ष ठेऊन आहोत," अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्यानं दिली.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफेन यांची स्टॉकहोममध्ये भेट घेतली होती. ट्रंप आणि किम यांच्यात होणाऱ्या भेटीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाली होती.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)