#5मोठयाबातम्या : आरक्षित जागेवरील बंगल्यामुळे मंत्री सुभाष देशमुख अडचणीत?

आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. मंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेवर

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातला बंगला फायर ब्रिगेडसाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आला आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या संदर्भात देशमुख आणि या जागेचे सहमालक असलेल्यांना महापालिकेत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. हे प्रकरण 2000सालातील असून त्यावेळी देशमुख आणि इतर 9 जणांनी ही 2 एकर जागा 50 लाख रुपयांना विकत घेतली होती. याबाबात देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असं या बातमीत म्हटलं आहे.

2. बहुपत्नीत्वाची घटनात्मक वैधता तपासणार

मुस्लीम धर्मातील तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवल्यानंतर सुप्रीम कोर्ट बहुपत्नीत्व आणि निकाह हलालासह लग्नाच्या अन्य काही प्रथांची घटनात्मक वैधता तपासणार आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर विचार करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. बहुपत्नीत्व आणि हलालासह इतर काही लग्नांच्या प्रथांमुळे महिलांच्या घटनात्मक हक्कांवर गदा येते का, हे सुप्रीम कोर्ट तपासणार आहे.

3. मंत्री निलंगेकरांना 51 कोटींची कर्जमाफी?

राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतलेले 76 कोटींचं कर्ज 25 कोटींत सेटल करण्यात आलं आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे. निलंगेकर यांच्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीनं महाराष्ट्र बँक आणि युनियन बॅंकेकडून 20 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 2011पासून कंपनीनं व्याज आणि मुद्दलाचे पैसे भरणे बंद केलं. दोन्ही बॅंकाचं मिळून 76 कोटी 90 लाख एवढं देणं होतं. यात वन टाईम सेटलमेंट करण्यात आली असून 25 कोटी 50 लाख रुपये इतका भरणा ते करणार आहेत, असं या बातमीतं म्हटलं आहे.

4. रायगडवर सापडल्या ऐतिहासिक वस्तू

रायगड किल्ल्यावर उत्खनन सुरू असून त्यात अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. रायगड प्राधिकरण समितीच्या वतीनं किल्ल्यावर 350 ठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आलं आहे.

या उत्खननामध्ये शस्त्रास्त्र, नाणी, वस्तू यांचे अवशेष मिळाले आहेत. या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे यांनी रविवारी या ठिकाणी भेट दिली.

5. मुंबईकरांत मधुमेह वाढला

विविध कारणांमुळे मुंबईत मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढं आली आहे.

ऑक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये पालिकेच्या चार प्रमुख हॉस्पिटलमध्ये मिळून 1 लाख 30 हजार 27 जणांनी मधुमेहावर उपचार केले. तर ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत ही संख्या 62 हजार 315 इतकी होती, असं या बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)