डेटा लीक : अमेरिकेत फेसबुकची चौकशी होणार

फोटो स्रोत, Reuters
लक्षावधी नेटिझन्सच्या गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी फेसबुक कंपनीची 'द यूएस फेडरल ट्रेड कमिशन'द्वारे चौकशी करण्यात येणार आहे. केंब्रिज अॅनालिटिका संस्थेने फेसबुककडून लाखो युजर्सचा डेटा मिळवला कसा यासंदर्भातली ही चौकशी आहे.
5 कोटी युझर्सचा डेटा लीक केल्याप्रकरणी फेसबुकवर जगभरातून टीका होते आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक मोहीमेत हा डेटा वापरण्यात आल्याची चर्चा आहे.
युझर्सची प्रायव्हसी अर्थात खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रेड कमिशनद्वारे फेसबुकची चौकशी होणार आहे.
फेसबुकद्वारे डेटा लीक प्रकरण आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे असं फेडरल ट्रेड कमिशनचे कन्झ्युमर प्रोटेक्शन प्रमुख टॉम पॅहल यांनी सांगितलं. वापरकर्त्यांची गोपनीय माहिती लीक करणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजावर आमचं बारिक लक्ष असून, त्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाते.
आपली गोपनीय माहिती कुठल्याही व्यापारी, व्यावसायिक कामासाठी दिली जात असेल तर फेसबुकने नियमानुसार त्याची कल्पना युझर्सना देणं अनिवार्य आहे.
दरम्यान फेडरल ट्रेड कमिशनद्वारे मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर भूमिका मांडायला आवडेल असं फेसबुकचे डेप्युटी चीफ प्रायव्हसी ऑफिसर रॉब शेरमन यांनी 'सीएनबीसी'ला सांगितलं.
पर्सनॅलिटी क्विझ विचारून एका अॅपच्या माध्यमातून गोपनीय माहिती जमा करण्यात आली. केवळ 2,70,000 नेटिझन्सनी क्विझ पूर्ण सोडवली. मात्र त्याहून अधिक कोट्यवधी नेटिझन्सची माहिती फेसबुककडे जमा झाली.
गोपनीय माहिती लीक होऊ नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रायव्हसी सेटिंग्ज बदलल्याचं फेसबुकने सांगितलं.
डेटा लीकप्रकरणी अमेरिकेच्या बाजारतलं फेसबुकचं मूल्यांकन 55 बिलिअन डॉलर्सनी घसरलं आहे. फेडरल ट्रेड कमिशनकडून फेसबुकची चौकशी होणार असल्याचं कळल्यानंतर मूल्यांकनानंतर आणखी 5 टक्क्यांची घसरण झाली होती.
युके डेटा प्रोटेक्शन रेग्युलेटर आणि युरोपियन कमिशनद्वारेही फेसबुकची चौकशी होणार आहे.
डेटा लीकप्रकरणी फेसबुकने अमेरिका आणि युकेमध्ये दिलगिरी व्यक्त करणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चौकशीची घोषणा करण्यात आली.
डेटा लीकप्रकरणी आम्ही आणखी कठोर उपाययोजना करू शकलो असतो अशा शब्दांत फेसबुकचा संस्थापक मार्क झुगरबर्ग यांनी माफी मागितली होती. 'हा विश्वासघात आहे. त्याबद्दल मी माफी मागतो', असं त्यांनी पुढे सांगितलं.
यापुढे असं डेटा लीक होऊ नये यासाठी पावलं उचलली आहेत असं फेसबुकने स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








